For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फलटण तालुक्यातील मलवडी येथे निर्घृण खून; सख्या मावसभावाचे कृत्य

11:32 AM Oct 20, 2023 IST | Kalyani Amanagi
फलटण तालुक्यातील मलवडी येथे निर्घृण खून  सख्या मावसभावाचे कृत्य
Advertisement

फलटण प्रतिनिधी

Advertisement

महिलांबाबतच्या गैरवर्तुनीकीच्या संशयावरून मलवडी (ता.फलटण) येथील अनिल नामदेव चव्हाण (वय ४२) याचा अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने डोक्यात वार करून निर्घृण खून केल्याची घटना मलवडी या गावात घडली असून मयताच्या पत्नीच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, मयत अनिल नामदेव चव्हाण नेहमीप्रमाणे मलवडी गावच्या हद्दीतील वनखात्याच्या शिवारात प्रातःविधीसाठी सकाळी गेले असता अज्ञात इसमाने धारदार शस्त्र चव्हाण यांच्या डोक्यात मारले. सकाळी ८ च्या सुमारास ही घटना घडल्यानंतर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी तात्काळ रवाना झाले. चव्हाण यांचा मृतदेह निर्जनस्थळी रक्ताच्या थारोळ्यात पोलिसांना आढळून आला. दरम्यान मयताच्या पत्नीने ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मयत अनिल नामदेव चव्हाण यांचा खून महिलांबाबतच्या गैरवर्तणुकीच्या कारणावरून झाल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना प्राप्त झाली होती. मयत यांचा सख्खा मावसभाऊ असलेला आरोपी पोपट खाशाबा मदने हा घटनास्थळी बघ्यांच्या गर्दीमध्ये वावरत होता. पोलिसांनी बघ्यांच्या गर्दीमधून आरोपी पोपट खाशाबा मदने याच्या हालचाली व देहबोलीहेरून त्यास संशयाच्या आधारे चौकशीसाठी ताब्यात घेतले. मदने याने तब्बल ३ उडवाउडवीची उत्तरे देत पोलिसांची दिशाभूल केली. मात्र, पोलिसांनी पोलीसी खाक्या दाखवताच आरोपीने त्याच्या अल्पवयीन मुलाच्या मदतीने खून केला असल्याची कबुली दिली. यानंतर फलटण ग्रामीण पोलिसांनी आरोपी मदने व अल्पवयीन मुलगा यांच्या विरुद्ध भा.दं.सं. कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपी मदने व अल्पवयीन मुलगा यास पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना अटक केले. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील महाडिक करीत आहेत.

Advertisement

जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांचे मार्गदर्शन व सूचनानुसार पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ रानगट, अशोक हुलगे, पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, प्रमोद दीक्षित, पोलीस अंमलदार संजय अडसूळ, गार्डी, वैभव सुर्यवंशी, नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, अमोल पवार, विक्रांत बनकर, हनुमंत दडस, श्रीकांत खरात, विक्रम कुंभार, तुषार नलवडे आदी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन मलवडी येथील वन खात्याच्या जंगलात जाऊन अवघ्या ३ तासात खुनाचा उलघडा करून आरोपीस जेरबंद केले.

Advertisement
Tags :

.