सकल हिंदू समाजाचा कोल्हापुरात मोर्चा
कोल्हापूर :
बांगलादेशात हिंदूवर अत्याचार होत आहेत, तेथील हिंदू असुरक्षित आहेत. बांगलादेशातील हिंदूच्या जीवित संपत्ती, आणि धार्मिक स्थळांचे संरक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून ठोस पावले उचलावीत, यासाठी सकल हिंदू समाजाच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढून हिंदू रक्षा आंदोलन करण्यात आले. यावेळी बांगलादेशच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूवर होत असलेल्या अत्याचारावर जगभरातून टीका होत आहे. संन्यासी चिन्मय कृष्ण दास यांनी अल्पसंख्याक हिंदूवरील अत्याचाराधा निषेध केला म्हणून त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरून त्यांना अटक केली आहे. भारतानेही या घटनेचा निषेध केला आहे. बांगलादेशात 4 ते 20 ऑगस्ट दरम्यान 10 जिल्ह्यांमध्ये हिंदूंवर 22 हजारांहून अधिक जातीय हल्ले झाले. यामध्ये हिंदूची घरे, व्यवसाय आणि हिंदू मंदिरांवरील हल्ल्यांचा समावेश आहे. हिंदू महिलांवर अत्याचार करण्यात आले. हिंदूवर अत्याचार होत असताना बांगलादेशाचे लष्करच त्या अत्याचारांना सहकार्य करत असल्याचे सी.सी.टी.व्ही. कॅमेरे मोडून काढतानाचे दृश्य समोर आले आहे. बांगलादेशातील नागरी सुरक्षेसाठी असणाऱ्या राज्य संस्थाच हिंदूवर होत असलेल्या अत्याचारास सहाय्य करताना समोर आले आहे. परिणामी जगभरातील मानवाधिकार संस्थांनी याबाबत चिंता व्यक्त करत येणाऱ्या काळात हे हल्ले थांबवण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत तर संपूर्ण हिंदू समाजाचे बांगलादेशातील अस्तित्व धोक्यात येईल, अशी भीती वर्तवली आहे.
भारताने एक राष्ट्र म्हणून बांगलादेशमध्ये असुरक्षित असलेल्या हिंदूना मानवाधिकारांचे संरक्षण मिळण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत, याकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. ‘जय श्रीराम’चा नारा देत बांगलादेशचा निषेध केला. यावेळी भाजपचे महेश जाधव, राहुल चिकोडे, रुपाराणी निकम, किशोर घाटगे यांची भाषणे झाली. बांगलादेशात होत असलेल्या अत्याचारामुळे तेथील हिंदू असुरक्षित बनला आहे. यामुळे बांगलादेशवर कारवाई करुन अल्पसंख्याक हिंदूंना न्याय द्यावा, अत्याचार थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य भूमिका घेऊन अल्पसंख्याक हिंदू हिताचे योग्य ते पाऊल उचलावे, अशा मागण्या केल्या.
यावेळी इस्कॉनच्यावतीने भजन करण्यात आले. बांगलादेशच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. शिष्टमंडळाने प्रांताधिकारी संपत खिलारी यांना निवेदन दिले.
आंदोलनात हिंदू एकता आंदोलनाचे अध्यक्ष दीपक देसाई, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुंदन पाटील, राहुल चिकोडे, महेश जाधव, अनिरुध्द कोल्हापुरे, संभाजी भोकरे, रुपाराणी निकम, डॉ. प्रकाश बांदिवडेकर, अभिजित पाटील, गजानन तोडकर, उदय भोसले, शिवानंद स्वामी, माजी नगरसेवक सत्यजित कदम, किरण इदाते, आनंदराव पवळ, निरंजन शिंदे, राजेंद्र तोरस्कर, प्रसन्ना, शिंदे, योगेश केळकर, कार्यकर्ते सहभागी झाले होते.