Solapur : सोलापुरात सावकाराच्या जाचाला कंटाळून रेल्वेखाली एकाची आत्महत्या
सावकारांच्या ताणाखाली सोलापूर रहिवाशीचे संपले जीवन
सोलापूर : सावकाराच्या जाचाला कंटाळून धावत्या रेल्वेखाली येऊन एकाने आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास विजापूर रस्त्यावरील छत्रपती संभाजी तलाब जवळील रेल्वे रुळावर घडली.
जुबेर अ.मशाक शेख (वय-४३, रा. राहुल गाधी झोपडपट्टी सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. जुबेर है शुक्रवारी दुपारी रेल्वे स्टेशन मीटर नं.४५६/३६ इलेक्ट्रीक पोलच्या बाजूला ही आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी व्हिडीओ करुन तो सोशल मीडियावर व्हायरल केला.
या व्हिडीओमध्ये त्यांनी म्हटले आहे की, मला जुगाराचा नाद लागला होता. त्यामुळे मी अनेक सावकारांकडून पैसे घेतले होते. त्याच्या व्याजाची रक्कम मी रोज परत करत होतो. पण माझेही काही पैसे येणार आहेत. मी याठिकाणी एकाही सावकाराचे नाव घेतलेले नाही.
परंतु मी मेल्यानंतर माझ्या घरच्यांना त्रास देऊ नये. माझ्या मित्रांकडून काही पैसे येणे आहेत. त्यांनी ते माझ्या आईच्या हातात आणून द्यावेत व मी ठेवलेल्या रिंगा सोडवून आणाव्यात, अशा आशयाचा व्हिडीओ करुन तो सोशल मीडियावर व्हायरल केला.
त्यानंतर तासाभरातच त्यांनी विजापूर रस्त्यावर असलेल्या छत्रपती संभाजी तलाव याठिकाणी असलेल्या रेल्वे रुळाखाली आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह तुकडे झालेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटल येथे मोठी गर्दी केली होती.