वारसा सामर्थ्याचा, उदयगिरी अन् हिमगिरीचा
भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘आयएनएस उदयगिरी’ आणि ‘आयएनएस हिमगिरी’ या दोन बहुउद्देशीय युद्धनौका सामील झाल्या आहेत. आधुनिक उदयगिरीच्या नामकरणातून 1976 ते 2007 या काळात सेवा दिलेल्या जुन्या ‘आयएनएस उदयगिरी’च्या कामगिरीचा गौरव केला गेला. तर ‘हिमगिरी’च्या नामकरणातून 1974 ते 2005 या काळात सेवा दिलेल्या जुन्या हिमगिरीच्या कामगिरीचा सन्मान करण्यात आला आहे. दोन्ही युद्धनौका स्वदेशी बनावटीच्या आहेत. या दोन आघाडीच्या युद्धनौका असून प्रथमच एकाच वेळी नौदलात दाखल झाल्या आहेत. या युद्धनौकांच्या समावेशामुळे भारतीय युद्धनौका सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याबरोबरच सागरी हितांचे रक्षण होण्यास मदत होणार आहे. भारतीय नौदलाची क्षमता वाढविणाऱ्या या युद्धनौका असून भारत आपल्या सागरी सीमांचे रक्षण करण्यास पूर्णपणे सक्षम असल्याचा संदेश दिला आहे.
भारताचे वाढते जहाज बांधणी सामर्थ्य आणि स्वयंपूर्ण बनण्याच्या दिशेने वाटचालीतील एक प्रमुख टप्पा म्हणून ‘प्रोजेक्ट 17 ए’च्या दोन बहुउद्देशीय युद्धनौका ‘आयएनएस उदयगिरी’ आणि ‘आयएनएस हिमगिरी’ यांचा 26 ऑगस्ट 2025 रोजी विशाखापट्टणम येथील नौदल तळावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलात समावेश करण्यात आला. आयएनएस उदयगिरी युद्धनौका माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. (एमडीएल), मुंबई आणि आयएनएस हिमगिरी युद्धनौका गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स लि. (जीआरएसई), कोलकाता या दोन वेगवेगळ्या शिपयार्डस्नी स्वदेशी पद्धतीने बांधणी केल्या आहेत.
‘आयएनएस उदयगिरी’ आणि ‘आयएनएस हिमगिरी’ या प्रोजेक्ट 17 (शिवालिक श्रेणी) वर्गातील प्रमुख जहाज ‘आयएनएस नीलगिरी’च्या उत्तराधिकारी आहेत. यामध्ये सुधारित स्टेल्थ वैशिष्ट्यो, कमी रडार सिग्नेचर, टेहळणीसाठी प्रगत रडार आणि इलेक्ट्रॉनिक युद्धप्रणाली, सुपरसॉनिक पृष्ठभाग ते पृष्ठभाग क्षेपणास्त्रs, पृष्ठभागावरून हवेत मारा करण्याची क्षमता असलेली क्षेपणास्त्रs आणि रॅपिड-फायर गन प्रणाली समाविष्ट आहेत. दोन्ही जहाजांमध्ये एकत्रित डिझेल किंवा गॅस प्रोपल्शन प्लान्ट आणि अत्याधुनिक एकात्मिक प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणाली आहे, ज्यामुळे उच्चवेग आणि सुधारित इंधन कार्यक्षमता मिळते.
या युद्धनौका भारतीय नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोने स्वत: डिझाईन केल्या आहेत. तर भारतात निर्माण झालेल्या 100 व्या आणि 101 व्या युद्धनौका आहेत, ज्यात स्वदेशी सामग्री आणि स्वयंपूर्णता प्रतिबिंबित झाली आहे. यात भारतीय मूळ उपकरण उत्पादकांकडून प्रमुख शस्त्रs आणि सेन्सर्स खरेदी केल्याने 75 टक्केपेक्षा अधिक उच्च स्वदेशी सामग्री वापरणे शक्य झाले आहे.
नौदलाची क्षमता वाढणार
बहुउद्देशीय युद्धनौकांमुळे नौदलाची सागरी मोहिमांमध्ये राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्याची क्षमता वाढणार आहे. या युद्धनौका भावी पिढीतील शस्त्रs, सेन्सर्स यांनी सुसज्ज आहेत. या सोबतच युद्धपरिस्थितीत हवाई हल्ले प्रतिबंधक (अँटी-एअर), भूहल्ला प्रतिबंधक (अँटी-सर्फेस) आणि पाणबुडी हल्ला प्रतिबंधक (अँटी-सबमरीन) सुविधा त्यावर आहेत. समुद्री चाच्यांचा सामना करणे, तस्करी आणि बेकायदेशीर व्यापाराविऊद्ध लढा देणे, सागरी दहशतवाद रोखणे अथवा नैसर्गिक आपत्तीकाळात मदत पुरविणे यांसह जोखमीच्या कार्यात या युद्धनौका निर्णायक ठरणार आहेत.
