मायेचा त्याग केलेला मनुष्य ब्रह्मपदी आरूढ होतो
अध्याय पहिला
सृष्टीनिर्मिती, तसेच तिचे चलनवलन हे सर्व बाप्पांच्या अधिकारात चालत असले तरी ते केवळ साक्षी असल्याचे सांगून झाल्यावर बाप्पा सांगतात की, परब्रह्म मीच असून नाना प्रकारची बुद्धी व मोहमयी सिद्धी असे माझ्या मायेचे स्वरूप आहे. या मायेच्या प्रभावामुळे मनुष्य षड्रिपूंच्या कचाट्यात सापडून जन्ममृत्युच्या फेऱ्यात अडकतो. आत्मज्ञान त्याला षड्रिपूंच्या कचाट्यातून सोडवून ब्रह्मावस्था प्राप्त करून देते असे बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.
सर्वदा षड्विकारेषु तानियं योजयेत् भृशम् ।
हित्वाजापटलं जन्तुरनेकैर्जन्मभि: शनै: ।। 30 ।।
अर्थ-ही माया सर्वदा त्यांना कामक्रोधादि सहा विकारांचे ठिकाणी अत्यंत युक्त करते. अनेक जन्मांमध्ये हळु हळु मायापटलाचा त्याग करून प्राणी विषयांचे ठिकाणी विरक्त झाल्यावर उत्तम ज्ञानाच्या योगाने ब्रह्म पावतो. विवरण-मागील श्लोकात बाप्पांनी सांगितलं की, विविध प्रकारची बुद्धी व मोहमयी सिद्धी असे मायेचे स्वरूप आहे. ही माया परब्रह्माचा अंश असलेल्या जीवाला षड्रिपूंच्या कचाट्यात अडकवते. माणसाच्या बुद्धीचे दोन भाग असतात. त्यातील पहिला भाग योग्य काय व अयोग्य काय ते सांगतो तर दुसरा भाग निरनिराळ्या गोष्टींची इच्छा करतो आणि त्या मिळवण्यासाठी मनाला इंद्रियांची अनुकूल हालचाल करायला भाग पाडतो. त्याला निरनिराळ्या इच्छा होण्यासाठी मोह, लोभ, मत्सर आदि षड्रिपूंचे सहाय्य लाभते. त्यायोगे हवे ते पदरात पाडून घ्यायचा मनुष्य प्रयत्न करतो. जे मिळते ते स्वत: मिळवले या नादात मिळालेल्या गोष्टींचा म्हणजेच प्राप्त झालेल्या सिद्धीचा हवा तसा उपभोग घेतो पण यातून मिळणारा आनंद तात्पुरता आहे हे लक्षात आलं की, तो कायम टिकणारा आनंद कशात आहे हे शोधण्याच्या मागे लागतो. हा मनुष्याच्या आयुष्यातला मैलाचा दगड किंवा टर्निंग पॉईंट असे म्हणता येईल. इथं त्याच्या लक्षात येतं की, आपल्याला मिळालेल्या सिद्धी या स्वत:चं कर्तृत्व नसून ईश्वराचं देणं आहे आणि ईश्वराचं देणं असलेल्या सिद्धी आपल्याला आनंद देतात. म्हणजेच ईश्वर हा आनंदाचा ठेवा असला पाहिजे. म्हणून त्याला भेटण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं त्याला वाटू लागतं.
माणसाचं मन मोठं हट्टी असतं. एकदा एक गोष्ट त्याच्या मनानं घेतली की, त्याला त्याचा ध्यास लागतो आणि ती गोष्ट मिळवण्यासाठी त्याची धडपड सुरू होते. मग इतर सर्व इच्छा आकांक्षा आपोआपच मागे पडतात. त्याला जर ईश्वराचं आनंदी स्वरूप जाणून घ्यायची इच्छा झाली तर त्याच्यावर असलेली काम, क्रोध, मद, मोह, लोभ, मत्सर या षड्रिपुंची सत्ता हळूहळू कमी व्हायला लागते कारण जसजसं ईश्वर प्राप्तीचे प्रयत्न सुरू होतात तसतसं लक्षात येऊ लागतं की, मी कर्ता नसून ईश्वर सर्व गोष्टी माझ्याकडून करून घेत आहे मग मी इच्छा करून त्या पूर्ण झाल्या नाहीत तर का दु:ख करतोय? हे विचार प्रबळ होतात. परिणामी बुद्धीचा इच्छा करणारा भाग निरपेक्षतेकडे झुकू लागतो. बुद्धीचा उर्वरित भाग मनुष्याला विवेक म्हणजे योग्य काय, अयोग्य काय हे सांगत असतो. हे सर्व लक्षात येऊन त्याबरहुकूम कारवाई करण्यासाठी माणसाची बुद्धी अनुकूल होते. त्याचा विवेक जागृत होतो. याला ईश्वरी उपासनेची सुरवात म्हणता येईल. अर्थातच माणसाच्या बुद्धीतला हा बदल सहजासहजी होत नसल्याने तो घडून यायला अनेक जन्म जावे लागतात. यामध्ये मुंगीच्या पावलाने अगदी हळूहळू प्रगती होत असते. एक मात्र नक्की आहे की, याजन्मी जेव्हढी प्रगती झाली असेल त्यापुढील टप्प्यावरची उपासना पुढील जन्मात सुरू होते. माणसानं या जन्मात मिळवलेलं शाळा कॉलेजातील शिक्षण, मानमरातब, पैसाअडका, घरदार, पत्नी मुलेबाळे इत्यादि इत्यादि गोष्टी पुढील जन्मात बरोबर येत नाहीत पण केलेली उपासना मात्र बरोबर येत असते.
क्रमश: