इटगीतील विद्यार्थ्यांचा गटशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या
विद्यार्थ्यांचे दाखले न दिल्याने गटशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
खानापूर : तालुक्यातील इटगी येथील सरकारी कन्नड शाळेला आठवीचा वर्ग सुरू करण्याचे आदेश नुकताच शिक्षणमंत्री मधू बंगाराप्पा यांनी दिले होते. खासगी शाळेतील 45 विद्यार्थ्यांनी सरकारी शाळेत प्रवेश घेतला होता. मात्र खासगी शाळेच्या मुख्याध्यापकांनी या विद्यार्थ्यांचे दाखले न दिल्याने विद्यार्थी आणि पालकांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. जोपर्यंत दाखले मिळणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी ठाम भूमिका पालक आणि विद्यार्थ्यांनी घेतली. त्यामुळे गटशिक्षणाधिकाऱ्यांनी खासगी शाळेच्या मुख्याध्यापकांवर नंदगड पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली.
इटगी येथील सरकारी कन्नड शाळेत आठवीचा वर्ग सुरू करण्यासाठी नुकताच शिक्षणमंत्र्यांनी हिरवा कंदील दिला होता. त्यामुळे खासगी शाळेतील 45 विद्यार्थ्यांनी सरकारी शाळेत प्रवेश घेतला त्यानंतर या विद्यार्थ्यांचे दाखले मिळविण्यासाठी सरकारी शाळेतील शिक्षकांनी आणि पालकांनी खासगी शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्रव्यवहार केला मात्र महिन्याभरापासून दाखले न दिल्याने पालकांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना आणि जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र त्यांनी जराही गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे पालकांनी गुरुवारी दुपारी आंदोलनाचा निर्णय घेतला.
त्यानंतर सायंकाळी 4 वाजता खानापूर गटशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. सायंकाळी 7 वाजता या ठिकाणी गटशिक्षणाधिकारी पी. रामाप्पा दाखल झाले. त्यांनी पालकांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. मात्र पालक आणि विद्यार्थ्यांनी याच ठिकाणी रात्री आंदोलन सुरू ठेवू, असे जाहीर केले. त्यानंतर या ठिकाणी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर घाडी, सुरेश जाधव, तोहीद पांडुरंग पाटील, चादणकण्णावर, प्रसाद पाटील, सूर्यकांत कुलकर्णी, यासह इतर कार्यकर्ते दाखल झाले. गटशिक्षणाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली.
यानंतर काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी नंदगड पोलीस स्थानकात दाखल झाले आणि खासगी विद्यालयाच्या मुख्याध्यापकाविरोधात लेखी तक्रार दाखल केली. नंदगड पोलीस स्थानकाचे निरीक्षक रविकुमार धर्मट्टी यांनी तक्रार दाखल करून घेऊन मुख्याध्यापकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून शुक्रवारी कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे दाखले द्यावे अन्यथा कारवाई करण्याचा इशाराही दिला. तसेच विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची शनिवारी शेवटची तारीख असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. यासाठी कोणत्याही परिस्थितीत आजच दाखले द्यावे, अशी मागणी पालकांनी केली. यावेळी काही पालकांनी गटशिक्षणाधिकारी आणि जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला.
विद्यार्थ्यांचे नुकसान
इटगी सरकारी शाळेतील आठवीचा वर्ग रद्द करून तो अन्यत्र हलविण्यात आला होता. दोन महिन्यांपासून पालकांनी तीव्र आंदोलन केले होते. त्यानंतर माजी आमदार अंजली निंबाळकर यांच्या प्रयत्नामुळे शिक्षणमंत्र्यांनी इटगी येथे आठवीचा वर्ग पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे सरकारी शाळेत आठवीचा वर्ग सुरू केल्याने विद्यार्थ्यांची सोय झाली होती. मात्र खासगी शाळेतील संचालक आणि शिक्षकांच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.