अरबी समुद्रापासून मध्य पूर्व आणि पूर्व आफ्रिकी किनारपट्टीपर्यंत नौदलविषयक असंख्य घडामोडी होत असतात, अशा परिस्थितीत भारतीय नौदल देशाच्या हितांचे रक्षण करत आहे. नौदल राष्ट्रीय आर्थिक सुरक्षेचा एक प्रमुख आधारस्तंभ म्हणून उदयाला आले आहे.
नामकरणाची परंपरा
पूर्वीच्या गौरवशाली जहाजांच्या नावावरून नवीन जहाजांचे नामकरण करण्याची नौदलाची परंपरा आहे. ती यावेळीही जपण्यात आली आहे. नवीन आयएनएस उदयगिरी आणि आयएनएस हिमगिरी या युद्धनौकांना त्यांच्या आधीच्या युद्धनौकांची अभिमानास्पद नावे देण्यात आली आहेत. जुन्या युद्धनौकांनी अनेक दशके देशसेवा केली. भारताने आपल्या जुन्या नौकांच्या नावाने नव्या युद्धनौका निर्माण करण्याची एक परंपरा स्थापन केली आहे. तीस दशकांपूर्वी याच नावांच्या दोन युद्धनौका भारतीय नौदलात सेवारत होत्या. त्यांनी तीन दशके भारताच्या सागरी सीमांचे संरक्षण केले होते. नंतर त्यांना निवृत्त करण्यात आले होते. त्या युद्धनौकांच्या स्मृती जागत्या ठेवण्यासाठी त्यांची नावे या नव्या युद्धनौकांना देण्यात आली आहेत. आधुनिक ‘उदयगिरी’च्या नामकरणातून 1976 ते 2007 या काळात सेवा दिलेल्या जुन्या ‘आयएनएस उदयगिरी’च्या कामगिरीचा गौरव केला गेला. तर ‘हिमगिरी’च्या नामकरणातून 1974 ते 2005 या काळात सेवा दिलेल्या जुन्या ‘हिमगिरी’च्या कामगिरीचा सन्मान करण्यात आला. भारतीय नौदलाने देशाच्या पूर्व किनारपट्टीवरील सामर्थ्यात भर टाकली आहे. या दोन्ही युद्धनौका पूर्व नौदल कमांडच्या पूर्व ताफ्यात सामील होणार आहेत. त्यामुळे बंगालच्या उपसागरात आणि त्यापलीकडच्या सागरी प्रदेशातील आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देणे शक्य होणार आहे.
स्वदेशीतून रोजगार निर्मिती
इलेक्ट्रॉनिक युद्धसक्षम असलेल्या या दोन वेगवेगळ्या भारतीय शिपयार्डमधील दोन प्रमुख लढाऊ जहाजे एकाचवेळी कार्यान्वित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आयएनएस उदयगिरी हे मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडद्वारे बांधलेल्या प्रोजेक्ट 17 ए स्टेल्थ फ्रिगेट्समधील दुसरे जहाज आहे. तर आयएनएस हिमगिरी हे कोलकाता येथील गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्सद्वारे बांधलेल्या प्रोजेक्ट 17 ए जहाजांपैकी पहिले जहाज आहे. आयएनएस उदयगिरी हे नौदलाच्या अंतर्गत युद्धनौका डिझाईन ब्युरोने डिझाईन केलेले 100 वे जहाज आहे. दोन्ही जहाजे 200 हून अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगातून सुरू झालेल्या औद्योगिक जाळ्यातून साकारली आहेत. यातून 4 हजार प्रत्यक्ष नोकऱ्या आणि 10 हजाराहून अधिक अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण झाल्या. कठोर समुद्री चाचण्यांद्वारा या जहाजांवरील यंत्रसामग्री, अग्निशमन, नुकसान नियंत्रण, नेव्हिगेशन आणि दळणवळण प्रणाली प्रमाणित करण्यात आल्या आहेत.
