For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्वर्गीय अनुभूती देणारा स्वर्गमंडप

12:56 PM Sep 03, 2025 IST | Radhika Patil
स्वर्गीय अनुभूती देणारा स्वर्गमंडप
Advertisement

सांगली / सचिन ठाणेकर :

Advertisement

गणेशोत्सव म्हटलं की सजावट, देखावे आणि नावीन्य यांची उत्सुकता सर्वांनाच असते. यंदा सांगलीतील चिन्मय पार्कमध्ये राहणारे सारंग संजय पाटील यांनी आपल्या घरच्या हॉलमध्येच एक आगळावेगळा देखावा उभा केला आहे. दरवर्षी ऑडिओ-व्हिडिओच्या साहाय्याने नाट्यरूप प्रयोग सादर करणारे पाटील यंदा भक्तांना थेट ऐतिहासिक मंदिराची सफर घडवून आणत आहेत.

त्यांनी प्रसिद्ध कोपेश्वर मंदिराच्या स्वर्गमंडपाची प्रतिकृती साकारली आहे. खिद्रापूरातील कोपेश्वर मंदिर हे वास्तुशैलीसाठी जगप्रसिद्ध आहे. गर्भगृह, अंतराळ, आच्छादित मंडप आणि खुला स्वर्गमंडप अशी त्याची रचना आहे. मध्यभागी असलेली वर्तुळाकार रंगशिळा आणि तिच्या सभोवतालचे बारा भक्कम स्तंभ पाहताक्षणी भुरळ घालतात. व बाहेरील 36 स्तंभांवर कोरलेले कोरीव काम भक्तांना भूतकाळात घेऊन जातात.

Advertisement

सर्व वैशिष्ट्यांचा सुबक आविष्कार पाटील यांनी आपल्या आरासीत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. देखाव्यात आकर्षक प्रकाशयोजना व सर्किट्सची जबाबदारी स्वतः सारंग पाटील यांनी सांभाळली आहे. रंगकाम राजू बाबर, तांत्रिक सहाय्य कौशिक खरे, तर निवेदनाची मांडणी सांगली आकाशवाणीचे माजी निवेदक संजय पाटील यांनी केली आहे. या स्वर्गमंडपातील मोकळ्या छतातून पाहिल्यास खुले आकाश स्वर्गसम भासते. त्रिपुरारी पौर्णिमेला या स्वर्गमंडपातून पूर्ण चंद्र पाहण्यासाठी खूप गर्दी लोटते.

या आरासीमध्ये स्वर्गमंडपाच्या मध्यभागी विराजमान असलेल्या गणेशमूर्तीची निर्मिती मूर्तिकार रोहित पाटील यांनी केली आहे. त्यासाठी त्यांना शीतल पाटील यांचेही सहाय्य लाभले आहे. तसेच देखाव्यासाठी अनेक तरुणांनी मनापासून परिश्रम घेतले आहेत. त्यात किशोर चव्हाण, प्रकाश निकम, बिट्टू कागवाडे, रवींद्र कुंभार, विपुल मोहिते, सदानंद कदम, ऋषिकेश गुड्डी, सुमित चोपदार, राहुल नलवडे, आकाश सुतार, महेश पाटील यांचा सहभाग आहे. अनंत चतुर्थीच्या दिवसांपर्यंत आरास अनुभवावी, यासाठी आवाहन केले आहे.

ही कलात्मक प्रतिकृती पाहताना ध्वनी व प्रकाशाच्या सहाय्याने 10 मिनिटांच्या देखाव्यात भक्तांना जणू प्रत्यक्ष कोपेश्वर मंदिरात प्रवेश केल्याचा अनुभव मिळणार आहे. सांस्कृतिक वारशाचा गौरव, पारंपरिक मंदिरशैलीची ओळख आणि आधुनिक प्रकाशयोजनेची झळाळी या तिन्हींचा सुंदर संगम म्हणजेच पाटील यांची यंदाची आरास.

सारंग पाटील यांनी यापूर्वीही अनेक देखावे सादर केले आहेत. प्रतिवर्षी वेगवेगळ्या विषयांवरील आधारित असलेले त्यांचे देखावे खूप गाजले. गतवर्षी त्यांनी राज्यातील विविध नाट्यमंदिराच्या प्रतिकृती केल्या होत्या. गाजलेली 9 नाटके आणि 9 नाट्यगृहात ध्वनी, प्रकाशाच्या माध्यमातून त्यांनी प्रत्यक्ष रंगमंचीय अनुभव दिल्याने नाट्यगृहातच असल्याचा भास प्रेक्षकांना झाला होता.

Advertisement
Tags :

.