कन्नडसक्ती विरोधातील मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होणार
ठिकठिकाणी आयोजित केलेल्या जनजागृती फेरीत म. ए. समिती कार्यकर्त्यांचा निर्धार
वार्ताहर/येळ्ळूर
कन्नडसक्ती विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवार दि. 11 रोजी काढण्यात येणाऱ्या निषेध मोर्चात येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीने शेकडो कार्यकर्त्यांसह सामील होवून आपला मराठी बाणा दाखवून देण्याचा निर्धार येळ्ळूर येथे झालेल्या बैठकीत करण्यात आला. यावेळी महानगरपालिकेत मराठी परिपत्रकासाठी ठाम भूमिका घेत कन्नडसक्तीच्या निषेधार्थ सभात्याग करणाऱ्या नगरसेवक साळुंखे, वैशाली भातकांडे व शिवाजी मंडोळकर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सदस्य वामन पाटील हाते. यावेळी निवृत्त शिक्षक देवाप्पा (बंड) घाडी व म. ए. समितीचे कार्यकर्ते गंगाधार बिर्जे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
प्रकाश अष्टेकर यांनी प्रास्ताविकमध्ये सीमालढा, कन्नडसक्ती विरोधातील येळ्ळूर गावच्या योगदानाबद्दल माहिती दिली. पुढील काळातही येळ्ळूर यासाठी कायम अग्रेसर राहील, असे सांगितले. ग्राम पं. चे माजी उपाध्यक्ष दुद्दाप्पा बागेवाडी म्हणाले, जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही तर लढूच, पण आमची भावी पिढीही यात मागे राहणार नाही.. गटातटाचा विचार न करता मराठी भाषेच्या अस्मितेसाठी सोमवार दि. 11 रोजी होणाऱ्या निषेध मोर्चात मोठ्या संख्येने सामील होण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. जागृती बैठकीला माजी तालुका पंचायत सदस्य चांगाप्पा परीट, गोविंद पाटील, प्रकाश पाटील, शिवाजी कदम, शिवाजी सायनेकर, सुरज गोरल, उदय जाधव, यलुप्पा पाटील, रमेश गोरल यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन दत्ता उघाडे यांनी केले. राजू पावले यांनी आभार मानले.
महामोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी होण्यासाठी निलजी ग्रामस्थ एकवटले
कन्नडसक्ती विरोधात म. ए. समितीतर्फे दि. 11 रोजी आयोजिलेल्या महामोर्चाला नागरिकांचा दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळत आहे. निलजी येथून महामोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. येथे बुधवारी जनजागृती केली. म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. नागरिकांना मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी ग्रामस्थांनी मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार केला. जागृती फेरीमध्ये गोपाळ पाटील, नारायण गोमाण्णाचे, भावकाना मोदगेकर, माजी ता. प. सदस्य वसंत सुतार, विठ्ठल गोमाण्णाचे, ऋतिक पाटील, सतीश पाटील, नागो मोदगेकरसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.