कर्मयोगी सर्वांकडे समदृष्टीने पहात असतो
अध्याय चौथा
आपण सर्व ईश्वराची लेकरं असल्याने आपणा सर्वांनाच कर्म करण्यासबंधी ईश्वरी प्रेरणा होत असते पण स्वार्थ साधण्यासाठी आपण त्याकडं दुर्लक्ष करून आपलं डोकं चालवून ते कर्म करायचा प्रयत्न आपण करत असतो. ते अकर्म या सदरात मोडतं. त्यातून निर्माण होणाऱ्या पापपुण्याची जबाबदारी आपल्यावर पडते आणि त्यातूनच आपले पुनर्जन्म होत राहतात. आपल्या हातून ही सर्व वर्तणूक अज्ञानापोटी होत असते पण कर्मयोगी साधकाचं अज्ञान दूर झालेलं असतं.
कर्मयोगाच्या आचरणाने त्याची सर्व पातके दूर होतात. त्यामुळे त्याचा पुनर्जन्म होत नाही, ह्या अर्थाचा मन्निष्ठा मद्धियोऽ त्यन्तं मच्चित्ता मयि तत्पराऽ । अपुनर्भवमायान्ति विज्ञानान्नाशितैनसऽ ।।16।। श्लोक आपण पहात आहोत.
बाप्पा म्हणतात, माझ्या ठिकाणी ज्यांची निष्ठा, बुद्धी आणि चित्त जडलेलं आहे त्यांना मी सांगतोय त्यात कोणतीही शंका नसते. त्यामुळे जशी प्रेरणा होईल त्याप्रमाणे ते तत्परतेने कार्य करत राहतात. या सर्वांच्या पाठीमागे मी असून हे सर्व मीच त्यांच्याकडून करून घेत आहे हे ज्ञान त्यांना अनुभवाने मिळालेले असते. त्यामुळे त्यांचे पाप नष्ट होऊन त्यांचा पुनर्जन्म होत नाही. कर्मयोगी मनुष्याला योग म्हणजे आत्म्याचं परमात्म्याशी मिलन हे ध्यानात असल्याने व ते निष्काम कर्मयोगातून साध्य होईल याची खात्री असल्याने तो ईश्वराने दिलेलं काम निरपेक्षतेनं करत असतो. कुणाकडून कसलीही अपेक्षा नसल्याने कुणाबद्दल रागलोभादि षड्रिपुंनी युक्त भावना त्याच्या मनात नसतात. आपण बरं आणि आपलं काम बरं अशी त्याची वृत्ती असते. इतर काय करत आहेत याच्याशी त्याला काहीही देणेघेणे नसते. या सर्वाचा परिणाम होऊन तो जगातील सर्व प्राणिमात्रांच्याकडे समदृष्टीने पहात असतो, असं बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.
ज्ञानविज्ञानसंयुत्ते द्विजे गवि गजादिषु ।
समेक्षणा महात्मानऽ पण्डिताऽ श्वपचे शुनि ।। 17 ।।
अर्थ- ज्ञान व विज्ञान यांनी युक्त ब्राम्हण, गाय, हत्ती इत्यादि प्राणी, चांडाळ अथवा श्वान यांचे ठिकाणी महात्म्या पंडितांची दृष्टि समान असते.
विवरण- आपली जीवनयात्रा ईश्वरी इच्छेनुसार चालणार आहे हे लक्षात येणं हे ज्ञान आणि त्यानुसार निरपेक्षतेनं कर्म करत गेल्यास आपलं पाप नष्ट होणार आहे हे समजणं ह्याला विज्ञान म्हणतात. ज्ञान आणि विज्ञान याची ज्याला पुरेपूर कल्पना आहे तो सर्व प्राणिमात्रांकडे समदृष्टीने पहात असतो. समदृष्टीने सर्वांच्याकडे पाहणे म्हणजे ज्याच्यासाठी जे करणे आवश्यक आहे ते करणे. त्यामुळे सर्वजण संतुष्ट होतात. त्याला या कुणाकडून काहीही अपेक्षा नसते. साहजिकच त्याला सर्व सारखेच असतात. तसेच ह्यांच्यापैकी कुणीही आपल्या जीवनक्रमात फेरफार करू शकत नाहीत, हेही त्याच्या लक्षात आलेले असते. त्यामुळे त्याला कुणाविषयीही मनामध्ये रागलोभ नसतो. जेव्हा आपण प्रवास करत असतो तेव्हा आपल्याबरोबर जे प्रवासी असतात ते आपल्याला कोणताही त्रास देऊ शकत नाहीत, याची आपल्याला खात्री असल्याने आपली सर्वांबरोबरची वागणूक प्रेमभावाची असते. त्याप्रमाणे कर्मयोगी मनुष्य आयुष्यभर सर्वांबद्दल प्रेमभाव बाळगून असतो. हे जग ईश्वरव्याप्त असून सर्वांच्यातील
ईश्वरी अंश त्यांना दिसत असतो असं बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.
वश्यऽ स्वर्गो जगत्तेषां जीवन्मुक्ताऽ समेक्षणाऽ ।
यतोऽदोषं ब्रह्म समं तस्मात्तैर्विषयीकृतम् ।। 18।।
अर्थ- स्वर्ग आणि जग त्यांना वश असते, समान दृष्टि ठेवणारे ते जीवन्मुक्त होत. कारण, दोषरहित व समान असे ब्रह्म त्यांनी आपल्या ज्ञानाचा विषय केलेला असतो. सविस्तर पाहूयात पुढील भागात.