For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शाळेवर कोसळला भलामोठा दगड

06:02 AM Jul 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
शाळेवर कोसळला भलामोठा दगड
Advertisement

काश्मीर-पूंछमधील दुर्घटना : एका मुलाचा मृत्यू, 4 विद्यार्थ्यांसह शिक्षिका जखमी

Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर

जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिह्यात सोमवारी सकाळी भैंच-कलसियान भागात मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात सरकारी प्राथमिक शाळेच्या इमारतीवर एक मोठा दगड कोसळला. या दुर्घटनेत एका निष्पाप विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. तसेच इतर चार विद्यार्थी आणि एक शिक्षक जखमी झाले. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरावरून एक मोठा दगड शाळेच्या छतावर पडला. दगड मोठा असल्यामुळे तो छप्पर तोडून थेट मुले शिकत असलेल्या वर्गात घुसला.

Advertisement

या अपघातात 5 वर्षांच्या एहसान अली या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. उर्वरित चार मुले मोहम्मद सफीर (7), बिलाल फारूख (8), आफताब अहमद (7) आणि तोबिया कौसर (7) जखमी झाली आहेत. तसेच, एका शिक्षिकेला किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींना तात्काळ उपचारांसाठी पूंछ येथील राजा सुखदेव सिंह जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा उपायुक्त विकास कुंडल यांनी रुग्णालयात पोहोचून जखमींची विचारपूस केली आणि डॉक्टरांना चांगल्या वैद्यकीय सुविधा देण्याचे निर्देश दिले. घटनेची माहिती मिळताच उपराज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दु:ख व्यक्त केले. ‘पुंछमधील प्राथमिक शाळेत दगड कोसळून 5 वर्षांच्या मुलाचा झालेला मृत्यू हृदयद्रावक आहे. देव पालकांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो. जखमी मुलांना लवकर बरे करावे, अशी मी प्रार्थना करतो’, असे उपराज्यपाल सिन्हा यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे.

जखमींना भरपाई जाहीर

मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही अपघाताबद्दल दु:ख व्यक्त करत जखमींवर उपचार करण्याचे आणि घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. जिल्हा प्रशासनाने मदतकार्याचा भाग म्हणून मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबाला 1 लाख रुपये आणि प्रत्येक जखमी विद्यार्थ्याच्या कुटुंबाला 50,000 रुपये आर्थिक मदत रेडक्रॉस निधीतून दिली आहे. प्रशासन बाधित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करेल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे.

Advertisement
Tags :

.