चीनमध्ये घरजावई मिळवून देणारी कंपनी
सासरी रहायला येणार नवरा
जगात एकाहून एक अनोख्या सेवा पुरविण्यात येत आहे. समाजात अनेक प्रथा परंपरा रुढ झाल्या आहेत, परंतु आता यात बदल देखील होत आहे. विवाहासाठी आता युवक आणि युवती असणे आवश्यक नाही, तर समलैंगिक विवाह देखील होत आहेत. अशाचप्रकारे विवाहानंतर युवतींनी सासरी राहण्यास जाणे आता आवश्यक नाही, तर वरच सासरी राहण्यासाठी जात आहेत.
एक मॅचमेकिंग एजेसी आता स्वत:च्या ग्राहकांना घरजावई मिळवून देण्याची ऑफर देत आहे. हा नवरा पत्नीच्या घरात राहिल आणि तिचाच वंश पुढे नेणार आहे. हा अजब प्रकार चीनमध्ये घडतोय. पारंपरिक पतींच्या जगी चीनमध्ये सध्या ‘लिव्ह इन जावई’चा प्रकार वाढत आहे.
अशाप्रकारचे घरजावई मिळवून देण्याची जबाबदारी चीनच्या हेंग्जाउ शाओशन जिल्ह्यात एका मॅचमेकिंग एजेन्सीने घेतली आहे. चीनच्या स्प्रिंग फेस्टिव्हलमध्ये अत्यंत लोकप्रियता प्राप्त केलेल्या या एजेन्सीने एका वेगळ्या प्रकारची अरेंजमेंट ऑफर दिली आहे. यात पतीच स्वत:च्या पत्नीच्या घरात राहणार आहे. तसेच या जोडप्याची मुलं पत्नीचेच आडनाव लावणार आहेत. तसेच तिचाच वंश पुढे नेणार आहेत. याकरता निवडल्या जाणाऱ्या उमेदवाराची वार्षिक कमाई सुमारे 12 लाख असणे आवश्यक आहे. तसेच त्याची उंची 5 फूट 6 इंच असायला हवी. याचबरोबर त्याची कुठल्याही प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी असू नये. सर्वात मोठी बाब म्हणजे उमेदवार आळशी असू नये.
दररोज येतात लोकांचे अर्ज
ही सेवा प्राप्त करण्यासाठी नोंदणी शुल्क 1 लागा 74 हजार रुपये इतके आहे. ही नोंदणी 2 वर्षांपर्यंत टिकणार आहे. एजेन्सीकरता आता प्रतिदिन 20-30 युवकांचे अर्ज प्राप्त होत आहेत. हे युवक लिव्ह इन जावई होण्यास इच्छुक आहेत. यामुळे पारंपरिक पतींसारखी जबाबदारी उचलायला लागणार नाही तसेच श्रीमंत मुलीसोबत राहून आपले आयुष्य सहजपणे जगता येईल असे त्यांचे मानणे आहे. शाओशानमध्ये अनेक वर्षांपासून अशाप्रकारची व्यवस्था चालत आली आहे. यात पती घरजावई होत सासरी राहत असतो.