For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नवल अहंकाराची गोठी

06:07 AM Nov 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
नवल अहंकाराची गोठी
Advertisement

शुभविवाहाच्या निमंत्रण पत्रिकेमधील मजकूर वाचणे हा एक आनंदाचा भाग असतो. जो तो आपापल्या मतीप्रमाणे निमंत्रण देतो. शब्दफुलांचा वर्षाव असणाऱ्या विवाह पत्रिकेमधील नावांची यादी परिवाराचे रहस्य सांगून जाते. त्यात खूपदा रागलोभ दडलेले असतात. एकदा एक ऐंशी वर्षांच्या काकू रुसून बसल्या. का बरे? तर त्यांच्या पुतण्याच्या मुलाच्या विवाह पत्रिकेवर त्यांचे नाव टाकले नाही म्हणून. खरे म्हणजे त्या मुलाच्या जडणघडणीमध्ये, संस्कारामध्ये काकूंचा वाटा शून्य होता. तरी देखील मानापानासाठी अबोला धरून त्यांनी त्या विवाहावर चक्क बहिष्कार घातला. माणसाचा अहंकार छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये त्याच्या स्वभावात, व्यक्तिमत्व विकासात अडथळे निर्माण करतो.

Advertisement

आयुष्यात जगताना व्यवहारात, नात्यात, राजकारणात माणसे स्वार्थासाठी एकमेकांचा अहंकार जोपासत असतात. उगीचच पाया पडणे हा एक त्याचाच भाग. एखाद्याचे वागणे चुकले तरी त्याचे उदात्तीकरण करत त्याच्या अहंकाराला धक्का न लागू देणे हे नेहमीचेच. गोष्ट लहानशी असते परंतु त्यातून अहंकाराचे पोषण कसे होईल हेच बघितले जाते. वयानुसार कानाची शक्ती क्षीण व्हायला लागली की ऐकू येत नाही. परंतु ते कबूल करेल तर तो माणूस कसला? त्याला वाटते समोरच्यालाच ऐकू येत नाही. एकदा एका माणसाला वाटले आपली बायको बहिरी झाली आहे. तिला नीट ऐकू येत नाही. तो तिला

डॉक्टरकडे चल म्हणून तिच्या मागे लागला. ती तयार होईना म्हणून त्याने स्वत:च जाऊन डॉक्टरकडे तक्रार नोंदवली. डॉक्टर म्हणाले, तुमच्या पत्नीला किती फूट अंतरावरून ऐकू येत नाही ते जाणून घ्या आणि मला सांगा. हा मनुष्य घरी आला. त्याने पन्नास फुटांवरून बायकोला विचारले, ‘अग, आज कोणती भाजी केली’? तिला ऐकू आले नाही. नंतर तीस, चाळीस, वीस करता करता पाच फूट अंतरावरून त्याने पुन्हा तोच प्रश्न विचारला. तेव्हा ती वैतागून, चिडून म्हणाली, मघापासून सांगतेय भेंडीची भाजी केली आहे. तोच तो प्रश्न पुन्हा पुन्हा का विचारता? कारण हा माणूसच बहिरा होता. स्वत:चा अहंकार जोपासताना, जगताना माणसे लपाछपी हा खेळ उत्तमरीत्या खेळतात. नकार हा देखील अहंकारातून येतो. चांगल्या गोष्टींना दाद न देणे, प्रत्येक ठिकाणी अधिकार गाजवणे या रोजच्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी आनंद नासून टाकतात. अहंकार आणि स्तुती यांचे जवळचे नाते आहे. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणत, स्तुती ही रक्तामधील साखरेसारखी आहे, तर पूजनीय डोंगरे महाराज म्हणतात, साखरेपेक्षा गोड काय तर स्तुती. खूपदा क्षमता नसणाऱ्या माणसांचे व्यासपीठावरून गोडवे गायिले जातात. कारण त्यांच्याजवळ सत्ता असते. स्तुती ही परमेश्वराचीच करावी कारण परम्यात्म्यामध्ये ती धारण करण्याची शक्ती असते. साध्या माणसाचे मात्र स्तुतीने पतन होते.

Advertisement

साधकावस्थेत अहंकार सापशिडीमधल्या सापासारखा उंचावरून खाली फेकून देतो. म्हणून सद्गुरू लीला करतात. शिष्याचा अहंकार कायमचा नष्ट व्हावा म्हणून गुरू त्याची कठोर परीक्षा घेतात. स्वामी मुक्तानंद म्हणतात, सद्गुरू शिष्याला मुद्दामच विषम परिस्थितीतून नेतात. शिष्याकडून चुका व्हाव्यात, त्याचा पाय घसरावा, इर्षा, द्वेष, क्रोध येण्यासारखी कारणे मिळून त्याच्यावर टीका व्हावी, निंदा व्हावी अशी परिस्थिती निर्माण करतात आणि त्याचे सूक्ष्म निरीक्षण करतात. अहंकाराचे कृमीकीटक मोठे सूक्ष्म असतात. ते शिष्याला कुरतडत राहतात. सद्गगुरू शिष्याच्या सूक्ष्म अहंकाराला शोधून त्याच्यावरच बोट ठेवतात. तेव्हा ते असते सद्गगुरूंनी केलेले ऑपरेशन अहम्. त्यावेळी सद्गगुरूंना सहकार्य करावे कारण त्यामुळे साधकाची आंतरशुद्धी होते. गुरूंचे प्रेम हे आईपेक्षाही श्रेष्ठ असते.

