महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

स्पेनमधील नैसर्गिक आपत्तीने दिलेला धडा

06:13 AM Nov 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

स्पेन या युरोपातील प्रगत देशात आठवड्यापूर्वी अतिवृष्टी, वादळ आणि पुराने थैमान घालून 218 हून अधिक नागरिकांचा बळी घेतला आहे. या जलप्रलयात अनेक नागरिक बेपत्ता झाले, विस्थापित झाले आणि मालमत्तेचीही मोठी हानी झाली. कचरा व चिखलाचे ढीग, दुभंगलेले रस्ते, वाहून गेलेले पूल, कोसळलेल्या इमारती अशा प्रकारचे उध्वस्तीकरण या काळात स्पेनच्या वाट्यास आले. या दरम्यान खंडीत वीज पुरवठा, पिण्याच्या पाण्याचा अभाव, कोलमडलेली संपर्क यंत्रणा अशी अपवादात्मक भयंकर स्थिती नागरिकांनी अनुभवली.

Advertisement

स्पेनच्या पूर्वेकडील काही भागात केवळ आठ तासातच वर्षभराइतका पाऊस कोसळल्याची नोंद झाली. व्हॅलेन्सिया प्रांतास अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुराचा सर्वाधिक फटका बसून बरीच वाताहात झाली. सदर आपत्तीमुळे लोकांचा राग इतका अनावर झाला की, पायपोर्ता विभागाची पाहणी करण्यास आलेल्या स्पेनचा राजा फेलिफ आणि राणी लेटिजिया यांच्यावर संतप्त लोकांनी चिखल फेकला व धक्काबुकी केली. स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ व प्रादेशिक नेतेही लोकक्षोभापासून सुटू शकले नाहीत.

Advertisement

व्हॅलेन्सिया प्रांताला जबर धक्का

व्हॅलेन्सिया प्रांतातील 33 हजार रहिवासी अजूनही या आपत्तीच्या भीषण परिणामांशी संघर्ष करीत आहेत. प्रांताच्या पश्चिमेस असलेल्या चिव्हा तालुक्यात केवळ आठ तासातच 20 इंच इतक्या पावसाची नोंद झाली. हवामान तज्ञांच्या मते प्रवाह रोधन प्रक्रियेतून निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्यामुळे स्पेनमध्ये अतिवृष्टी झाली. दक्षिण स्पेनच्या कॅडीझ आखातात प्रवाह रोधन निर्माण झाले की, उबदार, आर्द्र हवा भूमध्य सागरावरून स्पेनच्या पूर्व किनाऱ्यावर वाहण्यास सुरवात होते. आर्द्रतेने भरलेली ही हवा पर्वतांवर आदळून आकाशाकडे ढकलली जाते आणि पावसाळी ढगात परिवर्तीत होते. असे ढग मग व्हॅलेन्सिया प्रांतासह किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पाडतात. काही हवामान तज्ञांनी असा निष्कर्ष काढला आहे की, भूमध्य समुद्राच्या प्रमाणाहून अधिक उष्ण झालेल्या पृष्ठभागामुळे  स्पेनमध्ये अतिवृष्टी झाली. जेंव्हा समुद्र पृष्ठावरील पाणी अधिक उष्ण होते तेव्हा त्याचे अधिक प्रमाणात बाष्पीभवन होते. अलीकडील काही महिन्यात भूमध्य समुद्र अधिक उष्ण होता. ऑगस्टमध्ये त्याने नोंदीतील सर्वोच्च पातळी गाठली होती. स्वाभाविकपणे पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होऊन स्पेनमध्ये मुसळधार वृष्टी झाली.

दोन घटक कारणीभूत

गेल्या अनेक दशकानंतर स्पेनवर कोसळलेल्या या प्राणघातक नैसर्गिक आपत्तीचा शोकग्रस्त स्पॅनिश नागरिक आपापल्या दृष्टीकोनातून अर्थ लावू लागले. इतका भयंकर पाऊस आणि पूर का निर्माण झाला? इतकी प्राणहानी आणि वित्तहानी का झाली? अशा प्रश्नांनी ते चक्रावून गेले. काहीजणांना हे नशिबाचे भोग वाटले, काही जणांना अतिवृष्टी हा हवामान बदलाचा दृष्य परिणाम वाटला, तर इतर अनेकांनी प्रशासन व राजकीय नेतृत्वास दोषी ठरवले. या पार्श्वभूमीवर स्पेनवरील आपत्तीच्या अधिक खोलात जाता हवामान बदलांचा परिणाम आणि शासनकर्त्यांची दिरंगाई हे दोन्ही घटक दुर्घटनेस जबाबदार असल्याचे निदर्शनास येते.

