For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजपा आणि ठाकरेना धक्का

06:34 AM Sep 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
भाजपा आणि ठाकरेना धक्का
Advertisement

भाजपा आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना अडचणीत येईल. महाराष्ट्रातील मतदार या दोन पक्षांना धक्का देतील असा आणखी एक सर्वे पुढे आला आहे. या सर्वेत एकनाथ शिंदे यांची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस उत्तम यश मिळवेल असे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. अजित पवार यांना राज्यात दोन अंकी यश मिळवणं अवघड जाईल असे हा सर्वे सांगतो. एकुणच युतीला दणका आणि महाआघाडीची सरशी असा अंदाज काढण्यात आला आहे. महाआघाडी बहुमत मिळवेल आणि कॉंग्रेस मोठा भाऊ असेल व राहुल गांधी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री निश्चित करतील असे ढोबळ चित्र समोर आले आहे. या सर्वेत कोकणात थोडीफार युती बऱ्या जागा घेईल पण विदर्भ, मराठवाडा, मुंबई, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र अशा सर्व विभागात भाजप महायुतीला दणका बसेल असे दिसते आहे. महायुतीत कॉंग्रेस मोठा भाऊ असणार हे दिसते आहे पण चेहरा कोण असणार हे पक्के नाही. कुणाला वाटते पृथ्वीराज चव्हाण, कुणाला वाटते बाळासाहेब थोरात, कुणाला वाटते विश्वजीत कदम तर काहींना वाटते वर्षा गायकवाड. ओघानेच चेहरा निश्चित झालेला नाही आणि कॉंग्रेस शेवटच्या क्षणापर्यंत तो जाहीर करणार नाही मात्र कॉंग्रेस कमबॅक करते आहे असा हा आणि असे जाहीर झालेले दोन चार सर्वे सांगत आहेत. सर्वे म्हणजे निकाल नव्हे ती शितावरून भाताची परीक्षा असते ती तंतोतंत होते असे नाही. लोकसभा व अनेकवेळा असे सर्वे तोंडावर पडले आहेत. यावेळी काय होते ते बघायचे पण महाराष्ट्रात रोज वेगळी हवा वाहत असते. बदलापूर घटनेमुळे महायुतीला जोरदार धक्का बसला. जोडेमारपर्यंत हे प्रकरण गेले. त्या नंतर सिंधुदुर्ग पुतळा प्रकरणाच्या घटनेमुळे तर चक्क पंतप्रधानांना माफी मागावी लागली. लाडकी बहीण, लाडका भाऊ अशा रेवड्या वाटून काही जमवण्यासाठी पाऊले टाकलीच होती. त्यातून श्रेयवादाचे नाटक सुरु झाले, अजितदादानी स्वतंत्र मेळावे घेतले. योजनेच्या नावातून मुख्यमंत्री शब्द वगळला. त्यामुळे महायुतीत संघर्ष झाला. अजितदादांचे बोलण्यात बोलणे नाही. त्यांच्या बोलण्यामुळे ते महायुतीत राहतात का? बारामतीची जागा लढवणार का? पवार कुटुंबियांचे नेमके काय सुरू आहे? असे अनेक सवाल सुरू आहेत. शरद पवार यांच्या मनात काय आहे. कोणता चेहरा आहे याचा कोणताही अंदाज नाही. मध्यंतरी त्यांनी भाजप विरोधी छोट्या पक्षांनी कॉंग्रेसमध्ये विलीन व्हावे असे विधान केले होते. शरद पवार बोलतात, त्यामागे त्यांचा हेतू वेगळा असतो. ते बंदूक एकावर रोखतात आणि गोळी दुसऱ्याला मारतात, ते बारामतीला जाणार म्हणून घोषणा करतात आणि कागलला पोहचतात. ओघाने त्यांचा थांग कोणालाच लागत नाही. निवडणूक व्यूहरचनाकार प्रशांत किशोर