मानवी पेशींचा तयार होतोय नकाशा
मानवी शरीरात 37 लाख कोटी पेशी
मानवी शरीराला सुमारे 36-37 लाख कोटी पेशींनी मिळून तयार केले आहे. यातील प्रत्येक पेशीचे काम वेगळे आहे. या पेशी मृत होतात, जिवंत होत असतात. ऊर्जा प्रदान करत राहतात, तसेच नवे जीवन देत राहतात. आता वैज्ञानिक या सर्व पेशींचा नकाशा तयार करू पाहत आहेत.
यात प्रत्येक पेशींचा तपशील असेल आणि त्याविषयी सर्व माहिती असणार आहे. वेगवेगळ्या पेशींशी निगडित समसया, आजार रोखण्यासाठी हे सर्व केले जात आहे. विकास, प्रतिरोधक क्षमता यासारख्या गोष्टी यामुळे प्रभावी करता येणार आहेत. हे जर शक्य झाले तर भविष्यात माणूस जवळपास अमर ठरू शकतो. किंवा आयुष्यभरात त्याला कुठलाही आजार होणार नाही. वैज्ञानिकांनी आतापर्यंत 10 कोटी पेशींचा तपशील जमविला आहे.
या पेशींचा तपशील जगभरातील 10 हजार लोकांच्या शरीरातून मिळविण्यात आला आहे. हे लोक 100 वेगवेगळ्या देशांमधील आहेत. म्हणजेच वेगवेगळ्या देशांमध्ये राहत असलेल्या लोकांच्या शरीरातील समानता आणि भिन्नता ओळखता येणार आहेत. त्यांची भौगोलिक स्थिती आणि जेनेटिक पार्श्वभूमीच्या आधारावर त्यांच्या प्रत्येक पेशीचे काम जाणून घेतले जाणार आहे.
दोन वर्षांमध्ये तयार होणार
केवळ दोन वर्षांमध्ये म्हणजेच 2026 साली वैज्ञानिक ह्यूमन सेल अॅटलस पूर्ण करतील, यात प्रत्येक पेशीचे लोकेशन, ओळख आणि काम सर्व काही नमूद असते. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यात पेशी कशाप्रकारे काम करतात हे देखील कळणार आहे. हा नकाशा प्रारंभिक असून यानंतर आणखी संशोधन केले जाणार आहे. यातून माणसाला चांगले अन् दीर्घ आयुष्य मिळवून देण्याचे उद्दिष्ट आहे.
एचसीएशी निगडित वैज्ञानिकांनी 40 संशोधनपत्रं तयार केली असून याद्वारे अॅटलसची पहिली प्रत तयार केली जाणार आहे. हा अहवाल अलिकडेच नेचर या नियतकालिकात प्रकाशित करण्यात आला आहे. यात अनेक अवयव आणि त्यांची सिस्टीम दर्शविण्यात आली आहे. यात फुफ्फुस, मेंदू आणि त्वचा या सर्वांचे कॉम्प्युटेशनल टूल देखील आहे.
गुगल मॅपप्रमाणे असणार स्वरुप
एचसीएचे संस्थापक अवीव रेगेव यांनी हा मानवी शरीराच्या पारंपरिक नकाशापेक्षा वेगळा आणि आधुनिक अॅटलस असणार असल्याचे सांगितले आहे. तुमच्याकडे 15 व्या शतकातील नकाशा आहे असे समजा, तुम्ही त्याच्या मदतीने कितीकाळ चालू शकाल, याचमुळे अत्याधुनिक गुगल मॅपची गरज आहे. अशाच प्रकारे मानवी शरीराच्या अत्याधुनिक नकाशाची गरज आहे. आम्ही मानवी शरीराच्या नकाशाला गुगल मॅपप्रमाणेच तयार करणार आहोत असे अवीव रेगेव यांनी म्हटले आहे.