काही तासात पुन्हा भरणारे सरोवर
रहस्याची उकल करू पाहत आहेत शास्त्रज्ञ
उत्तर आयर्लंडच्या पर्वतांमधील रहस्यमय सरोवर लोघारीमा किंवा द वॅनिशिंग लेकने शास्त्रज्ञांना अनेक वर्षांपासून कोड्यात पाडले आहे. हे सरोवर जगातील सर्वात रहस्यमय भूवैज्ञानिक स्थळांपैकी एक मानले जाते, हे सरोवर सकाळी पूर्णपणे भरलेले असू शकते, परंतु काही तासातच हे सरोवर पूर्णपणे आटलेले असते. आता संशोधक या अद्भूत घटनेच्या रहस्याची उकल करण्याच्या प्रयत्नात विस्तृत भूवैज्ञानिक सर्वेक्षण सुरू करणार आहेत. सरोवरात पाणी येणे आणि गायब होण्यावरून भूवैज्ञानिकांनी अनेक प्रकारचे अंदाज वर्तविले आहेत.
स्थानिक मान्यता
स्थानिक लोकांसाठी लोघारीमाचे विचित्र वर्तन भूत-प्रेतांशी निगडित आहे. ज्या रात्रींमध्ये सरोवर पूर्णपणे भरलेले असते, तेव्हा काठावर एका प्रेताची छाया असते असे बोलले जाते. काही लोक येथे केल्पी (अश्वासारखा जीव जो मानवी रुप धारण करू शकतो) दिसल्याचा दावा करतात. अन्य स्थानिक वदंतेनुसार 19 व्या शतकाच्या अखेरीस लोकांनी भरलेले एक वाहन येथे बुडाले होते. खोलपाण्यात अडकलेल्या लोकांचे आवाज आजही ऐकू येतात, अशी वदंता आहे.
भूमिगत प्रणालीचा अनुमान
ब्रिटिश जियोलॉजिकल डॉ. पॉल विल्सन यांनी अलिकडेच लोघारीमाचे विस्तृत अध्ययन सुरू केले. लोघारीमा एक गतिशील भू-दृश्य असून सरोवरानजीक पोहोचल्यावर ते कुठल्या अवस्थेत दिसेल याचा अनुमान लावणे रोमांचक आहे. यात तीन मोठ्या नद्या वाहतात आणि कुठलीही यातून बाहेर पडत नाही. सरोवराखाली एक सिंक असून ते सर्व पाणी एका भूमिगत जलवाहक प्रणालीत वाहून देते, परंतु अद्याप याला पूर्णपणे समजून घेता आलेले नाही, असे विल्सन यांचे सांगणे आहे. विल्सन यांचे अध्ययन दोन भागांमध्ये आहे. पहिल्या भागात सरोवराची टाइमलॅप्स छायाचित्रे घेण्यासाठी एका कॅमेऱ्याचा वापर करण्यात आला आहे. दुसऱ्या भागात सरोवर भरणे आणि आटण्याचा दर मोजण्यासाठी विविध स्थानांवर जलस्तर लॅगरचा वापर करण्यात आला.
दबाव अन् तळाशी संबंधित अन्य सिद्धांत
सरोवराच्या वर्तनाविषयी एक सिद्धांत, दबाव आणि तळाशी संबंधित आहे. या सिद्धांतानुसार सरोवरात वाहणाऱ्या तीन नद्या स्वत:सोबत गाळ घेऊन येतात, जो सरोवराच्या तळाला जमा होतो आणि अखेरीस पाण्याखालील नाल्याला झाकत असतो. जेव्हा छिद्र पूर्णपणे बंद होते, तेव्हा पाण्याचा स्तर वेगाने वाढतो. जेव्हा पाणी एका निश्चित स्तरावर पोहोचते, तेव्हा नाल्यावर पडणारा दबाव छिद्राला अचानक खोलतो. या प्रक्रियेदरम्यान पाणी पुन्हा वाहू लागते आणि सरोवर रिकामी होऊ लागते आणि ही प्रक्रिया चालूच राहते.