पाकच्या पहिल्या डावात 556 धावांचा डोंगर
शफीक, मसूद, आगा यांची शतके, लीचचे 3 बळी, इंग्लंड 1 बाद 96
वृत्तसंस्था/ मुल्तान
पहिल्या क्रिकेट कसोटीत मंगळवारी खेळाच्या दुसऱ्या दिवशी यजमान पाकने पहिल्या डावात 556 धावांचा डोंगर उभा केल्यानंतर इंग्लंडने दिवसअखेर 20 षटकात 1 बाद 96 धावा जमविल्या. पाकच्या डावामध्ये शफीक, मसूद आणि सलमान आगा यांनी शतके झळकविली तर शकिलने 82 धावांची खेळी केली. फलंदाजीस अनकुल असलेल्या खेळपट्टीवर इंग्लंडने शेवटच्या तासभरात आक्रमक फटकेबाजी केली.
पाकने 4 बाद 328 या धावसंख्येवरुन दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. पण सलमान अली आगाचे नाबाद शतक आणि सौद शकीलची 82 धावांची खेळी यामुळे पाक संघाने पहिल्या डावात 556 धावा जमविल्या. वेगवान तसेच फिरकी गोलंदाजांना या खेळपट्टीकडून म्हणावी तशी साथ मिळाली नाही. दरम्यान पाकचा पहिला डाव 149 षटकात 556 धावांवर खेळाच्या शेवटच्या सत्रात आटोपल्यानंतर इंग्लंडच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. इंग्लंडचा हंगामी कर्णधार ऑलीपॉप दुसऱ्याच षटकातील दुसऱ्याच चेंडूवर खाते उघडण्यापूर्वीच बाद झाला. नसीम शहाने त्याला जमालकरवी झेलबाद केले. पण त्यानंतर क्रॉले आणि रुट यांनी आक्रमक फटकेबाजी केली. क्रॉलेने 11 चौकारांसह 64 चेंडूत नाबाद 64 तर रुटने 2 चौकारांसह नाबाद 32 धावा जमविल्या. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी अभेद्य 92 धावांची भागिदारी केली.
इंग्लंड संघातून कसोटी पदार्पण करणाऱ्या कार्सेला पहिला बळी मिळविण्यासाठी खूपच वाट पहावी लागली. त्याने पाकच्या पहिल्या डावात 74 धावांत 2 गडी बाद केले. अॅटकिनसनने 99 धावांत 2 तर वोक्सने 69 धावांत 1 गडी बाद केला. जॅक लिचने प्रभावी गोलंदाजी करताना 160 धावांत 3 तर रुटने 25 धावांत 1 तसेच बशीरने 124 धावांत 1 गडी बाद केला. मुल्तानच्या हिरवळ असलेल्या खेळपट्टीवर चेंडू रिव्हर्स स्विंग होत नव्हता. त्यामुळे इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगलेच झगडावे लागले. पण उपाहारापर्यंतच्या पहिल्या सत्रात इंग्लंडच्या गोलंदाजांनी 69 धावांमध्ये पाकचे 2 गडी बाद केले. नाईट वॉचमन म्हणून मैदानात आलेला नसीम शहा कार्सेच्या गोलंदाजीवर ब्रुककरवी झेलबाद झाला. कार्सेचा हा कसोटीतील पहिला बळी ठरला. शहाने 81 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारासह 33 धावा जमविल्या. तब्बल दीड तासानंतर इंग्लंडला हे पहिले यश मिळाले. जॅक लीचने मोहम्मद रिझवानला खाते उघडण्यापूर्वी झेलबाद केले. उपाहारावेळी पाकने 112 षटकात 6 बाद 397 धावा जमविल्या होत्या.
खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये पाकने 118 धावांची भर घालताना आणखी दोन गडी गमविले. सौद शकीलने नाबाद 35 धावांवरुन खेळाला पुढे प्रारंभ केला, त्याने बशीरच्या गोलंदाजीवर स्वीपचा चौकार मारुन आपले अर्धशतक पूर्ण केले. सौद शकील आणि सलमान आगा यांनी सातव्या गड्यासाठी 57 धावांची भागिदारी केली. बशीरने सौद शकीलला रुटकरवी झेलबाद केले. त्याने 177 चेंडूत 8 चौकारांसह 82 धावा झळकविल्या. पाकने 500 धावा 614 चेंडूत फलकावर लावल्या. आगा सलमान आणि शाहीन आफ्रिदी या जोडीने नवव्या गड्यासाठी 85 धावांची महत्वपूर्ण भागिदारी केली. सलमान आगाने 119 चेंडूत 3 षटकार आणि 10 चौकारांसह नाबाद 104 धावा झळकविल्या तर लीचने आफ्रिदीचा त्रिफळा उडविला. त्याने 49 चेंडूत 1 षटकार आण 2 चौकारांसह 26 धावा केल्या. रुटने अब्रार अहम्मदला 3 धावांवर झेलबाद केले. चहापानानंतर तासाभराच्या कालावधीत पाकचा पहिला डाव आटोपला.
या सामन्यात कर्णधार पदाची जबाबदारी सोपविलेल्या पोपला आपले खाते उघडता आले नाही. नसीम शहाच्या चेंडूवर तो जमालकरवी झेलबाद झाला. सलामीचा फलंदाज बेन डकेटच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाल्याने पोपला क्रॉले समवेत सलामीला फलंदाजीस यावे लागले. इंग्लंडचे अर्धशतक 64 चेंडूत नोंदविले गेले. इंग्लंडचा संघ दुसऱ्या दिवसाअखेर 460 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 9 गडी खेळावयाचे आहेत.
संक्षिप्त धावफलक: पाक प. डाव 149 षटकात सर्वबाद 556 (शफीक 102, शान मसूद 151, सलमान आगा 104, सौद शकील 82, नसीम शहा 33, शाहीन आफ्रिदी 26, अवांतर 14 लीच 3-160, अॅटकिनसन 2-90, कार्से 2-74, वोक्स 1-69, बशीर 1-124, रुट 1-25), इंग्लंड प. डाव 20 षटकात 1 बाद 96 (क्रॉले खेळत आहे 64, पोप 0, रुट खेळत आहे 32, नसीम शहा 1-29)