महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव

06:46 AM Dec 11, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पाकिस्तानचा 8 गड्यांनी विजय : सामनावीर अझान अवैसचे नाबाद शतक

Advertisement

वृत्तसंस्था/ दुबई

Advertisement

येथे सुरु असलेल्या युवा (यू-19) आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाला पाकिस्तानकडून 8 गड्यांनी लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत 9 गडी गमावून 259 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाने अवघ्या दोन विकेट्स गमावून सहज लक्ष्य गाठले. पाकिस्तानकडून मोहम्मद झीशानने शानदार गोलंदाजी केली आणि अझान अवैसने शानदार नाबाद शतक झळकावले. भारतीय संघाचा गटातील शेवटचा सामना दि. 12 रोजी नेपाळविरुद्ध होईल.

अ गटातील या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार साद बेगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाला 9 व्या षटकात 39 धावांवर पहिला धक्का बसला. अर्शीन कुलकर्णीला (24) अमीर हसनने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर लगेच रुद्र पटेल (1) हाही तंबूत परतला. त्याला मोहम्मद झिशानने बाद केले. यानंतर आदर्श सिंग आणि कर्णधार उदय सहारन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. ही जोडी जमलेली असताना आदर्श सिंग (62) धावांवर बाद झाला. मुशीर खान (2), आर्वेली अवनीश (11) स्वस्तात बाद झाले. दुसरीकडे, कर्णधार उदय सहारनने एका बाजूने किल्ला लढवताना शानदार 5 चौकारासह 60 धावांची खेळी साकारली. त्याला सचिन धसने 42 चेंडूत 58 धावा करत चांगली साथ दिली. कर्णधार सहारन बाद झाल्यानंतर तळाच्या फलंदाजांनी मात्र निराशा केली. धसने अखेरच्या टप्प्यात केलेल्या अर्धशतकी खेळीमुळे टीम इंडियाला 50 षटकांत 9 बाद 259 धावापर्यंत मजल मारता आली. पाकिस्तानकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद झीशानने 46 धावा देत 4 बळी घेतले. अमीर हसन आणि उबेद शाह यांनीही प्रत्येकी 2 बळी घेतले.

अझान अवैसचे नाबाद शतक

भारताच्या 260 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. सलामीवीर शामील हुसेन 8 धावांवर बाद झाला. यानंतर दुसऱ्या विकेटसाठी शाजेब खान आणि अझान अवैस यांच्यात 110 धावांची भागीदारी झाली. शाजेबने 88 चेंडूत 63 धावांचे योगदान दिले. त्याला अभिषेकने बाद केले. यानंतर अझानने कर्णधार साद बेगसह तिसऱ्या गड्यासाठी 125 धावांची नाबाद भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. यादरम्यान अझानने 130 चेंडूत 10 चौकारासह 105 धावांची शतकी खेळी खेळली. तर साद बेगने 51 चेंडूत नाबाद 68 धावा फटकावल्या. पाकने विजयी आव्हान 47 षटकांत 2 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करत विजयाला गवसणी घातली. भारताकडून अभिषेकने 2 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक : भारत 50 षटकांत 9 बाद 259 (आदर्श सिंग 62, उदय सहारन 60, सचिन धस 58, अर्शिन कुलकर्णी 24. झीशान 46 धावांत 4 बळी, अमीर हसन, उबेद शाह प्रत्येकी दोन बळी)

पाकिस्तान 47 षटकांत 2 बाद 263 (शाजेब खान 63, अझान अवैस नाबाद 105, साद बेग नाबाद 68, अभिषेक 55 धावांत 2 बळी).

उपांत्य फेरी गाठण्यासाठी टीम इंडियाला विजय आवश्यक

स्पर्धेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने अफगाणिस्ताचा पराभव केला होता.  दुसरीकडे, पाकिस्तानने पहिल्या सामन्यात नेपाळचा पराभव केला होता. यानंतर पाकिस्तानने आपल्या दुसऱ्या सामन्यात भारताचा पराभव करत अ गटात चार गुणासह पहिले स्थान पटकावले आहे. टीम इंडियाचे दोन सामन्यात दोन गुण आहेत. भारताचा शेवटचा सामना नेपाळविरुद्ध होणार असून या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. यानंतरच भारताचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article