वरणगे पाडळी मध्ये झाडावर आढळला बिबट्या ; परिसरात घबराट
प्रयाग चिखली प्रतिनिधी
पाडळी येथील मधला माळ परिसरातील उसाच्या शेतीमध्ये पूर्ण वाढ झालेल्या बिबट्याचे दर्शन आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास झाले. यावेळी कुत्री पाठीमागे लागल्याने बिबट्या वीस ते पंचवीस फुटावर झाडावर जाऊन बसल्याचे मेंढपाळांना दिसले.बिबट्या सुमारे दीड ते दोन तास झाडावर होता. दरम्यान वन विभागाच्या पथकाने या बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो ऊस शेतीमध्ये पुन्हा प्रसार झाला या घटनेमुळे परिसरातील ऊसतोड कामगार शेतकरी मेंढपाळ सर्वच हबकले असून त्यांच्यात घबराट निर्माण झाली आहे.
पाडळी बुद्रुक गावातील मधला माळ परिसरात ऊस शेतीमध्ये बिबट्याचे दर्शन झाले येथील मेंढपाळ भैरवनाथ कळंत्रे व भरत कळंत्रे यांना सदरचा बिबट्या झाडावर सुमारे वीस पंचवीस फुटावर जाऊन बसल्या चे दिसून आले यावेळी झाडाखाली पाच ते सहा कुत्री भुंकत असल्याचे चित्र होते. कुत्र्यांच्या भुंकण्यामुळेच बिबट्या झाडावर चढला असावा. बिबट्याच्या दर्शनाने घाबरलेल्या मेंढपाळाने पाडळी बुद्रुकचे सरपंच शिवाजीराव गायकवाड यांना बिबट्याच्या आगमनाची फोनवरून माहिती दिली. त्यावेळेस सरपंचांनी तातडीने वनविभागाशी संपर्क साधून बिबट्या झाडावर असल्याचे सांगितले यावेळी वन्यजीव रक्षक दल तसेच छत्रपती वाइल्ड लाईफ फाउंडेशन यांच्या टीमने पाडळी बुद्रुक मध्ये तातडीने येऊन बिबट्याला जाळ्यात पकडण्याचा प्रयत्न सुरू केला काही काळानंतर बिबट्या झाडावरून खाली आला मात्र उसाच्या शेतीमध्ये पळून गेला. पाठी लागलेल्या कुत्र्यांवर बिबट्याने मोठा भीतीदायक आवाज करून हल्ला केल्याचेही समजते. यावेळी या परिसरात ऊसतोड सुरू असून मेंढपाळ तसेच शेतकऱ्यांची कामे जोराने चालू आहेत. यावेळी बिबट्याने काढलेला आवाज ऐकून अनेक जण सैरावैरा धावत असल्याचे चित्र पहावयास मिळाले.
बराच काळ झाडावर बसलेल्या या बिबट्याला पहावयास बघ्यांनी शिवारात गर्दी केली होती. यावेळी वन्यजीव बचाव दलाचे प्रदीप सुतार छत्रपती वाइल्डचे विनायक आळवेकर वनरक्षक कोमल रहाटे यांनी बिबट्याला पकडण्यासाठी सापळा रचला होता पाडळीचे सरपंच शिवाजी गायकवाड वरणगे चे उपसरपंच राजेंद्र पाटील यांनी ग्रामस्थांना तसेच शेतकरी शेतमजूर यांना बिबट्यापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.