संतांची लीलावर्णने सतत वाचावी. त्यांचे पारायण करावे असे सांगितले आहे. कारण त्यातून त्यांचे आचरण कळते व बोध होतो. पू. कलावतीदेवी आई यांच्या चरित्रातील एक कथा स्वामी माधवानंद यांनी सांगितली आहे. आई एकदा कीर्तनाच्या निमित्ताने कोल्हापूरला गेल्या होत्या. तिथे एका श्रीमंत बाईंनी त्यांना विचारले की आमच्या घरी उद्या पंधरा माणसांचा स्वयंपाक कराल का? त्या बाईंना वाटले ही बाई साधी आणि टापटीपीची आहे. हिला विचारावे. त्यांनी आईना पूर्वी कधी बघितलेले नव्हते. आईंनी हसून होकार दिला आणि त्यांच्या घरी जाऊन स्वयंपाक केला. लहान मुलांना खाऊ घालून, सारे काही आवरून केलेल्या स्वयंपाकातील काहीही न खाता आई रात्री अंबाबाईच्या देवळात कीर्तन करायला गेल्या.

श्रीमंत म्हणवणारी ही बाई सुद्धा तिथे गेली. पहाते तर काय अप्रतिम, भावपूर्ण कीर्तन करणाऱ्या कीर्तनकार स्त्राr या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून आईच होत्या. यांनीच तर आज आपल्या घरी आपुलकीने स्वयंपाक केला. त्या बाई खजील झाल्या आणि त्यांनी पू. कलावतीदेवी आईंचे पाय धरले. आपल्या पुढे येणारे काम हे श्रीकृष्णाचे आहे हा कलावतीदेवी आईंचा भाव होता त्यात कर्तेपण नव्हते. अहं नव्हता. कर्तृत्वाचा भाव नव्हता. संतांचे हेच मोठेपण जगण्याचा पथदीप असतो.

सामान्य माणसांपेक्षा अहंकाराची बाधा ज्ञानी व्यक्तींना जास्त होते. संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊली म्हणतात,

नवल अहंकाराची गोठी ।

विशेषे न लगे अज्ञानापाठी ।

सज्ञानाचे झोंबे कंठी ।

नाना संकटी नाचवी ।।

अहंकाराची गोष्ट विलक्षण आहे. अहंकार हा अज्ञानी पुरुषांच्या मागे विशेष करून लागत नाही, परंतु ज्ञानवान पुरुषांचा तो गळा धरतो आणि त्यांना नाना प्रकारच्या संकटात गोते खायला लावतो. संत एकनाथ महाराजांचा असाच एक अभंग आहे. ‘मुका झालो, वाचा गेली, होतो पंडित महाज्ञानी, दशग्रंथ षटशास्त्र पुराणी, चारी वेद मुखोद्गगत वाणी, गर्वामध्ये झाली सर्वहानी, साधुसंतांची निंदा केली, हरिभक्तांची स्तुती नाही केली, तेणे वाचा पंगू झाली, एका जनार्दनी कृपा लाधली’? ज्ञानाचा अहंकार घात करतो. काही माणसे सतत केव्हाही स्वत:बद्दलच फार फार बोलतात.

संभाषणाची गाडी कोणत्याही वळणावर गेली तरी ती पुन्हा पुन्हा ‘माझे मोठेपण’ या थांब्यावर येऊन थांबते. उभी राहते. अशावेळी एक तर वादावादी होतात किंवा संवाद होत नाही. अशा व्यक्तींची भेट झाली की मनातून जोरजोरात नामस्मरण सुरू करावे. नामस्मरण मनात कोणतीही प्रतिक्रिया उमटवत नाही. अरे ला कारे करायचा तर प्रश्नच उद्भवत नाही. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणत की माणसाने आडून आडून देखील स्वत:ची स्तुती होईल असे बोलू नये आणि दुसऱ्यांची निंदा करू नये. त्यामुळे बोलण्याची उर्मी थांबते. बोलणे आपोआपच कमी होते. नामस्मरणाचा वेग वाढतो.  स्वत:च्या अहंकाराचे पोषण न होणे आणि दुसऱ्याचा अहंकार न पोसणे यासाठी सद्गुरूंची कृपा हवी असते. ती शरणांगतीने हमखास मिळते.

-स्नेहा शिनखेडे

Advertisement
Tags :

.