For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नको त्या ठिकाणी रमणाऱ्या चित्ताला तेथून काढावे

06:56 AM Dec 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
नको त्या ठिकाणी रमणाऱ्या चित्ताला तेथून काढावे
Advertisement

अध्याय पाचवा

Advertisement

बाप्पा म्हणाले, आपण कर्ता नाही ही खूणगाठ मनाशी पक्की ठेवावी पण तसे करण्यात त्याचा अभिमान आणि अहंकार आडवा येतो. कोणतीही गोष्ट आपण स्वबळावर करू शकतो असा फाजील आत्मविश्वास त्याला वाटत असतो. म्हणून माणसाने सतत ईश्वराच्या स्मरणात स्वत:ला गुंतवून घ्यावे. मनुष्य जसजसा ईश्वराच्या जास्तीतजास्त अनुसंधानात राहण्याचा प्रयत्न करेल तितक्या प्रमाणात त्याचा अभिमान आणि अहंकार दूर होईल. परिणामी ईश्वराचं कर्तेपण त्याला अधिकाधिक पटत जाईल. आयुष्यात तो ध्येयधोरणे जरूर बाळगेल पण मी ती पूर्ण करीनंच असा अट्टहास करणार नाही. तेव्हा स्वत:ला संपूर्ण त्याच्यावर सोपवावे. सदैव त्याच्या स्मरणात राहून जशी प्रेरणा होईल तसे कार्य करत गेल्यास त्यातून जे घडेल ते आपल्या हिताचंच आहे ही खात्री होत जाते. परिणामी तो निर्धास्त होतो. हे असं निर्धास्त होण्यासाठी चित्ताला वळण लावणं आवश्यक आहे. असं बाप्पा आपण सध्या अभ्यासत असलेल्या

ततस्ततऽ कृषेदेतद्यत्र यत्रानुगच्छति ।

Advertisement

धृत्यात्मवशगं कुर्याच्चित्तं चञ्चलमादृतऽ ।। 14 ।।

ह्या श्लोकात सांगत आहेत. त्यानुसार हे चंचल चित्त जेथे जेथे जात असेल तेथून चिकाटीने आणि आदराने ओढून योगाचे ठिकाणी आणावे व धैर्याने ते आपल्या ताब्यात राहील असे करावे.

चित्त हे चंचल आहे ते सतत कोणत्या ना कोणत्या विषयाचा विचार करत असते. एखादी गोष्ट हवीशी वाटली की, ती मिळेल की नाही याची सतत ते चिंता करत असते. म्हणून त्याला चित्त म्हणतात. एखाद्याला काही समजावून सांगायचे असले की, त्याच्याशी फार समजुतीने घ्यायचे असते. त्याला अंजारून गोंजारून गोड शब्दात तू शहाणा आहेस असं म्हणत आपलं म्हणणं त्याच्या गळ्यात उतरवायचं असतं. मी सांगतोय ते ऐकलस तर तुझं भलं होईल असं सांगावं लागतं आणि हा प्रयत्न पुन:पुन्हा करावा लागतो. याबाबतीत संत मंडळींचा हात कुणीही धरू शकणार नाही. वास्तविक पाहता त्यांना आत्मज्ञान आधीच झालेले असते पण ते प्रवचन, कीर्तन ऐकायला समोर बसलेल्या श्रोत्यांना तुम्ही माझे मायबाप आहात, गुणांची खाण आहात तुम्हाला सर्व कळतंय असं म्हणून सुरवात करतात. वास्तविक समोरच्यांना काही कळत नसतं म्हणून तर संत उपदेश करत असतात. ते म्हणतात, श्रोतेहो तुम्ही चित्ताला ताब्यात ठेवण्यासाठी त्याला समजावून सांगा, बाबारे तुझी विषयांकडची ओढ मी समजू शकतो. कारण गेले कित्येक जन्म तुला लागलेली विषयांची आवड सहजी सुटण्यासारखी नाही. तरीपण त्यात थोडा बदल करून चांगल्या विषयात लक्ष घाल. करमणुकीच्या विषयात सतत लक्ष घालण्यापेक्षा ईश्वर चिंतनात लक्ष घाल. कारण ते अंतिमत: फायद्याचं आहे. असं वारंवार त्याला समजावून सांगितलं तर हळूहळू त्याच्या वृत्तीत बदल होत जातो. चित्ताला चुचकारून न बोलता हिडीसफिडीस केलं तर ते बंड करतं आणि दुप्पट जोमाने विषयांच्या पाठी लागतं. म्हणून हा अभ्यास मोठ्या चिकाटीने करावा लागतो. नको त्या ठिकाणी रमणाऱ्या चित्ताला तेथून ओढून काढणे हाच अभ्यास होय आणि हा वारंवार करणे हीच तपश्चर्या असं श्रीगोंदवलेकर महाराजही सांगतात. असं वारंवार सांगण्याच्या प्रयत्नातून चित्त हळूहळू आपल्याला अपेक्षित असलेल्या ईश्वर स्मरणात रमू लागतं. त्याची निरनिराळ्या इच्छांच्या मागं धावण्याची, लोकप्रियता मिळवण्याची वृत्ती हळूहळू कमी होत जाते आणि एकदा का त्याच्या लक्षात आलं की, हा विषय सोडून इतर नाश पावणाऱ्या विषयात रमण्यात काहीच अर्थ नाही की, मग ते ईश्वराचाच ध्यास घेतं. बाप्पांच्या म्हणण्याला भगवद्गीतेत भगवंतही दुजोरा देतात ते भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायात ते म्हणतात, अभ्यास आणि वैराग्य यामुळे मनावर काबू मिळवता येतो. संयमवंतास वरील उपायाने हे साध्य होते.

क्रमश:

Advertisement
Tags :

.