For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नात्यास नाव अपुल्या...

06:03 AM Feb 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
नात्यास नाव अपुल्या
Advertisement

कॉसमॉस बँकेची एक अतिशय सुंदर जाहिरात प्रसिद्ध होती ती तिच्या जिंगलमुळे. तीन पिढ्यांशी घट्ट नाळ जुळलेली ती बँक आहे हे त्या गाण्यातून स्पष्ट दिसायचं.

Advertisement

नाते अपुले शतकाचे

विश्वासाचे आपुलकीचे

Advertisement

या अवघ्या दोनच ओळी... पण तीन पिढ्या दाखवण्यासाठी तीन वेगवेगळ्या स्टाइलमध्ये त्या गायल्या आहेत. नातं म्हणजे काय? तर ‘जे ना तुटते ते नाते’ असं म्हटलं जातं. नातं रक्ताचं असतं तसंच जोडलेलं असतं. कधी कधी तर मानलेलं असतं, कधी जुळलेलं, कधी जुळवलेलं कधी कधी तर अगदी अपघाताने जोडलेलं असतं.

तुझे नि माझे नाते काय?

तू देणारी मी घेणारा

तू घेणारी तू देणारा

अपुल्यामधले फरक कोणते

अन् अपुल्यातुन समान काय?

विचार करून पाहिलाय का कधी? कुठून येतं हे नातं? कुठून येते ही ओढ? का वाटावं आपल्याला हजारातून एखाद्याविषयीचं खास काही? त्या लांब तिकडे असलेल्या तारांगणातून पडणारी उल्का जशी कुठे पडते तिथे तशी माणसं एकमेकांच्या आयुष्यात येतात, प्रेमात पडतात. पण काही नाती तर अशी असतात की कुठल्याच हिशेबात बसत नाहीत. मग त्यांचं काय?

नात्याला या नकोच नाव

दोघांचाही एकच गाव

वेगवेगळे प्रवास तरीही

समान दोघांमधले काही

ठेच लागते एकाला

का रक्ताळे दुसऱ्याचा पाय?

बस्स...या ओळी पुरेशा आहेत. एखाद्या कातर संध्याकाळी, एखाद्या उत्तररात्री शांतपणे एकवशी बसून, चांदण्यांच्या सोबतीत हे गाणं ऐका. संदीप खरे सलील कुलकर्णी यांची अतितरल गाणी आहेत ही अशी! मनाच्या दोन स्वरांमधली प्रत्येक श्रुती ऐकायला येऊ लागेल इतकी... स्वत:चा नि:श्वास जड वाटेल इतकी..

का हिशेब ठेवायचे या सगळ्या नात्यांचे? काही नातेसंबंध वरून आले म्हणून त्यांचा आदर राखावा लागतो. काही नाती ही जुळता जुळता तुटली तरीही ती चिरंतन आठवणी ठेवून जातात.

अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती

दोन दिसांची रंगतसंगत दोन दिसांची नाती

बाबूजींच्या भिजलेल्या स्वरांतलं हे गीत आठवणींच्या वेदना आणि नात्यांची किंमत दोन्हीही घेऊन येतं. बाबूजींनी त्यांच्या पूर्वायुष्यात अमाप दु:ख भोगलं होतं. म्हणून की काय पण त्यांचा प्रत्येक सूर हा अतिशय आर्द्रता आणि आर्तता घेऊन प्रकट होतो. तशी त्यांची कितीतरी गीतं अस्वस्थ करून सोडतात. ‘डोळ्यांमधले आसू पुसती ओठावरले गाणे’ हे ऐकताना ज्याला गदगदून आलं नाही असा माणूस विरळा. एका अर्ध्यावर भंगलेल्या नात्याला तिलांजली देणारं हे गीत म्हणजे मूर्तिमंत वेदना आहे.

भान विसरुनी मिठी जुळावी

पहाट कधी झाली न कळावी

भिन्न दिशांना झुरत फिरावे नंतर दोन दिवाणे या ओळी खरंच असह्य आहेत. अकाली चूर होऊन गेलेल्या नात्याचे भग्न अवशेष गोळा करताना मनाला जखमा होतात त्याचं चित्र आहे ते. का जुळतात अशी नाती? तुटायचंच असतं तर?

