खानापूर तालुक्यात जोरदार वळिवाची प्रतीक्षा
सर्वत्र पाणीसाठा कमी झाल्याने चिंतेची बाब : जंगलातील प्राणी पाण्यासाठी मानवी वस्तीकडे : पाणी नियोजनाची आवश्यक
खानापूर : गेल्यावर्षी वळिवाचा पाऊस झाला नाही. सरासरीपेक्षा 70 टक्के पाऊस कमी झाल्याने यावर्षी डिसेंबरपासूनच पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याचा परिणाम पिकांवरही होत असून तालुक्यात बहुतांश भागात मिरची पीक घेतली जाते. मात्र पाऊस न झाल्याने नदी-नाले तसेच कूपनलिकांची पाणीपातळी पूर्णपणे खालावली असल्याने पिकांना जगवणे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान ठरले आहे. तालुक्यात नगदी पीक म्हणून उसाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली असून, सुमारे 20 हजार हेक्टरवर ऊसपीक घेण्यात येते. मात्र पावसाने दगा दिल्याने यावर्षी उसाचीही वाढ म्हणावी तशी झाली नाही. मागीलवर्षी जानेवारीपासून जूनपर्यंत एकदाही वळिवाचा पाऊस झाला नव्हता. यावर्षीही मार्च महिना संपत आला तरी एकदाही वळिवाच्या पावसाने हजेरी लावलेली नाही. तालुक्यातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनता उष्म्याने हैराण झाली असून वळीव पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. वळिवाच्या पावसाने यावर्षी हुलकावणी दिल्यास दुष्काळ आणि पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे. अद्याप अजूनही अडीच महिने उन्हाचे चटके सोसावे लागणार आहेत. त्यामुळे तालुक्यात सर्वत्र भीषण दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात अनेक गावातून भीषण पाणीटंचाई जाणवत असून पुढील अडीच महिन्यात पाण्याचा प्रश्न गंभीर होणार असल्याने तालुक्यातील अनेक गावांत टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे. शासनानेही याबाबत नियोजन सुरू केले आहे. येत्या काही दिवसात वळिवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्यास थोडाफार हवेत गारवा निर्माण होईल तसेच पिकांनाही मदत होणार आहे. मात्र गेल्या दोन वर्षापासून वळिवानेही पाठ फिरवल्याने यावर्षी दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्या तालुक्यात 35 ते 38 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. मात्र वळिवाच्या पावसाचा थांगपत्ताच नसल्याने उष्म्यापासून सुटका होण्यासाठी सर्वांचेच डोळे आकाशाकडे लागले आहेत.
पावसाअभावी जंगलातील पाणीसाठा पूर्णपणे संपल्याने जंगलातील सर्वच प्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येत असल्याने ग्रामीण भागातील जीवनावर याचा मोठा परिणाम होत आहे. अलीकडे हत्ती, गवे, चित्तळ, अस्वल आणि बिबटे हे मानवी वस्तीजवळच वास्तव्य करत असल्याने ग्रामीण तसेच दुर्गम भागातील नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. वनखात्यानेही आपल्यापरीने प्रयत्नांची पराकाष्ठा करून वन्यप्राण्याना जंगलात हुसकावण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र जंगलातील पाणीसाठाच संपून गेल्याने वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीजवळ वावर वाढलेला आहे. ही चिंताजनक बाब बनली आहे.
वळिवाच्या जोरदार पावसाची सर्वांनाच प्रतीक्षा
दरवर्षी होळी पौर्णिमेच्या काळात वळिवाच्या पावसाला निश्चितपणे सुरुवात होत होती. मात्र गेल्या वर्षीपासून या परंपरेला निसर्गाने छेद दिल्याने वळिवाच्या पावसानेही पाठ फिरविली आहे. आता शिमगोत्सवही संपल्याने शेतकरी आणि सर्वसामान्य जनता वळिवाच्या प्रतीक्षेत आहेत. जर वळिवाच्या पावसाला सुरुवात झाल्यास खरिपाच्या पेरणीसाठी शेती तयार करण्याच्या कामाला वेग येणार आहे.