इशाऱ्याकडे दुर्लक्ष

युरोपसह एकूणच वैश्विक उत्तरेत हा गैरसमज बळावला होता की, हवामान बदलासारख्या कोळसा, तेल, नैसर्गिक वायू जाळल्याने होणाऱ्या दुष्परिणामांचा प्रभाव वैश्विक दक्षिणेतील गरीब जनतेस हानी पोहचवण्या इतपतच मर्यादित आहे. त्याची झळ आपणांस बसणार नाही. या गैरसमजामुळे एक खोट्या सुरक्षेची भावना त्यांच्यात पसरली होती. खरे पाहता, युरोपातील अनेक संशोधकांनी, जीवाश्म इंधनाच्या जळण्याने जे उत्सर्जन होते, त्यातून हवामान तप्त होऊन पूर, अतिवृष्टी, वादळे, उष्णतेच्या लाटा, अवर्षण व दुष्काळ या आपत्तींना आमंत्रण मिळते असा निष्कर्ष पेंव्हाच काढला होता. त्याचे परिणाम पृथ्वीतलावरील साऱ्यांना भोगावे लागतील असा इशाराही दिला होता. परंतु स्पेनसह संपूर्ण युरोपाने त्याकडे दुर्लक्ष केले.

प्रशासन, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष

2003 साली युरोपात उष्णतेच्या लाटेने कहर केला होता. परंतु तेथील लोकांना या प्रकाराचा हवामान बदल समस्येशी काही संबंध आहे असे वाटले नाही. जर्मनीत 2021 साली अतिवृष्टी व पुरामुळे 184 लोकांचा बळी गेला. आता नैसर्गिक आपत्तीचा तडाखा स्पेनला बसला आहे. अशा सातत्याने घडणाऱ्या घटनांनी युरोपमध्येही हवामान बदलाच्या परिणामांविषयी गंभीर विचार आणि कृती करण्यासाठीचे वातावरण निर्माण होईल अशी अपेक्षा आहे. दुसऱ्या बाजूने स्पेनमधील जनतेने पूर परिस्थितीबाबत प्रशासन व राज्यकर्त्यांवर जो रोष दाखवला आहे, तो देखील वाजवी आहे, असेच म्हणावे लागेल. कारण, हवामान खात्याने अतिवृष्टीची शक्यता वर्तवूनही प्रशासन व राज्यकर्त्यांनी त्याची पुरेशी दखल घेतली नाही. पायपोर्ता जेथे 62 जण मृत्यूमुखी पडले, त्या विभागाच्या महापौराने, ‘अतिवृष्टी व पुराची शक्यता आहे. मात्र लोकांनी घाबरण्याचे कारण नाही.’ असे वक्तव्य प्रत्यक्ष दुर्घटनेपूर्वी केले. याच प्रकारचा गाफिलपणा स्पेनमधील इतर आपत्तीग्रस्त ठिकाणीही दिसून आला. नागरिक पाऊस आणि पुराने त्यांच्या निवासस्थानात, कार्यालयात, रस्त्यांवर वाहने चालवताना पुरेपूर पुराच्या पाण्यात अडकल्यानंतर कुठे प्रशासन जागे झाले आणि धोक्याच्या सूचना देण्यास सुरवात झाली. तोपर्यंत पाण्यात अडकलेल्या नागरिकांचे बळी जाऊ लागले होते. तसे पाहता अतिदक्षता सेवा विभाग हा हवामान खाते आणि आपत्तीग्रस्तातील महत्त्वपूर्ण दुवा असतो. आपत्ती प्रसंगी हा विभाग पूर्ण क्षमतेने कार्यरत हवा. त्याची सक्षमता वाढवणे ही सरकारची जबाबदारी आहे. हा अतिदक्षता सेवा विभाग स्पेनमध्ये अस्तित्वात होता. परंतु सत्ताबद्दल झाल्यानंतर तो निकामी करण्यात आला. विरोधी पक्षाने आणलेली योजना म्हणून जे विघातक राजकारण करण्यात आले त्यात नागरिकांचा बळी गेला.

कृतीची गरज

स्पेनवरील आपत्तीमधून पुन्हा एकदा हा धडा मिळाला आहे की, हवामान बदलाचे संकट हे खरे आहे. याची नोंद राज्यकर्त्यांनी सर्वप्रथम घेतली पाहिजे. आज 1.3 सेंटीग्रेड इतकी तापमानवाढ सर्वजण अनुभवत आहेत. आणखी 75 वर्षांनी तापमानवाढीचे प्रमाण 3 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत जाईल असा तज्ञांचा कयास आहे. याचाच अर्थ नैसर्गिक आपत्यांचे प्रमाण सर्वत्र वाढत जाणार आहे. तापमानवाढ आणि हवामान बदलाची दखल घेऊन आगामी संकट रोखण्याबाबतच्या कृती योजना व अंमलबजावणी धोरण जर योग्य तऱ्हेने आखले गेले नाही तर भविष्यकाळात नैसर्गिक प्रकोपांमुळे होणारी मनुष्य व वित्तहानी अटळ ठरणार आहे.

- अनिल आजगांवकर

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article