स्वाभिमानीने मोहनराव शिंदे कारखान्याचे उसाचे शंभर ट्रक रात्रभर रोखले
मल्लेवाडी- आरग रस्त्यावर आंदोलन : दर जाहीर करा किंवा कारखाना बंद करा : स्वाभिमानी चा प्रस्ताव
खंडेराजुरी प्रतिनिधी
ऊस दरासाठी मिरज तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. मल्लेवाडी- आरग रस्त्यावर गुरुवारी रात्री उशिरा मोहनराव शिंदे साखर कारखान्याच्या शंभर ट्रक रात्रभर कार्यकर्त्यांनी अडवून धरल्या आहेत. संघटना आणि कारखान्यात वाटाघाटी सुरू असून चालू वर्षाचे ऊस दर जाहीर करा अन्यथा कारखाना बंद ठेवा असा प्रस्ताव कारखाना प्रशासनाला दिल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाअध्यक्ष संजय खोलखुंबे व तालुकाध्यक्ष सुरेश वसगडे यानी सांगितले.
मोहनराव शिंदे कारखाना हा जिल्ह्यातील एक प्रमुख साखर कारखाना असून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांच्या नातेवाईकांचा हा कारखाना असल्यामुळे येथे होणाऱ्या आंदोलन आणि वाटाघाटीना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही इथले आंदोलन लावून धरले असून दर जाहीर करा किंवा कारखाना बंद करा असा प्रस्ताव कारखाना प्रशासनाला दिला आहे. शुक्रवारी दुपारी बारा वाजता संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय देणार असल्याचे शिंदे कारखाना प्रशासनाने सांगितल्याचे स्वाभिमानीच्या नेत्यांनी 'तरुण भारत संवाद'शी बोलताना सांगितले.
चालू वर्षीचा ऊस दर जिल्ह्यातील कारखान्यानी अद्याप जाहीर केला नाही.तरीही शेतकऱ्यांचा ऊस तोडणी सुरू आहेत त्यामुळे मिरज पूर्व भागात कधी नव्हे ते ऊस आंदोलन चिघळले आहे. याबाबत शेतकरी संघटनेने ऊस तोड बंद व वाहने रोखणे आंदोलन सुरू केले होते. गुरुवारी रात्री उशिरा आरग-मल्लेवाडी रस्त्यावर मोहनराव शिंदे कारखान्याकडे जाणाऱ्या 100 उसाच्या गाड्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रोखल्या होत्या. त्यावेळी पोलीस प्रशासन व संघटनेच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची झाली .
त्यानंतर झालेल्या शेतकरी संघटना व कारखाना प्रशासनाच्या चर्चेमध्ये आज दुपारपर्यंत उस दर जाहीर करा अन्यथा कारखाना बंद ठेवा असा प्रस्ताव दिल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संजय खोलखुंबे व सुरेश वसगडे यांनी सांगितले.मिरज पूर्व भागात सुद्धा आंदोलनचे चिघळले असून काही दिवसापूर्वी ऊस वाहतूक करणाऱ्या गाड्यांचे टायर सुद्धा पेटवले होते. ऊस दर अद्याप जाहीर न केल्याने शेतकऱ्यां मध्ये संतापाची लाट असून कोल्हापूर येथील ऊस उत्पादक व संघटनेच्या नेत्यांची बैठक सुद्धा निष्फळ ठरली असल्याने आंदोलन चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.
संजय खोलखुंबे ,सुरेश वसगडे ,भरत चौगुले, बाळासो लिंबिकाई,शैलेश गारे ,बाळासो पाटील ,अक्षय केटकाळे, सुहास केरीमाने, हरी कांबळे सह शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनास उपस्थित आहेत.