For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मनुष्याने निष्काम कर्मे करावीत

06:30 AM May 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
मनुष्याने निष्काम कर्मे करावीत
Advertisement

अध्याय पहिला

Advertisement

माणसाचं जन्ममृत्यूचं अखंड चालू असलेलं चक्र थांबवण्यासाठी बाप्पांनी सांगितलं की, माणसानं वाट्याला आलेलं कर्म कोणत्याही फळाची अपेक्षा न करता मला अर्पण करावं आणि जे काही फळ मिळेल त्याचा माझा प्रसाद म्हणून आनंदानं स्वीकार करावा. मिळालेलं फळ आनंदानं स्वीकारण्याचे कारण म्हणजे मी जी गोष्ट देत असतो ती माणसाचे भले कशात आहे ह्याचा विचार करूनच देत असतो. म्हणून जो कर्म करून ते मला अर्पण करेल त्याचं नवीन प्रारब्ध तयार होणार नाही व हळूहळू त्याची चित्तशुद्धी होत जाईल. चित्तशुद्धी कशाला म्हणतात ते पाहू. मनात येणाऱ्या विचारांवर चिंतन करण्याची प्रक्रिया चित्तात सुरु असते. त्या चिंतनानुसार मनुष्याला राग, लोभ, मद, मोह, मत्सर आदि विकार ग्रासून टाकतात. त्यामुळे तो अस्वस्थ होतो. जर कर्म करत असताना मनात फळाविषयी विचार आले नाहीत तर चित्त त्यावर चिंतन करणार नाही. त्यामुळे शुध्द झालेले चित्त वर सांगितलेल्या विकारांनी ग्रस्त होणार नाही. अशा शांत मनात परमेश्वराचे प्रतिबिंब उमटते आणि विलक्षण अशा मन:शांतीचा माणसाला अनुभव येतो. या चित्तशुद्धीबाबत बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.

चित्तशुद्धिश्च महती विज्ञानसाधिका भवेत् ।

Advertisement

विज्ञानेन हि विज्ञातं परं ब्रह्म मुनीश्वरै: ।। 37 ।।

अर्थ-चित्तशुद्धी विज्ञान अनुभवयुक्त ज्ञाऩ साधून देईल. मुनिश्रेष्ठांनी विज्ञानाचे योगाने श्रेष्ठ ब्रह्म जाणले आहे. विवरण-मनुष्याला एखादी गोष्ट पटली तरी तो ती चटकन अंगी बाणवतोच असं नाही. म्हणून बाप्पा सांगतात, मी सांगितलंय तशी कर्मे मला अर्पण करायला सुरुवात तर करा म्हणजे हळूहळू तुमची चित्तशुद्धी होत राहील. ही कर्मे मला अर्पण करण्याची इच्छा तसेच सगळ्यांच्याकडे समबुद्धीने पाहणे हे साधण्यासाठी माणसाला माझ्या पूर्ण स्वरूपाचे ज्ञान झाले पाहिजे. यासाठी पिंड ब्रह्मांडाचे ज्ञान, सृष्टीची उत्पत्ती, जगत जगदीश संबंध, जीवात्मा परमात्मा यांचे स्वरूप, त्यांचा परस्परसंबंध इत्यादि अनेक विषयांचे ज्ञान झाले पाहिजे. यालाच ज्ञान विज्ञान असं म्हणतात. हे झाल्याखेरीज कर्मयोग पक्का होत नाही आणि दुसरं म्हणजे या सगळ्याचं आकलन चित्तशुद्धीच्या प्रमाणात होत राहतं. जेवढी चित्तशुद्धी वाढेल त्याप्रमाणात ज्ञानात भर पडेल. एव्हढं सांगितल्यावर पुढील श्लोकातून बाप्पा पुन्हा एकदा आधीच सांगितलेला धडा घोटवून घेत आहेत.

तस्मात्कर्माणि कुर्वीत बुद्धियुक्तो नराधिप ।

न त्वकर्मा भवेत्कोपि स्वधर्मत्यागवांस्तथा ।।38।।

अर्थ-म्हणून हे राजा, बुद्धिमान् मनुष्याने कर्मे मदर्पण अथवा निष्कामपणे करावीत, तसेच कोणी अकर्मी होऊ नये, स्वधर्मत्यागी होऊ नये विवरण-इथं आणखी एक महत्त्वाचा मुद्दा बाप्पा सांगत आहेत तो म्हणजे कर्मे त्यांना अर्पण करायची, फळाची अपेक्षा करायची नाही म्हंटल्यावर माणसाचं कर्म करायची इच्छाच संपून जाण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन ते सांगतायत की, वाट्याला आलेली कर्मे कुणी टाळू नयेत. कारण नवीन कर्मे करण्याचा अधिकार फक्त मनुष्ययोनीत प्राप्त होतो. इतर कोणत्याही योनीत नवीन कर्मे करता येत नाहीत. कर्म आणि कर्मफळाचा संबंध स्पष्ट करताना बाप्पा पुढे सांगतात की, कर्म न करता तसेच बसल्यास आळस वाढतो आणि कर्म टाळायची प्रवृत्ती तमोगुण वाढवते व नवीन बंधनाला जन्म देते. कर्म आणि फळ यांचा संबंध जोडत गेल्यास रजोगुण वाढतो पण फळाची अपेक्षा न करता कर्म केल्यास बुद्धियुक्त कर्म घडून विवेकजन्य सुख मिळते, प्रकाश मिळतो, ज्ञान मिळते व सत्वगुणाची वृद्धी होते. तम आणि रजोगुणामुळे जन्ममृत्यूचं चक्र चालू राहतं. हे थांबवणं माणसाच्याच हातात आहे.

क्रमश:

Advertisement
Tags :

.