29 वर्षांपासून जंगलात राहणारा व्यक्ती
कारण जाणून घेतल्यावर विचारात पडाल
जपानचे मासाफुमी नागासाकी यांनी स्वतःच्या जीवनात काही असे काम केले आहे, ज्याबद्दल आमच्यापैकी बहुतांश जण केवळ स्वप्नच पाहू शकतात. 87 वर्षीय जपानी नागरिक मासाफुमी नागासाकी यांना ‘नागा साधू’ म्हणून ओळखले जाते. त्यांनी जवळपास 3 दशकं एकटय़ानेच ट्रॉपिकल आयलँडवर काढली आहेत. वयाच्या 50 व्या वर्षी नागासाकी हे स्वतःच्या छायाचित्रणाच्या कामाला वैतागले होते.
1989 मध्ये त्यांनी पत्नी आणि दोन मुलांपासून दूर जात सोतोबनारी येथे पोहोचले. हे बेट जपानच्या मुख्य भूमीपासून शेकडो किलोमीटर अंतरावर आहे. या बेटावर पेयजलचा स्रोत नाही. या बेटावर नागासाकी हे एकमात्र रहिवासी होते. त्यांनी सोतोबनारीला स्वतःच्या नव्या घरात बदलून टाकले आणि 29 वर्षांपर्यंत तेथे एकटेच राहिले.
2018 साली एका मच्छिमाराला समुद्रकिनाऱयावर नागासाकी हे बेशुद्धावस्थेत आढळून आले होते, त्यानंतर त्यांना बेटावरून बाहेर नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत उपचाराची गरज असल्याचे म्हटले होते. याचवेळी त्यांची कहाणी जगासमोर आली होती. 87 वर्षीय नागासाकी आता सोतोबनारी येथे राहत नाहीत. परंतु अलिकडेच त्यांना या बेटाची आठवण झाली.इशिगाकी शहरात चार वर्षे राहिल्यावर नागासाकी हे 16 जून रोजी या बेटावर परतले. 87 वर्षीय नागासाकी किनाऱयाला स्पर्श करताच भावुक झाले होते.