बर्मुडा ट्राएंगलपेक्षा रहस्यमय सागरी भाग
जगासाठी बर्मुडा ट्राएंगल अद्याप रहस्य आहे. या भागात पोहोचताच जहाजं का गायब होतात या प्रश्नाचे उत्तर कुणाकडेच नाही. बहुतांश लोक एकाच बर्मुडा ट्राएंगलविषयी जाणत असावेत. परंतु जपानच्या एका सागरी भागालाही बर्मुडा ट्राएंगल या नावाने ओळखले जाते. 2012 मध्ये चीनमधून एक जहाज जपानच्या दिशेने जात होते, परंतु ते किनाऱ्यापर्यंत पोहोचले नाही. यानंतर चीनच्या तपास यंत्रणांनी या जहाजाचा शोध सुरू केला. अनेक वर्षांपर्यंत एमव्ही एल जी नावाचे जहाज आणि त्यावरील 19 सदस्यांचा शोध घेण्यात आला, परंतु काहीच हाती लागले नाही. यानंतर या भागाला जगाचा बर्मुडा ट्राएंगल म्हटले जाऊ लागले. मध्य जपानच्या या सागरी क्षेत्राला अत्यंत धोकादायक मानले जाते. येथे 10 हून अधिक जहाजं गायब झाली आहेत.
जपानच्या या धोकादायक भागाला ‘डेव्हिल सी’ नावाने ओळखले जाते. चीनचे प्राध्यापक आणि पॅरानॉर्मल अॅक्टिव्हिटीज तज्ञाने या रहस्यमय भागाविषयी चकित करणारा दावा केला होता. त्यांनी याला जगाचा दुसरा बर्मुडा ट्राएंगल ठरविले. डेव्हिल सीचे हे क्षेत्र बर्मुडा ट्राएंगलप्रमाणेच त्रिकोणी आहे. याचमुळे याला जगाचे दुसरे बर्मुडा ट्राएंगल मानले जाऊ लागले. या क्षेत्रात रहस्यमय घटना घडल्याने जपान सरकारने या पूर्ण सागरी क्षेत्राला प्रतिबंधित घोषित केले आहे. ज्याप्रकारच्या रहस्यमय घटना येथे घडतात, त्यामागे सागरी ड्रॅगनचा हात असल्याचे लोक मानतात. येथे अनेक वर्षांपासून रहस्यमय घटना घडत आहेत. 1955 मध्ये जपानच्या लढाऊ विमानासमवेत 9 जहाज या भागातून अचानक गायब झाली होती. या जहाजांना शोधण्यासाठी जपानने स्वत:चे एक विशेष विमान पाठविले होते, ते देखील रहस्यमय पद्धतीने गायब झाले. या घटनांच्या नंतर या भागात जाण्यावर मज्जाव करण्यात आला.