निलजीत माकडांची दहशत
तिघांवर हल्ला, अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे बंदोबस्ताची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
निलजी गावामध्ये माकडांच्या कळपाने दहशत माजविली असून तिघांवर हल्ला करून चावा घेतला आहे. त्यामुळे गावात भितीचे वातावरण पसरले आहे. माकडांच्या हल्ल्यात लहान बालके, महिला आणि वयोवृद्ध टार्गेट होऊ लागली आहेत. याबाबत ग्राम पंचायत आणि वनखात्याला निवेदने देऊन देखील साफ दुर्लक्ष झाले आहे. माकडांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणीचे निवेदन अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे ग्रामस्थांनी दिले आहे.
मागील तीन वर्षांपासून गावात माकडांचा धुमाकूळ सुरू आहे. घरांच्या खिडक्या, काचा त्याबरोबर परिसरातील फळ आणि इतर शेती पिकांचेही नुकसान होऊ लागले आहे. त्याबरोबर आता ही माकडे माणसांवरही हल्ले करू लागली आहेत. प्रणित मोदगेकर, छाया पाटील, नारायण सुणगार यांच्यावर हल्ला केल्याने ते जखमी झाले आहेत. शिवाय माकडांच्या या दहशतीमुळे बालक आणि महिलांना घराबाहेर पडणेही धोक्याचे बनले आहे. वनखात्याने तातडीने बंदोबस्त करावा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
शंभर माकडांचा कळप
शंभरहून अधिक माकडांचा कळप गावात हैदोस घालू लागला आहे. त्यामुळे दिवसा ढवळ्याही गावात फिरणे धोक्याचे बनू लागले आहे. विशेषत: लहान मुले, महिला आणि वयोवृद्धांवर माकडे धावून जाऊ लागली आहेत. मात्र ग्राम पंचायत व वनखाते याबाबत उदासीन असल्याचे दिसत आहे. माकडांनी खासगी मालमत्तेबरोबर अनेक साहित्याचे नुकसान केले आहे. या माकडांच्या कळपाचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी कादंबरी पाटील, अॅड. लक्ष्मण पाटील, अमृत कोल्हटकर, शिवाजी शिंदे, अप्पालाल नदाफ यासह ग्रामस्थ उपस्थित होते.