महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वजनकाट्यांच्या रुपांतरण प्रक्रियेमध्येच घोळ; दुध संस्थांमधील वजनकाट्यांचा घोळ कायम

03:57 PM Nov 29, 2023 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

वैधमापनच्या पुणे येथील बैठकीत सर्व सहनियंत्रकांनी व्यक्त केली भूमिका; वजनकाटे ग्रॅममधून लिटरमध्ये रूपांतरीत करताना होतेय मापात पाप; अन्य राज्यात दुधाचे माप किलोग्रॅममध्येच; महाराष्ट्रातही थेट किलोग्रॅममध्ये दूधाचे वजन घेण्याचा सूर

कृष्णात चौगले कोल्हापूर

प्राथमिक दुध संस्थांमध्ये दुध संकलनासाठी वापरले जाणारे वजनकाटे हे किलोग्रॅममध्ये मोजमाप करणारे आहेत. पण दुधाचे वजन लिटरमध्ये घेतले जात असल्यामुळे सदरचे वजनकाटे किलोग्रॅममधून मिलीलीटरमध्ये रूपांतरीत (कन्वर्जन) केले जातात. या रूपांतरण प्रक्रियेमध्ये दुधाचे वजन 100 ग्रॅम झाल्यास त्याचे वजन 97.270 मिली असणे आवश्यक आहे. पण कोल्हापूर जिह्यातील अनेक दुध संस्थांमध्ये 100 ग्रॅम दुधाचे वजन केल्यास ते 92.00 आणि 95.00 इतके कमी दाखवले जाते. या रूपांतरण प्रक्रियेमध्येच दुध संस्थांकडून वजनात मोठ्या प्रमाणात मापात पाप केले जात असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. परिणामी गुजरात व कर्नाटक राज्याप्रमाणे थेट किलोग्रॅममध्येच वजन करण्याची तरतूद करावी, अशी मागणी पुणे विभागातील सर्व जिह्यामधील सहाय्यक वैधमापन नियंत्रकांसह संभाजी ब्रिगेडच्या प्रतिनिधींनी वैधमापनचे सहनियंत्रक डॉ.सु.ह.चाटे यांच्याकडे केली.

Advertisement

दुध संकलनासाठी वापरल्या जाणाऱ्या वजनकाट्यांच्या माध्यमातून दुध उत्पादक शेतकऱ्यांची लूट होत असल्याची बाब ‘तरुण भारत संवाद’च्या प्रस्तुत प्रतिनिधींनी उघडकीस आणली. त्यानंतर संभाजी ब्रिगेडचे प्रतिनिधी रूपेश पाटील यांनी दुध संस्थांमधील वजनकाटे 100 ग्रॅमऐवजी 10 ग्रॅम अचूकतेचे करण्याबाबत वैधमापनशास्त्र विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला. त्यामुळे याबाबत योग्य चौकशी करून निर्णय घेण्यासाठी नुकतीच त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली. या समितीची मंगळवारी पुणे येथे बैठक झाली. पुणे येथील वैधमापनशास्त्रचे सहनियंत्रक डॉ. चाटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत संभाजी ब्रिगेडच्या प्रतिनिधीसह पुणे विभागातील सर्व जिह्यांमधील वैधमापनशास्त्र विभागाचे सहाय्यक नियंत्रक आणि दुध संकलन केंद्राचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Advertisement

या बैठकीत दुध संस्थांसह सर्वच वापरातील वजनकाटे हे 10 ग्रॅम अचूकतेचे असताना त्यामध्ये बेकायदेशीररित्या फेरफार करून ते 100 ग्रॅमचे केलेच कसे जाते ? तसेच किलोग्रॅममध्ये वजन दर्शविणाऱ्या काट्यांचे मिलीलीटरमध्ये रूपांतरण करतानाही ते 97.270 मिलीलीटर करण्याऐवजी 92.00 इतके कमी दाखवले जात असल्याचे अनेक सहाय्यक नियंत्रकांनी बैठकीत स्पष्ट केले. कोल्हापूर जिह्यात तर अशा पद्धतीने बेकायदेशीरपणे रूपांतरण केलेल्या सुमारे 100 हून अधिक दुध संस्थांवर कारवाई केली असल्याचे संबंधित सहाय्यक नियंत्रकांनी सांगितले. मुळात राज्यातील बारामतीसह अन्य जिह्यातील दुध संस्थांमधील वजनकाटे हे नियमाप्रमाणे 10 ग्रॅम अचूकतेचे ठेवले असताना केवळ कोल्हापूरातच ते 100 ग्रॅम अचूकतेचे का केले जातात, असा सवाल या बैठकीत उपस्थित करण्यात आला. सदरचे बेकायदेशीर फेरबदल कृत्य करण्याचा मक्ता कोल्हापूर जिह्यातील वजनकाटा दुरुस्त संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने घेतला असल्याचे यावेळी अप्रत्यक्षरित्या स्पष्ट झाले.

दुधाचे माप लिटरऐवजी किलोग्रॅममध्येच आवश्यक
जिह्यात सुमारे 10 हजार दुध संस्था आहेत. राज्यातील अन्य जिह्यातही जवळपास अशीच स्थिती आहे. या संस्थांच्या तुलनेत वैधमापनशास्त्र विभागात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या फार कमी आहे. परिणामी तेथील वजनकाटे पडताळणी आणि तपासणीसाठी पुरेसा वेळ देणे शक्य नाही. त्यामुळे राज्यातील सर्वच दुध संस्थांमध्ये दुधाचे माप हे मिलीलीटर ऐवजी किलोग्रॅममध्येच घ्यावे. यामध्ये दुध संस्थांकडून रुपांतरण प्रक्रियेच्या माध्यमातून केला जाणारा घोटाळा पूर्णपणे बंद होईल असा भूमिका पुणे विभागातील वैधमापनच्या सहाय्यक नियंत्रकांसह संभाजी ब्रिगेडच्या प्रतिनिधींनी मांडली.

सील असलेल्या वजनकाट्यांमध्ये केला जातोय फेरफार
वैधमापनशास्त्र विभागाचे अधिकारी अथवा संबंधित दुरुस्तकांकडून वजनकाट्यांची पडताळणी करून ते प्रमाणित केल्यानंतर तारेने सील केले जातात. त्यामुळे मशीनचे झाकण उघडून त्यामध्ये फेरबदल करणे अशक्य असायला हवे. पण संबंधित अधिकाऱ्यांनी वजनकाटा सील केल्यानंतरही दुध संस्थांमधील कर्मचारी तो सहजपणे खोलून त्यामध्ये फेरबदल करत असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. तसेच वजनकाट्यांवरील कॅलीबरेशन आणि प्रोग्रॅमचा स्वीच डिस्प्लेच्या आत असणे आवश्यक आहे. पण या दोन्ही प्रोग्रॅमचे बटण थेट डिस्पेवरच असल्यामुळे वजनांमध्ये सहजपणे फेरफार केला जात आहे. त्यामुळे बेकायदेशीररित्या वजनकाटे प्रमाणित करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी आणि दुधाचे वजन किलोग्रॅममध्येच करण्यासाठी बंधनकारक करणे आवश्यक आहे.

रुपेश पाटील, प्रतिनिधी, संभाजी ब्रिगेड

Advertisement
Next Article