यांनी मध्यंतरी राष्ट्रवादीसाठी काम करावे यासाठी पावले टाकण्यात आली होती. पण त्यांनाही पवार कळले नाहीत. पवारांच्या मनात काय आहे त्यांना कोणता चेहरा हवा आहे याचा कोणालाच अंदाज नाही पण ते देवेंद्र फडणवीस यांना धक्का देणार, उद्धव ठाकरे यांना पुन्हा संधी देणार नाहीत, हे स्पष्ट आहे. एकेकाळची त्यांना घायाळ करुन सत्ता वंचित करणारी भाजप सेना युती त्यांना सलती असे दिसते आहे. त्यामुळेच या निवडणुकीत भाजप, उद्धव ठाकरे शिवसेना अडचणीत आहे. मनोज जरांगे यांनी  देवेंद्र फडणवीस यांना केलेले लक्ष हे कुणी काही म्हणो त्यामागे जे अदृश्य हात आहेत ते जगजाहीर आहेत. ओघानेच निवडणुकीच्या आणि त्यानंतरच्या सत्तेच्या चाव्या आपल्याकडे ठेवणार हे उघड आहे, मोठा भाऊ कुणी असो. राज्याभिषेक कुणाचा करायचा हे ठरवण्याची शक्ती आपल्याकडे असली पाहिजे अशी त्यांची पावले पडत आहेत. महायुतीला अनेक रेवड्या वाटूनही यशाची खात्री वाटत नाही. त्यामागे भाजपाचे कचखाऊ धोरण आणि सत्तेसाठी स्वप्रतिमा हनन ही कारणे आहेत. शेतकऱ्यांना पिकमालाला उत्तम भाव आणि नैसर्गिक आपत्तीत तात्काळ मदत मिळत नाही हे दु:ख आहे. फोडाफोडीचे राजकारण व पातळी सोडून होणारी टिका टिपणी यालाही महाराष्ट्र कंटाळला आहे. यावेळी जातीच्या पेट्या नाचल्या नाहीत तर मतदान अत्यल्प होईल अशी जाणकारांची भविष्यवाणी आहे. पण मराठा, ओबीसी, मागास, इतरमागास, मुस्लिम अशा मतपेट्या जाग्या केल्या जात आहेत, त्यांची मोळी कोण बांधणार हे बघावे लागेल पण शरद पवारांचा अंदाज कुणालाच नाही. कॉंग्रेसमध्ये छोट्या पक्षांनी विलीन व्हावे ही शरद पवारांची सुचना कोणता पक्ष अंमलात आणतो हे बघायचे पण काहीही होऊ शकते. निवडणुकीची अद्याप घोषणा नाही पण महिना अखेरीस ती अपेक्षित आहे. महाराष्ट्र प्रस्थापित राजकारणाला व नेत्यांना कंटाळला आहे. राज्याला नवा चेहरा आणि महाराष्ट्र सर्वार्थाने समर्थ करणारे नेतृत्व हवे आहे पण तसे कुणी पुढे येत नाही. राजकारणाच्या चिखलात व जाती पातीच्या खुज्या खांद्यावर बंदुका उंचावणारे जात दांडगे, धनदांडगे दुर्देवाने पुढे आहेत. त्यामुळे मतदारांना चांगले पर्याय पुढे येताना दिसत नाहीत, तूर्त जे सर्वे जाहीर झालेत त्यांच्यानुसार महाआघाडी पुढे आहे, महायुती मागे पडली आहे, भाजप, शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट बॅकफुटवर दिसतो आहे. काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट द्वितीय क्रमांकावरचा पक्ष राहील असे तर्क आहेत. राज्यात शेतकरी, युवक, छोटे उद्योजक, मुस्लिम मतपेटी अस्वस्थ आहे. अजून निवडणूका ज़ाहीर नाहीत. पक्षपंधरवड्यानंतर निवडणूक घोषणा होईल तेव्हा कसे वारे वाहते, मुद्दा कोणता होतो व लाभ कोण उचलतो हे बघावे लागेल पण मतदार निवडून देतील तेच सरकार सत्तारुढ होईल असे नाही, निवडून आलेले सहा सात पक्षांचे आमदार कशा टोळ्या करतील, पुन्हा नवी मोट कशी बांधतील, यावरच पुढचा खेळ असेल हे मात्र पक्के आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.