काळ्या दिनी बहुसंख्येने उपस्थित राहणार!
तालुका म. ए. समितीच्या बैठकीत निर्धार : युवा तरुणांमध्ये विभागवार जनजागृती
बेळगाव : 1 नोव्हेंबर रोजी निघणाऱ्या निषेध फेरीत बहुसंख्येने सहभागी होऊन काळा दिन गांभीर्याने पाळण्याचा निर्णय रविवारी ओरिएंटल स्कूलच्या तुकाराम महाराज सभागृहात झालेल्या तालुका म. ए. समितीच्या बैठकीत घेण्यात आला. विभागवार जागृती करण्याबरोबर जास्तीतजास्त संख्येने सहभागी होण्याचा निर्धारही कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष मनोहर किणेकर होते. व्यासपीठावर सरचिटणीस अॅड. एम. जी. पाटील होते. 1956 मध्ये अन्यायाने सीमाभाग कर्नाटकात डांबण्यात आला. तेव्हापासून 1 नोव्हेंबर काळा दिन म्हणून गांभीर्याने पाळला जातो. प्रशासनाकडून काळ्या दिनासाठी आडकाठी आणली जात आहे.
मात्र आतापर्यंत अनेक आंदोलने आणि काळा दिनही यशस्वी झाला आहे. त्याप्रमाणे 1 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणारी मूक सायकल फेरीही यशस्वी होईल. प्रशासन परवानगी देऊ अगर न देऊ कार्यकर्ते आणि मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. यावेळी उद्योगपती रतन टाटा यांच्यासह तालुक्यातील समितीच्या काही कार्यकर्त्यांच्या निधनाबाबत श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रशासनाने आजपर्यंतच्या प्रत्येक काळ्या दिनी आडकाठी आणून मुस्कटदाबी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. मात्र या दडपशाहीला झुगारून समितीने काळा दिन यशस्वी केला आहे. सीमालढ्याची तळमळ, ताकद आणि जिद्दीच्या बळावर 1 नोव्हेंबरचा काळा दिन यशस्वी करण्याचा निर्धारही कार्यकर्त्यांनी बैठकीत केला.
काळ्या दिनाच्या जागृतीसाठी विभागवार कमिटी
काळ्या दिनाच्या जागृतीसाठी विभागवार कमिट्या करण्यात आल्या आहेत. उचगाव, बेळगुंदी, किणये, काकती, सांबरा, हलगा, कडोली आदी ठिकाणी या कमिट्या करण्यात आल्या आहेत. या माध्यमातून गावोगावी आणि घरोघरी जागृती केली जाणार आहे. सीमालढ्याबरोबर काळ्या दिनाबाबत युवा तरुणांमध्ये जागृतीचे काम केले जाणार आहे. सीमालढ्यात तरुणांना सामावून घेऊन काळ्या दिनासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले जाणार आहे. यावेळी तालुका म. ए. समितीचे आर. एम. चौगुले, दीपक पावशे, मनोहर हुंदरे, संतोष मंडलिक, नारायण सावगावकर, अनिल पाटील, मनोहर संताजी, पियुश हावळ, डॉ. नितीन राजगोळकर आदींनी विचार व्यक्त केले. बैठकीला आर. आय. पाटील, डी. बी. पाटील, शिवाजी खांडेकर, मल्लाप्पा गुरव, गोपाळ पाटील, मयुर बसरीकट्टी, शंकर कोनेरी, दीनेश मुतगेकर, चेतन पाटील, राजू फगरे यासह कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.