शिवराज्याभिषेक-जयंतीचे भरगच्च कार्यक्रम
पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांची माहिती : पर्वरी, डिचोली येथे राज्यस्तरीय कार्यक्रम,अन्य पाच शहरांतही शिवजयंती सोहळा
पणजी : छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा 6 जून 1674 रोजी झाला होता. या राज्याभिषेक सोहळ्यास यंदा 350 वर्षे होत असल्याने तसेच याच महिन्यात 19 रोजी शिवजयंती होत असल्याने या मुहूर्तावर गोवा पर्यटन खात्यातर्फे डिचोली येथे राज्यपातळीवर राज्याभिषेक, जयंती सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 18 रोजी डिचोली येथे तर 19 रोजी पर्वरी येथे मुख्य कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली. पणजीतील पर्यटन भवनात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री खंवटे यांनी या सोहळ्याची संपूर्ण माहिती दिली. डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट उपस्थित होते.
मंत्री खंवटे यांनी सांगितले की, शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला 18 रोजी डिचोलीत अखिल गोवा वेषभूषा स्पर्धा होईल. डिचोलीतील शिवाजी महाराज मैदानात कार्यक्रमांचे उद्घाटन होईल. त्यानंतर संध्याकाळी अखिल गोवा पातळीवर महिलांसाठी फुगडी स्पर्धा घेण्यात येईल. 19 रोजी डिचोली येथून शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात येईल. यामध्ये राज्याभिषेक सोहळा दर्शविणारी सजीव पात्रे दाखवली जाणार आहेत. ही रॅली डिचोली येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानापासून निघेल. ज्यामध्ये दिंडी, लेझीम, ढोल ताशे तसेच अन्य बरेच काही दाखवणाऱ्या गटांचे मनमोहक सादरीकरण असेल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेटये उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी 7 वाजता डिचोलीतील छत्रपती शिवाजी मैदानावर ‘मराठी पाऊल पडती पुढे’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
शिवाजी महाराज पुतळ्याचे अनावरण
19 रोजी पर्वरी येथे संध्याकाळी 6 वाजता शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे, पर्यटनमंत्री रोहन खंवटे उपसभापती जोशुआ डिसोझा, साळगावचे आमदार केदार नाईक, जि. पं. सदस्य कविता नाईक, सरपंच स्वप्नील चोडणकर, सरपंच सोनिया पेडणेकर यांच्यासह मान्यवर, पंच सदस्य पुतळा अनावरण समारंभास उपस्थित राहणार आहेत.
पाच नगरपालिकांना पर्यटनखात्याचा निधी
राज्यातील सांखळी, मडगाव, वास्को, म्हापसा, फोंडा या नगरपालिका क्षेत्रात शिवजयंती सोहळा साजरा करण्यासाठी तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी पर्यटन खात्यातर्फे प्रत्येकी 5 लाख ऊपयांचा निधी देण्यात येत आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली. या उत्सवांमध्ये शिवाजी महाराजांच्या वारशाचे प्रतीक असणारे सांस्कृतिक कार्यक्रम आणि सादरीकरणे यांचा समावेश असेल, असे खंवटे म्हणाले.
शिवकालीन शस्त्रास्त्रे, नाण्यांचे प्रदर्शन
शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील शस्त्रास्त्रs आणि नाण्यांचे प्रदर्शन 18 ते 20 फेब्रुवारी या दरम्यान पर्वरी येथील डीआयईटी सभागृहात भरविण्यात येणार असून, सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत प्रदर्शन खुले राहणार आहे. सर्व शाळांना एका अनोख्या शैक्षणिक अनुभवासाठी प्रदर्शनाचे साक्षीदार होण्यासाठी आमंत्रित केले आहे.