कांगांरुचा लाजिरवाणा पराभव, पाकने जिंकला एकतर्फी सामना
दुसऱ्या वनडेत 9 गडी राखून दणदणीत विजय : सामनावीर हॅरिस रौफचे 5 बळी : मालिकेत 1-1 बरोबरी
वृत्तसंस्था/ अॅडलेड
सामनावीर हॅरिस रौफची भेदक गोलंदाजी (29 धावांत 5 बळी) आणि पाकिस्तानच्या सलामी जोडीच्या विस्फोटक फलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या वनडेत गुडघे टेकले. अॅडलेडमध्ये झालेल्या लढतीत पाकिस्तानने ऑस्ट्रेलियावर 9 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह पाकने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला 35 षटकांत 163 धावांत गुंडाळले आणि एक विकेट गमावून हे लक्ष्य सहज गाठले. उभय संघातील तिसरा व निर्णाय सामना दि. 10 रोजी पर्थ येथे होईल.
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि हा संघाचा निर्णय अगदी योग्य ठरला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेला यजमान ऑस्ट्रेलियाचा संघ 35 षटकांत अवघ्या 163 धावांत गारद झाला. अॅडलेडच्या मैदानावर पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी धुमाकूळ घातला. त्यामुळे मालिकेत आघाडीवर असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला दुसऱ्या वनडेत सुरुवातीपासूनच बॅकफूटवर राहावे लागले. स्टीव्ह स्मिथने कांगारुंसाठी सर्वात मोठी खेळी खेळली. त्याने 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं 48 चेंडू 35 धावा केल्या. स्मिथ वगळता मॅथ्यू शॉर्ट 19, जोस इंग्लिश 18, अॅरॉन हार्डी 14, ग्लेन मॅक्सवेल 16, झम्पा 18 हे स्टार खेळाडू सपशेल अपयशी ठरले. पाकिस्तानकडून हॅरिस रौफने आठ षटकांत 29 धावा देत 5 तर शाहीन आफ्रिदीने 26 धावांत 3 बळी घेतले. नसीम शाह मात्र महागडा ठरला आणि त्याने 10 षटकांत 65 धावा देत केवळ एक विकेट घेतली.
अब्दुल्ला शफीक, आयुबची नाबाद अर्धशतके
164 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या सलामीवीरांनी ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला. सलामीवीर सॅम आयुब आणि अब्दुल्ला शफीक यांच्यात पहिल्या विकेटसाठी 137 धावांची भागीदारी झाली. या दोघांनीच संघाच्या विजयाचा पाया रचला. आयुबने बाद होण्यापूर्वी 71 चेंडूत 5 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 82 धावांची शानदार खेळी केली. तर शफीक 69 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांसह 64 धावा करून शेवटपर्यंत नाबाद राहिला. नंतर आलेल्या माजी कर्णधार बाबर आझमने 20 चेंडूत 15 धावा केल्या आणि विजयी षटकारासह संघाला दणदणीत विजय मिळवून दिला.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया 35 षटकांत सर्वबाद 163 (शॉर्ट 19, मॅकगर्क 13, स्टीव्ह स्मिथ 35, जोश इंग्लिश 18, मॅक्सवेल 16, रौफ 5 बळी, शाहिन आफ्रिदी 3 बळी).
पाकिस्तान 26.3 षटकांत 1 बाद 169 (आयुब 82, शफीक नाबाद 64, आझम नाबाद 15, झम्पा 1 बळी).
पाकचा कांगारुवर आजवरचा मोठा विजय
पाकचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमधील हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. कांगांरुनी कमी धावसंख्येचे ठेवलेले लक्ष्य पाकिस्तानने 141 चेंडू शिल्लक असताना केवळ एक विकेट गमावून पूर्ण केले. पाकने हा सामना 9 विकेट्सनी जिंकला. यापूर्वी 1981 साली पाकने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर 6 विकेटने पराभूत केले होते, हा सामना सिडनी येथे खेळला गेला होता. विकेट्सच्या बाबतीत हा पाकिस्तान संघाचा सर्वात मोठा विजय ठरला. याशिवाय, तब्बल 28 वर्षानंतर पाकने अॅडलेडच्या मैदानावर ऑसी संघाला पराभूत करण्याची किमया केली आहे. यापूर्वी 1996 मध्ये पाकने अॅडलेडच्या मैदानावर कांगांरुना पराभूत केले होते.