न्यूझीलंडकडून 511 धावांचा डोंगर
रचिन रविंद्रचे शानदार द्विशतक : ब्रँडचे 6 बळी
वृत्तसंस्था/ माऊंट माँगेनुई
दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असून उभय संघात येथे सुरू झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत सोमवारी खेळाच्या दुसऱ्या दिवशी यजमान न्यूझीलंडने पहिल्या डावात 511 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर दक्षिण अफ्रिकेची पहिल्या डावात स्थिती 4 बाद 80 अशी केविलवाणी झाली आहे. न्यूझीलंड संघातील रचिन रविंद्रने शानदार द्विशतक (240) तर विल्यम्सनने शतक (118) झळकविले.
या पहिल्या कसोटीत न्यूझीलंडने 2 बाद 258 या धावसंख्येवरुन सोमवारी दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. विल्यम्सन आणि रचिन रविंद्र यांनी तिसऱ्या गड्यासाठी 242 धावांची द्विशतकी भागिदारी केली. विल्यम्सनने 289 चेंडूत 16 चौकारांसह 118 धावा जमविल्या. रचिन रविंद्रने 366 चेंडूत 3 षटकार आणि 26 चौकारांसह 240 धावा झोडपल्या. कसोटी क्रिकेटमधील रचिन रविंद्रची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. विल्यम्सन बाद झाल्यानंतर रचिन रविंद्र आणि मिचेल यांनी चौथ्या गड्यासाठी 103 धावांची शतकी भागिदारी केली. मिचेलने 1 षटकार आणि 3 चौकारांसह 34 धावा जमविल्या. फिलिप्सने 2 षटकार आणि 2 चौकारांसह 39 तर हेन्रीने 3 षटकार आणि 1 चौकारासह 27 धावा जमविल्या. न्यूझीलंडचा पहिला डाव 144 षटकात 511 धावांवर आटोपला. दक्षिण आफ्रिकेतर्फे नील ब्रँडने 119 धावात 6 तर स्वेर्टने 61 धावात 2 तसेच मोर्की आणि पॅटर्सन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
न्यूझीलंडच्या अचूक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव गडगडला. दिवसअखेर त्यांनी 28 षटकात 4 बाद 80 धावा जमविल्या होत्या. सलामीच्या मूरने 4 चौकारांसह 23, कर्णधार निल ब्रँडने 4, हमझाने 4 चौकारांसह 22 धावा केल्या. टोनडेरला खातेही उघडता आले नाही. बेडिंगहॅम 5 चौकारांसह 29 तर पीटरसन 2 धावावर खेळत आहे. न्यूझीलंडचा संघ या कसोटीत भक्कम स्थितीत असून दक्षिण आफ्रिकेचा संघ अद्याप 431 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 6 गडी खेळावयाचे आहेत.
संक्षिप्त धावफलक - न्यूझीलंड प. डाव 144 षटकात सर्व बाद 511 (रचिन रविंद्र 240, विल्यम्सन 118, मिचेल 34, फिलिप्स 39, लॅथम 20, ब्लंडेल 11, हेन्री 27, अवांतर 11, नील ब्रँड 6-119, स्वेर्ट 2-61, मोर्की, पॅटरसन प्रत्येकी 1 बळी), दक्षिण आफ्रिका प. डाव 28 षटकात 4 बाद 80 (मुर 23, हमझा 22, बेडिंगहॅम खेळत आहे 29, जेमिसन 2-21, हेन्री 1-15, सँटेनर 1-13).