ऑस्ट्रेलियात हॉटेलच्या छतावर कोसळले हेलिकॉप्टर
वैमानिकासह दोन जणांचा मृत्यू : 400 जणांना हॉटेलमधून हलविले
वृत्तसंस्था/ सिडनी
ऑस्ट्रेलियाच्या केर्न्स शहरात एक हेलिकॉप्टर हॉटेलच्या छताला धडकून दुर्घटनाग्रस्त झाले आहे. या दुर्घटनेनंतर त्वरित आपत्कालीन पथकाला पाचारण करण्यात आले. तर पोलिसांनी पूर्ण हॉटेल रिकामी करविले आहे. सुमारे 400 जणांना हॉटेलमधून बाहेर काढण्यात आले. दुर्घटनेत वैमानिक आणि हेलिकॉप्टरमधून प्रवास करणाऱ्या एका इसमाचा मृत्यू झाला आहे. केर्न्स हे शहर ऑस्ट्रेलियातील पर्यटकांचे शहर म्हणून ओळखले जाते. ऑस्ट्रेलियाच्या ग्रेट बॅरियल रीफचे हे प्रवेशद्वार मानण्यात येते.
शेकडो लोकांचे वास्तव्य असलेल्या हॉटेलच्या छताला हेलिकॉप्टर धडकले होते. केर्न्समध्ये हिल्टनच्या डबल ट्री हॉटेलमध्ये दुर्घटना झाल्यावर सोमवारी बचावकार्य हाती घेण्यात आले. खबरदारीदाखल पूर्ण इमारत रिकामी करविण्यात आली. हॉटेलमधील कुठल्याही व्यक्तीला या दुर्घटनेत ईजा झालेली नाही. याप्रकरणी तपास केला जात असल्याचे क्वीन्सलँड राज्य पोलिसांकडून सांगण्यात आले.
सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या एका व्हिडिओत हॉटेलच्या छतावर आग लागल्याचे दिसून येत. तर दुर्घटनेत हेलिकॉप्टरचे दोन प्रोपेलर तुटले असून यातील एक हॉटेलच्या स्वीमिंग पूलमध्ये कोसळला आहे.