काळी नदीवरील कद्रा-कोडसळ्ळी रस्त्यावर कोसळली दरड
कारवार : काळी नदीवरील कद्रा आणि कोडसळ्ळी दरम्यानच्या रस्त्यावर कोसळलेल्या दरडीचे ड्रोनच्या माध्यमातून टिपलेले छायाचित्र कारवार जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केले आहे. छायाचित्रात कद्रा धरणातील पाणी, दरडीखाली गाडला गेलेला रस्ता आणि डोंगर प्रदेश दिसून येत आहे. बुधवारी कद्रा पाणलोट क्षेत्रात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे गुरुवारी (दि. 3) पहाटे ही दरड कोसळली आहे. दरम्यान दरड कोसळल्यानंतर या रस्त्यावरील वाहतुकीवर पुढील आदेशापर्यंत कारवार जिल्हाधिकारी के.लक्ष्मीप्रिया यांनी निर्बंधाचा आदेश बजावला आहे. दरम्यान जिल्ह्यात पावसाचा मारा सुरूच आहे. दिलासादायक बाब म्हणजे भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवूनही गुरुवार आणि बुधवारच्या तुलनेत पावसाच्या प्रमाणात घट झाली आहे. शुक्रवारी सकाळी साडेआठपर्यंत संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी 49 मि.मी. आणि एकूण 508 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. याच कालावधीत तालुकानिहाय झालेल्या पावसाची नोंद अशी आहे (सर्व आकडेवारी मि.मी. मध्ये) : अंकोला 75, भटकळ 61, हल्याळ 10, होन्नावर 74, कारवार 72, कुमठा 62, मुंदगोड 11, सिद्धापूर 72, शिरसी 53, सुपा 40, यल्लापूर 31, दांडेली 15.
कद्रा धरणातून विसर्ग सुरूच
काळी नदीवरील कद्रा धरणातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. या धरणात 17 हजार क्युसेक्स इतके पाणी वाहत येत असून धरणातील 28 हजार क्युसेक्स इतके पाणी काळी नदीच्या पात्रात सोडून देण्यात येत आहे. कद्रा धरणाऱ्या पाणलोट क्षेत्रात 100 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.