Sangli : कुरळप गावात पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला; चार ते पाच जण जखमी
कुरळप गावात कुत्र्यांच्या चाव्यामुळे भीतीचे वातावरण
कुरळप : (ता. वाळवा) करंजवडे येथे पिसाळलेल्या कुत्र्याने चार ते पाच नागरिकांना चावा घेतला आहे. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून लहान मुलांच्या बाबतीत फारच धोक्याचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यानच्या काळात मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
गेल्या चार दिवसापूर्वी ऐतवडे बुद्रुकच्या दिशेकडून एक पिसाळले कुत्रे गावात शिरले. कुत्रे गावात शिरताना दिसेल त्या नागरिकांच्या अंगावर जाऊन जावा घेण्याचा प्रयत्न करत होते. त्यासोबतच गावातील इतर मोकाट असणाऱ्या कुत्र्यांनाही ते चावा घेत होते. तसेच ते पुढे मारुती मंदिर, गावाच्या प्रमुख चौकामध्ये पोहोचले. त्या ठिकाणी चौकात बसलेल्या लोकांना त्या कुत्र्याकडून चावा घेण्यात आला. डोंगरवाडी कोपऱ्यावरती ज्येष्ठ नागरिक निवांत बसले होते. त्यांना सुद्धा या कुत्र्याकडून चावा घेतला गेला.
कुत्रे अंगावरती अचानक धावून आल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना पळताही आले नाही. बसल्या जागेवरती पिसाळलेल्या कुत्र्याकडून ज्येष्ठ नागरिकांच्या पिंढऱ्या तसेच पायाला चावा घेतला. त्यामुळे डोंगरवाडी कोपरा व मारुती मंदिरा समोर अचानक गलबलाट व दंगा सुरू झाला. कुणाला काहीच कळत नव्हते की, काय व्हायला लागले आहे. लोकांची गर्दी वाढायला लागली. त्यावेळेला काही उपस्थित लोकांनी व युवकांनी त्या कुत्र्याला हाकलण्याचा प्रयत्न केला.
दरम्यानच्या काळात गावात मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांची नसबंदी करण्यात यावी व मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी गावातील नागरिकांकडून निवेदनाव्दारे करंजवडे ग्रामपंचायतीकडे करण्यात आलेली आहे. ज्या नागरिकांना पिसाळलेल्या कुत्र्यांकडून चावा घेण्यात आलेला आहे. त्या काही नागरिकांनी खासगी रुग्णालयात तर काहींनी सरकारी रुग्णालयात उपचार घेतले आहेत. तरीही काळजी म्हणून मोकाट कुत्र्यांच्याकडून सावधगिरी बाळगावी, असे आवाहन नाभिक समाजाचे वाळवा तालुकाध्यक्ष सुहास ताटे यांच्याकडून करण्यात आले आहे.