एक महिना ‘अज्ञातवास’
‘गृहस्थाश्रमी’, अर्थात संसारी मनुष्य अधिकाधिक वेळ आपल्या कुटुंबासमवेत राहण्याचा प्रयत्न करतो, हे आपल्याला माहीत आहे. सेवा किंवा व्यवसायाचा कालावधी वगळता त्याला कुटंबातच व्यतीत करणे आवडते. अगदीच काही विशेष कारणांमुळे तो कुटुंबापासून दूर असतो. प्रवासाला जायचे असले तरी शक्यतो कुटुंबासह सहल किंवा पर्यटन करण्याकडे त्याचा मोठा कल असतोच.
तथापि, नायजेरिया या देशाचा नागरीक असणारा अदामू सालिसू नावाच्या गृहस्थाची पद्धत आणि आवड जगावेगळी आहे. तो केवळ 35 वर्षांचा आहे. त्याला पत्नी आणि अपत्ये आहेत. तथापि, तो प्रत्येक वर्षी 1 महिना आपल्या कुटुंबापासून दूर राहतो. या काळात तो आपल्या कुटुंबाशी संपर्कही ठेवत नाही. मोबाईलवरुनही आपली पत्नी किंवा अपत्यांशी बोलत नाही. हा महिनाभराचा वेळ तो केवळ स्वत:साठी देतो. त्याचा पत्नीशी किंवा कुटुंबातील अन्य व्यक्तींशी वाद आहे, म्हणून तो असे करीत नाही. त्याचे या सर्वांशी संबंध अत्यंत प्रेमाचे आणि जवळीकीचे आहेत. तरीही त्याने हा स्वत:च निर्माण केलेला प्रघात पाळला आहे.
एक प्रकारे तो वर्षातील 1 महिना ‘अज्ञातवासा’तच असतो, असे म्हटल्यास वावगे ठरु नये. या काळात तो कुटुंबापासून कमीत कमी 200 किलोमीटरचे अंतर राखतो. याचे कारणही त्याने स्पष्ट केले आहे. कुटुंबापासून दूर राहिल्याने कुटुंबाचे महत्व आपल्याला कळते. कुटुंबाचा कंटाळा येत नाही. शिवाय स्वत:शी संवाद साधण्याची आणि आत्मपरीक्षण करण्याची सुविधा त्याला प्राप्त होते. यामुळे आपली ऊर्जा वाढते आणि संसाराचा शीण येत नाही, असे त्याचे म्हणण्s आहे. त्याच्या कुटुंबाचेही त्याला या उपक्रमात पूर्ण सहकार्य आहे. या त्याच्या अज्ञातवासाच्या काळाचा लाभ कुटुंबालाही होतो, असे त्याची पत्नी स्पष्ट करते. या त्याच्या उपक्रमामुळे तो त्याच्या देशात प्रसिद्ध असून लोक त्याची प्रशंसाही करतात.