अरेबैल येथे लॉरी पलटल्याने वाहतूक ठप्प
कारवार : एका खड्ड्यामुळे राष्ट्रीय हमरस्त्यावरील वाहतूक सहा तास ठप्प होण्याची घटना गुरुवारी यल्लापूर तालुक्यातील अरेबैल येथे सकाळी घडली. याबाबत अधिक माहिती अशी, पेपरची वाहतूक करणारी लॉरी हुबळीहून केरळकडे राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 63 वरुन गुरुवारी सकाळी निघाली होती. यल्लापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अरेबैल घाटात रस्यावर पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्याला चुकविण्याच्या प्रयत्नात लॉरी चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्यावर पलटी झाले. त्यामुळे यल्लापूर आणि अंकोला दरम्यानची वाहतूक पूर्णपणे टप्प झाली होती. लॉरी पलटी झालेल्या ठिकाणापासून रस्त्यावरील दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. शेवटी सहा तासानंतर राष्ट्रीय हमरस्ता खात्याच्या कर्मचाऱ्यांना रस्त्यावर पलटी झालेली लॉरी बाजूला करण्यात यश आले आणि त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
...तर गटारी दुरुस्तीला प्राधान्य
प्रत्येकी दिवशी हजारो वाहने ये-जा करणाऱ्या हुबळी-अंकोला दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 वर मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याची डागडुजी प्राधान्याने करावी, अशी मागणी वाहन चालकांसह सर्वसामान्य जनतेतून केली जात आहे. तथापि, राष्ट्रीय हमरस्ता खात्याकडून रस्त्यावरील डागडुजी करायच्या ऐवजी गटारीची दुरुस्ती केली जात आहे. त्यामुळे चालकांना खड्डे चुकविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. कधी कधी रस्त्यावरच वाहने पलटी होऊन वाहतूक ठप्प होण्याच्या घटना घडतात. किमान आता तरी खड्ड्यांच्या दुरुस्तीकडे संबंधित खात्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.