For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माणसाने श्रेष्ठ पद मिळवावे

06:20 AM Aug 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
माणसाने श्रेष्ठ पद मिळवावे
Advertisement

अध्याय दुसरा

Advertisement

बाप्पा म्हणाले, इंद्रिये नेहमी मनाच्या ताब्यात असतात. मनाची इच्छा नसेल तर कितीही आकर्षक गोष्टी पुढं मांडल्या तरी मनाला त्यांची भुरळ पडत नाही. असा अनुभव आपण नेहमीच घेत असतो. समजा तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामाला निघाला आहात आणि वाटेत तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींचे दुकान आहे. इतरवेळी तुम्ही नवीन काय काय आले आहे हे पाहण्यासाठी उत्सुकतेने त्या दुकानात डोकावत असता परंतु आत्ता तुम्ही अत्यंत महत्त्वाच्या कामाला निघालेला असल्याने तुम्ही त्या दुकानाकडे दुर्लक्ष करून पुढे निघून जाता. दुकानावरून जात असताना डोळ्यांनी खुणावले तरी त्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही पुढे जाता. अशावेळी मनावर तुम्ही ताबा मिळवलेला असतो. मन ताब्यात आलं की, इंद्रिये आपोआप ताब्यात येतात. म्हणून मनाला समजावणं फार महत्त्वाचं आहे. वस्तू नुसती पाहून ती हवीच असे न ठरवता तिची योग्यायोग्यता तपासून पहावी व ती जर अयोग्य असेल तर मनाची समजूत घालावी म्हणजे त्याकडे तुमचे आपोआप दुर्लक्ष होते व सर्वनाश होण्याचा टळतो. त्यासाठी पुढील गोष्टी लक्षात घ्याव्यात. ज्ञानेंद्रिये श्रेष्ठ असली तरी मन त्यापेक्षा श्रेष्ठ आहे कारण इंद्रिये ही मनाच्या इच्छेनुसार काम करतात. पण मनाला हवी वाटलेली वस्तू जवळ असणं बरोबर आहे की नाही ते बुद्धी ठरवते म्हणजेच मनाहून बुद्धी श्रेष्ठ झाली आणि ही बुद्धी देणाऱ्या ईश्वराचा आत्म्याच्या रूपाने आपल्या शरीरात असलेला अंश सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून माणसाने ईश्वराने दिलेली बुद्धी स्वार्थ साधण्यासाठी, त्यासाठी वेडीवाकडी कृत्ये खुबीने करण्यासाठी खर्च न करता तिचा उपयोग करून आत्म्याला जाणण्याचा प्रयत्न करावा असं बाप्पानी पुढील श्लोकात सांगितलंय

बुद्ध्वैवमात्मनात्मानं संस्तभ्यात्मानमात्मना ।

Advertisement

हत्वा शत्रुं कामरूपं परं पदमवाप्नुयात् ।। 43 ।।

अर्थ-याप्रकारे बुद्धीने आत्म्याला जाणून, स्वत: मनाचे संयमन करून, कामरूपी शत्रूला ठार करून माणसाने श्रेष्ठ पद मिळवावे.

विवरण-मनुष्य शरीरातील इंद्रिये, मन, बुद्धी आणि आत्मा यापैकी आत्मा हा सर्वश्रेष्ठ आहे. आत्म्याच्यारूपाने ईश्वर आपल्या शरीरात वास करत असतो. अर्थातच तो केवळ साक्षी असल्याने तो स्वत: तटस्थ वृत्तीने आपलं मन कसा विचार करतंय, बुद्धी त्याला कोणतं मार्गदर्शन करतीये, मनाच्या आज्ञेनुसार इंद्रिये कशी काम करताहेत हे सर्व तो केवळ पहात असतो. आत्म्याला म्हणजेच आपल्यातील ईश्वरी अंशाला ईश्वर स्वरूपात विलीन होण्याची अत्यंत ओढ असते पण ह्याबाबतीत स्वत: काही करू शकत नसल्याने तो माणसाच्या स्वभावावर विसंबून असतो. आपला आत्मा सध्याचे आयुष्य संपल्यावर ईश्वरात विलीन होणार की आपल्या अतृप्त इच्छा घेऊन दुसऱ्या शरीरात प्रवेश करणार हे आपली प्रत्येक कृती ठरवत असते. ही गोष्ट लक्षात घेतली की, आपल्याला प्रत्येक कृती किती जबाबदारीने करावी लागेल हा विचार मनात येतो. जर आपण बेजबाबदारपणे वागलो तर आपला आत्मा आपल्या मृत्युनंतर मुक्त न होता दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो व तेथून मुक्तता होण्याची वाट पहात राहतो.

हे टाळण्यासाठी आपल्याला होणाऱ्या इच्छा योग्य आहेत की नाहीत हे बुद्धीच्या निकषावर तपासून पहावं व योग्य आहेत असा कौल मिळाला तरच त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. त्या पूर्ण झाल्याच पाहिजेत असा अट्टहास नसावा. कर्मयोगात सांगितल्याप्रमाणे जे फळ मिळेल ते समाधानानं स्वीकारावं. असे वागल्यास आपलं वागणं निरपेक्ष होऊन कामरूपी शत्रूचा निप्पात होईल. परिणामी आपल्यालाही ध्रुवाप्रमाणे अढळ पदाची म्हणजे जिथून आपल्याला कुणी उठ म्हणणार नाही अशा पदाची प्राप्ती होईल.

श्रीगणेशगीता अध्याय दुसरा समाप्त

Advertisement
Tags :

.