सावगाव रोडवरील केएचबी कॉलनीत समस्यांचा डोंगर
कॉलनीला नेमका वाली कोण? सर्वसामान्य जनतेचा प्रश्न
बेळगाव : सावगाव रोडवर कर्नाटक गृहनिर्माण मंडळाने कॉलनी उभी केली. मात्र ही कॉलनी झाल्यानंतर त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे. याकडे कोणत्याच मूलभूत सुविधा दिल्या जात नाहीत. त्यामुळे या कॉलनीतील नागरिक अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत. तेव्हा तातडीने या समस्या दूर कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे. कर्नाटक गृहनिर्माण मंडळाने जनतेकडून पैसे घेऊन या कॉलनीची उभारणी केली. उभारणी करताना अनेक आश्वासने दिली गेली. लोकांकडून पैसे घेतले. मात्र आता याकडे दुर्लक्ष केले आहे. या परिसरात पाणीपुरवठा योग्यप्रकारे होत नाही. याचबरोबर विजेची समस्या आहे. रस्ते आणि गटारी नाहीत. अनेक ठिकाणी पाणी साचून राहात आहे. भटकी कुत्री व मोकाट जनावरांनी या परिसरात हैदोस घातला आहे. सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. तेव्हा तातडीने ही समस्या सोडवावी, अशी मागणी करण्यात येत आहे. पाणी नसल्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या खासगी टँकरधारकांकडून पाणी खरेदी करावे लागत आहे. प्रत्येक टँकरला 600 रुपये खर्च द्यावा लागत आहे. महत्त्वाचे म्हणजे ही कॉलनी कोणाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. याबाबत ठोस माहिती दिली जात नाही. बेनकनहळ्ळी ग्राम पंचायतकडे अधिकार दिल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, आमच्याकडे पूर्णपणे हस्तांतर करण्यात आले नसल्याचे ग्रा. पं. पीडीओ सांगत आहेत. त्यामुळे आम्ही न्याय कुणाकडे मागायचा, असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.
रात्रीच्यावेळी ये-जा करणेदेखील अवघड
दरम्यान, या कॉलनीमध्ये अनेक ठिकाणी गवत वाढले आहे. रस्ते नसल्यामुळे रात्रीच्यावेळी ये-जा करणेदेखील अवघड झाले आहे. कॉलेजचे तरुण-तरुणी याठिकाणी येऊन अश्लील चाळेदेखील करत आहेत. याबाबत पोलिसांकडे तक्रारदेखील करण्यात आली. मात्र त्यांनीही याकडे सोयिस्कर दुर्लक्ष केले आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्याही वाढल्या आहेत. त्यामुळे तातडीने या कॉलनीच्या समस्यांकडे जिल्हाधिकाऱ्यांनीच लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.