Sangli News | सांगली जिल्ह्यातील संबंधित शाळा-विद्यालयांना 1 डिसेंबर रोजी सुट्टी जाहीर
सांगलीत २ डिसेंबरला नगरपरिषद व नगरपंचायतींचे मतदान
सांगली : नगरपरिषद, नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ०२ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, मतदान अधिकारी मतदान साहित्य घेवून १ डिसेंबर रोजी मतदान केंद्रावर पोहोचणार आहेत. या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील उरूण-ईश्वरपूर, विटा, आष्टा, तासगाव, जत, पलूस नगरपरिषद व शिराळा, आटपाडी नगरपंचायत क्षेत्रातील मतदान केंद्र असलेल्या शाळा, विद्यालय, महाविद्यालय यांना सोमवार, दिनांक ०१ डिसेंबर रोजी सुट्टी जाहीर केल्याचे आदेश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जारी केले आहेत.
उरूण-ईश्वरपूर, विटा, आष्टा, तासगाव, जत, पलूस नगरपरिषद व शिराळा, आटपाडी नगरपंचायत यांचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यासाठी ०२ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडील आदेशानुसार ज्यादिवशी मतदान अधिकारी/कर्मचारी सर्व मतदान साहित्य घेवून मतदान केंद्राचा ताबा घेतात, त्यादिवशी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीतील शाळांना सुट्टी देणे आवश्यक आहे. तसेच मतदानाच्या दिवशीसुध्दा शाळांना सुट्टी राहील, याची खात्री करावी, असे नमूद आहे. या अनुषंगाने ०२ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मतदान अधिकारी मतदान साहित्य घेवून ०१ डिसेंबर, रोजी मतदान केंद्रावर पोहोचणार असल्याने ०१ रोजी सुट्टी जाहीर केली आहे.