2025 या वर्षात आतापर्यंत अनेक स्वदेशी प्लॅटफॉर्मचे कमिशनिंग झाले आहे, यात विध्वंसक आयएनएस सुरत, फ्रिगेट आयएनएस नीलगिरी आणि पाणबुडी आयएनएस वाघशीर यांचा समावेश आहे. त्यांची बांधणी एमडीएलने केली होती. तसेच अँटी-सबमरीन वॉरफेअर (एएसडब्ल्यू), शॅलो वॉटर क्राफ्ट आयएनएस अर्नाळा आणि डायव्हिंग सपोर्ट व्हेसल आयएनएस निस्तार यांचा समावेश आहे.
युद्धात महत्वाची भूमिका
नीलगिरी श्रेणीतील ही जहाजे एकात्मिक बांधकाम तत्वज्ञानाचा वापर करून बांधली गेली आहेत. बहुमुखी शस्त्रास्त्रांच्या आणि क्षमतांच्या श्रेणीमुळे ही जहाजे पृष्ठभागावरील युद्ध, हवाई हल्ल्यांविऊद्ध आणि पाणबुडीविरोधी युद्धात महत्वाची भूमिका बजावू शकतात.
अशी आहेत वैशिष्ट्यो
या श्रेणीच्या जहाजांवर बसविण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांमध्ये लांब पल्ल्याचे पृष्ठभाग ते हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र, पृष्ठभागावर सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रs, आठ अँटी एअरक्राफ्ट क्षेपणास्त्र, हलक्या वजनाचे अँटी-सबमरीन टॉर्पेडो, स्वदेशी रॉकेट लाँचर, 127 मि.मी. मेन रोल गन, दोन एके-630 रॅपिड फायर गन, मल्टी मिशन सर्व्हेलन्स रडार, शक्ती इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट, एअरबोर्न अर्ली वॉर्निंग रडार, पृष्ठभाग सर्व्हेलन्स रडार आणि सोनार हमसा यांचा समावेश आहे.
75 टक्के ऑर्डर स्वदेशी कंपन्यांना
जानेवारीत कार्यान्वित झालेले ‘आयएनएस नीलगिरी’ हे प्रोजेक्ट 17 अ मधील सात फ्रिगेट्सपैकी पहिले होते. सात सदस्यीय जहाजांपैकी चार-नीलगिरी, उदयगिरी, तारागिरी आणि महेंद्रगिरी (एमडीएल) आणि तीन-हिमगिरी, दुनागिरी आणि विंध्यगिरी या गार्डन रिच शिपबिल्डर्स आणि इंजिनिअरींगद्वारा बांधल्या. नीलगिरी वर्गातील उपकरणे आणि प्रणालींसाठी सुमारे 75 टक्के ऑर्डर स्वदेशी कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. बहुमिशन फ्रिगेट्स निळ्या पाण्याच्या वातावरणात कार्य करण्यास सक्षम आहेत. त्या पारंपरिक आणि अपारंपरिक सुरक्षा आव्हानांना तोंड देऊ शकतात. 
स्वप्नपूर्तीच्या दिशेने पाऊल!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने उचललेले हे एक पाऊल आहे. आयएनएस उदयगिरी आणि आयएनएस हिमगिरी हे सरकारच्या आत्मनिर्भरतेचे दृढ संकल्प आहेत. परिवर्तनकारी चळवळीचे प्रतीक आहेत आणि सर्व संबंधितांच्या एकत्रित प्रयत्नांनी देश नवी उंची गाठेल आणि स्वयंपूर्णतेचे उद्दिष्ट साध्य करेल. दोन शक्तिशाली युद्धनौका तयार करून नौदलाला पुरविण्यात एमडीएल आणि जीआरएसई यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. भविष्याच्या दृष्टीने सज्ज नौदल आज जमीन, समुद्र आणि आकाशासोबतच अंतराळ, सायबर अवकाश, आर्थिक अवकाश आणि सामाजिक अवकाशाचेही संरक्षण करत आहे. आत्मनिर्भरता ही आता केवळ एक घोषणा राहिलेली नसून ती प्रत्यक्ष जमिनीवरचे वास्तव बनू लागले आहे.
-राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री
भारताच्या नौदलात एकाचवेळी दोन युद्धनौकांचा समावेश होणे ही घटना, भारताच्या सागरी सामर्थ्याच्या सातत्यपूर्ण प्रगतीचे आणि गतिशील विस्ताराचा ठळक पुरावा आहे.
-अॅडमिरल दिनेश त्रिपाठी, नौदल प्रमुख
- संकलन : राजेश मोंडकर, सावंतवाडी