Sangli : सराफाचा बंद बंगला भरदिवसा फोडला !
सुमारे ४ लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास
सांगली : हरिपूर (ता. मिरज) येथील काळीबाट रस्त्यावर साई मंदिरपासून काही अंतराबर सुवर्ण कारागीर स्वप्निल बेलवलकर यांचा बंद बंगला सोमवारी भरदिवसा फोडून सब्बा दोन तोळे सोने, दीड किलो चांदी, ३० हजारांची रोकड असा सुमारे ४ लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याबाबत बेलवलकर यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
स्वप्निल बेलवलकर हे सुवर्ण कारागीर आहेत. हरिपूरातील काळी बाट रस्त्यावर साई मंदिरपासून काही अंतरावर पाच महिन्यापूर्वी नवीन बंगला बांधला आहे. काळ्या वाटेपासून आतमध्ये ५० मीटरवर अंतरावर बेलवलकर यांचा बंगला आहे. शेजारी आणखी एका बंगाली कारागीराचा बंगला आहे. दोन बंगले वगळता त्यांच्या शेजारी खुला भूखंड आहे. त्यामुळे रहदारीपासून हे दोन्ही बंगले लांब आहेत. नवीन घरात देवघर आणायचे म्हणून बेलवलकर हे पत्नीसह शिरोळ येथे गेले होते. तर त्यांची आई नोकरीनिमित्त जयसिंगपूर येथे गेली होती.
दुपारी बारा ते दुपारी चारच्या दरम्यान चोरट्याने बंद बंगला हेरला. मुख्य दरवाजाला सेंटर लॉक असताना देखील चौकटीतून लॉक उचकटून काढून आतमध्ये प्रवेश केला. आतील लोखंडीतिजोरीचे लॉक उचकटून टाकले. आतील सर्व साहित्य विस्कटले.
लॉकरमध्ये ठेवलेले सब्बा दोन तोळे सोन्याचे दागिने, दीड किलो चांदी, ३० हजाराची रोकड घेऊन चोरट्याने पलायन केले. दुपारी साडेचारच्या सुमारास बेलवलकर परतल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी सांगली ग्रामीण पोलिसांना कळवले.
पोलीस निरीक्षक किरण चौगले हे तत्काळ पथकासह धावले. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे उपनिरीक्षक कुमार पाटील हे देखील पथकासह दाखल झाले. ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. सायंकाळी उशिराने ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण केले.