बाल्य संपून तारुण्यात येताना जेव्हा व्यक्ती जगाच्या मतलबीपणाशी अनभिज्ञ असते तेव्हा विशेषत: मुलींना

सोडुनिया घर नातीगोती निघून जावे तयासंगती

कुठे तेहि ना ठावे

आज कुणीतरी यावे ओळखीचे व्हावे.

अशी एक हुरहूर दाटून येत राहते. खरं तर हीच नवीन नात्याच्या नव्या स्वप्नांची नवी सुरुवात असते.

मौसम है आशिकाना

ऐ दिल कहीं उनको ऐसे में ढूँढ लाना

किंवा

दिवस तुझे हे फुलायचे

ही पण अशीच सुरुवात बरं का! सहवास हा नात्याचा पाया. पण कित्येकदा सहवासाशिवायच नाती बहरतात. वर्षानुवर्ष जवळ राहूनही ज्या तारेवर सोबतीच्या व्यक्तीचा हात पडलेला नसतो ती तार एखाद्या व्यक्तीला पाहून क्षणात झंकारते. आणि मग

तारांवरी पडावा केव्हा चुकून हात

विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा.

अशी अवस्था होते. आरती प्रभूंची खरंच कमाल म्हणायची! काय लिहून गेलेत ते..एका कवितेत ते असंही म्हणतात,

विजनी कुणी सुखी अन् भरल्या घरात कोणी

वनवास भोगणारा दु:खात शांत गातो

नात्यांची कोडी ही अशी असतात. नाही सुटता सुटत.

आपण भारतीय लोक स्वभावत: नातीगोती सांभाळणारे असतो. कुटुंबप्रिय, उत्सवप्रिय समाज आहे आपला. त्यामुळे नात्यांची कोडी घालत आणि सोडवत आपण एकमेकांना धरून असतो. पण आपल्या समाजात काही घट्ट चौकटीसुद्धा आहेत. त्याबाहेरची नाती आपला समाज मान्य करीत नाही. आणि सामाजिक दबाव एवढा असतो की भिन्नलिंगी व्यक्तीही मैत्री जपताना सावध असतात. स्पर्श आणि शरीराची भाषा पूर्णांशाने समजून घ्यायला आपण कमी पडतो. त्यामुळे अशी मधल्या पोकळीत मिळालेली असंख्य नाती शेवटपर्यंत गुप्तपणेच फुलत राहतात. त्याचा आनंद इतरांना मिळू शकत नाही. ज्यांच्यामध्ये ते असतं त्यांनाही त्यापासून मिळणारा आनंद मनापासून उपभोगता येत नाही. त्यामुळे

नात्यास नाव अपुल्या देऊ नकोस काही

साऱ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही

असं म्हणून शांत राहतात अशी नाती. पण ती फार सुंदर असतात. ती जगण्याला अर्थ देतात. खचलेल्या मनाला उभारी देतात. मनात खोलवर गाडली गेल्यामुळे की काय सततची प्रेमाची बरसात त्यांना सरसरून रुजवून वर आणते. विरामचिन्हांतली ही कितीतरी नाती इतकी बहरतात, इतकी फुलून येतात की जगाला सर्वोत्कृष्ट कलाकृतींची देणगी द्यायला हीच गोष्ट कारणीभूत असावी असं म्हणायला वाव आहे. आठवा बरं अमृता साहिर इमरोज हे त्रिकोणी नातं! अक्षरश: वेड लावणारी असंख्य गीतं आपल्याला या लोकांमुळे मिळाली आहेत. नातं हे खरंच ईश्वराच्या दरबारातूनच येत असतं. म्हणूनच एखाद्याविषयी एकाएकी प्रेम, उमाळा कां दाटून यावा याचं उत्तर असं आहे की जननान्तर सौहृदानी. कोणत्याशा जन्मात द्यायचं राहिलेलं प्रेम या जन्मात समोर ठाकतं म्हणतात.

तेरा मुझसे है पहले का नाता कोई

यूँही नहीं दिल लुभाता कोई

असं म्हणावंसं वाटतं ते म्हणूनच.

- अॅड.अपर्णा परांजपे-प्रभु

Advertisement
Tags :

.