पस्तीस माणसांचे आनंदी घर
कोल्हापूर / सुधाकर काशीद :
रंकाळ्याजवळच्या हरीओम नगरातून पुढे निघाले, की लाडबंधूंचा मळा लागतो. मळ्यात कौलारू धाटणीचे चौसोपी घर दिसू लागते. या घराची रचना साधी आणि सुटसुटीत. पण इथे काहीतरी नक्की वेगळे आहे, याची बघताक्षणी जाणीव हे घर करून देते. ‘हम दो हमारे दो’ अशा सध्याच्या कुटुंबव्यवस्थेत या घरात मात्र आजही 35 जण एकत्र राहत आहेत आणि खरोखरच एखाद्या घरात गोकुळ कसे नांदते’ याचे उदाहरण या कुटुंबातील सर्वजण दाखवून देत आहेत.
लक्ष्मण तातोबा लाड आणि यशोदाबाई हे या घराचे मूळ आधारस्तंभ. मूळ व्यवसाय शेतीचा, त्यामुळे दिवसभर काही ना काही कामातच. पण शेती अशी करायची की लक्ष्मण लाडांचे गुऱ्हाळ कसे चालते, हे पाहायला लांबून-लांबून लोक यायचे. या लक्ष्मण लाडांना पाच मुले. तानाजी, महादेव, सदाशिव, मधुकर, आणि शामराव ही पाच मुलेही त्याच शिस्तीत वाढलेली. केवळ शेतीवर अवलंबून राहून भविष्यात चालणार नाही म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रातही प्रयत्न करणारी. या पाचही मुलांची लग्न झाली आणि पाच सुना घरी आल्या. घरातल्या लोकांची संख्या वाढली. या पाच जणांना मुले झाली. कुटुंबाची संख्या आणखी वाढली. त्यात पुन्हा नातवंडांची भर पडली आणि घरात गजबज वाढली.
साधारणपणे घरातील लोकांची संख्या वाढली की स्वतंत्र रहायला सुरुवात होते. एकाच घराची दोन घरे होऊ लागतात. दोन चुली मांडल्या जातात. पण लाड परिवाराची भावना अशी, की आपण सारे एकत्रच राहायचे. अनेक जण म्हणतात, की ‘पुरुषांचं एवढं काय नसते, पण बायका बायकांचे पटणे फार कठीण असते,’ पण लाडांच्या घरात सुना म्हणून आलेल्या पाचही जणींनी एकत्र कुटुंबालाच पसंती दिली. फक्त राहण्याची अडचण नको म्हणून जुन्या घराच्या जागी मोठे घर बांधून राहण्यासाठी व्यवस्थित सोय करून घेण्यात आली. आज या घरात 35 जण एकत्र राहतात. घरात 16 खोल्या आहेत. घराचे नाव लक्ष्मण कुंज आहे. घरासमोर मोठाच्या मोठा व्हरांडा आहे. .धान्य, डाळी, पापड, कुरवड्या, सांडगे वाळत घालण्यासाठी मस्त अंगण आहे. शकुंतला, भारती, सरिता, माया, शारदा या पाच सुना घरातले सर्व व्यवहार पाहतात.
चहा, नाश्ता, जेवण काय करायचे, त्याचे नियोजन करतात आणि वैशिष्ट्या हे की गॅसचा वापर न करता घरगुती चुलीवरच सारे जेवण तयार करतात. त्यांच्या हातच्या चुलीवरच्या भाकरी टम्म फुगतात आणि खरोखर ‘घरचे जेवण ते घरचेच जेवण’ याचा अनुभव घरातले सारेजण रोज घेतात. त्याहून विशेष हे की, रात्रीच्या जेवणाची रोज एकत्र पंगत असते. घरातल्या कोणी रात्री उशिरा घरी येणे किंवा बाहेरून जेवून येणे या घराला मान्यच नसते. त्यामुळे रोज रात्री या घरात अंगतपंगत बसते.
घरची शेतीभाती भरपूर आहे, त्यामुळे त्यावरच सर्वांनी अवलंबून राहायचे, घरात गावात रुबाब करत बसून खायचे, असला प्रकार या घरात नाही. त्यामुळे या कुटुंबातील दीपक, विनायक सोनारकाम करतात. राजीव सेंद्रीय गूळ, काकवी विकतात. विजय, योगेश, संग्राम, मयूर शेती बघतात. पण फक्त शेतीच नव्हे तर ते बी.कॉम., एम.कॉम., रोबोटिक इंजिनियर, रेफ्रिजरेटर मेकॅनिक अशा शिक्षणाचीही त्यांनी जोड घेतली आहे तर घरातल्या मुलींपैकी स्नेहल डॉक्टर, सोनाली आणि अनुजा कॉम्प्युटर इंजिनिअर, विद्या बी.एड्. आणि मुक्ता शिकत आहेत. त्यामुळे या घराला शिक्षणाचीही जोड मिळाली आहे आणि त्यामुळे शिस्तही आहे. या घरात पूजा, दिपाली, शिवानी, सपना, प्रियांका, प्रेरणा, साक्षी या नातसुना आहेत. राजमुद्रा, शिवमुद्रा, राजवीर, राजीव, ऋतुराज, नारायणी, कृष्णराज, दुर्वा, राधा ही नातवंडे आहेत. घरात सकाळी उठल्यापासून पोरांचा किलबिलाट सुरू असतो. सणासुदीला तर घराची शोभा आणखीनच वाढते. गणपतीच्या आरतीला सगळेजण जमतात. एका सुरात आरती म्हणतात. रात्री अंगणात खुर्च्या टाकून सारेजण बसतात. आज काय, उद्या काय, याची चर्चा करतात. रात्री कारणाशिवाय घराबाहेर कोणी जायचे नाही, अशी या घराची अट आहे आणि घरातली प्रत्येक अट पाळायची, ही सर्वांची भावना आहे. त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती येथे आनंद आणि समाधानात जपली गेली आहे.
- महिन्याला वाढदिवस...
घरात 35 माणसं. त्यामुळे महिन्याला कोणाचा तरी वाढदिवस हमखास असतो आणि तो सर्वांच्या उपस्थितीत साजरा केला जातो. या घरात ज्येष्ठांच्या शब्दाला खूप मान आहे. त्यामुळे ते जे सांगतील किंवा ते जे निर्णय घेतील, ते सर्वजण मानतात.
- मोठ्या कुटुंबाचा स्विकार
अलीकडच्या मुलींना नवऱ्याच्या घरात दीर, नणंदही नको असते. ज्या घरात फक्त सासू-सासरे आणि मुलगा अशा घरालाच मुलींकडून प्राधान्य दिले जाते. पण या घरात नातसुनाही आल्या आहेत आणि त्यांनी हे मोठे कुटुंब स्वीकारले आहे आणि मोठ्या कुटुंबात राहूनही आनंद कसा घेता येतो, हे त्या अनुभवत आहेत.
- जेवण सर्वांना मान्य...
चार माणसांच्या कुटुंबातही रोजच्या जेवणात भाजी काय करावी, याबद्दल एकमत होत नसते. पण या 35 जणांच्या कुटुंबात पाच ज्येष्ठ सुना जे काय ठरवतील ते जेवण सर्वांना मान्य असते.