काळ्या दिनी मूक फेरीत बहुसंख्येने सहभागी होणार
महिला आघाडीच्या बैठकीत निर्धार
प्रतिनिधी/ बेळगाव
1 नोव्हेंबर काळ्या दिनी निघणाऱ्या मूक सायकल फेरीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार म. ए. समितीच्या महिला आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला. शनिवारी काकतीवेस येथील महिला आघाडी हॉटेलमध्ये ही बैठक झाली.
यावेळी उपस्थित महिलांनी काळ्या दिनाच्या फेरीत सहभागी होण्याचा निश्चय केला. 1 नोव्हेंबर काळ्या दिनी यंदा दिवाळी आली असली तरी या दिवशी आकाश कंदील न लावता काळा दिन पाळण्याचा निश्चयही महिला कार्यकर्त्यांनी केला आहे. काळ्या दिनी म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या फेरीत सर्व महिलांनी काळ्या साड्या घालून सहभागी व्हावे, असे आवाहन महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर यांनी केले.
याप्रसंगी मंजुश्री कोल्हेकर, अर्चना देसाई, भाग्यश्री जाधव, प्रिया कुडची, कांचन भातकांडे, माला जाधव, राजश्री बांभूळकर, शाकिरा गोकाक, पवित्रा लोकापुरे, शमिनी पाटील, बसू दंडू, वैशाली मजुकर, प्रभा चौगुले, अनुसया पाटील, दीपा मुतकेकर, आशा पाटील, प्रेमा कुरणे आदींसह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.