Kolhapur News : ‘यळकोट यळकोट जय मल्हार’च्या गजरात पालखीचा भव्य मिरवणूक सोहळा उत्साहात
खोलखंडोबा मंदिरात पालखी सोहळा उत्साहात
कोल्हापूर : पारंपरिक उत्साहात आज रात्री शनिवार पेठेतील खोलखंडोबा मंदिरात पालखी सोहळा उत्साहात पार पडला. पारंपरिक वाद्यांसह रांगोळ्या, फुलांच्या पायघड्या, आकर्षक विद्युतरोषणाईच्या साथीने सजलेल्या या सोहळ्यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
मंदिरात काल पारंपरिक पद्धतीने जागरणाचा सोहळा झाला. उत्सवातील मुख्य दिवस असल्याने आज सकाळपासूनच मंदिरात यळकोट यळकोट जय मल्हार, खंडोबाच्या नावानं चांगभलच्या गजरात भंडाऱ्याची उधळण दर्शनासाठी मोठी गर्दी होती. दुपारपासूनच मंदिरात पालखी सोहळ्याची तर शनिवार पेठेतील घराघरांत पालखीच्या सोहळ्याची तयारी सुरू झाली.
मंदिराला प्रदक्षिणा घातल्यानंतर पालखी मंदिरातून बाहेर पडली. 'यळकोट यळकोट जय मल्हार' अशा अखंड गजरात आणि भंडाऱ्याच्या उधळणीत शनिवार मंडप, बुरुड गल्ली, विठ्ठल मंदिरमार्गे पुन्हा खोलखंडोबा मंदिर असा पालखीचा मार्ग राहिला. केके बॉईज मंडळाने सोहळ्याचे नेटके संयोजन केले.
परिसरातील मंडळांनी पालखीचे जोरदार स्वागत केले. खंडेराव जगताप, पूजा जगताप, आरती जगताप यांनी विविध धार्मिक विधी केले. रात्री आठच्या सुमारास माजी स्थायी समिती सभापती नंदकुमार मोरे, ऋतुराज क्षीरसागर, अनिल पाटील, सुशील भांदिगरे यांच्यासह परिसरातील ज्येष्ठांच्या उपस्थितीत पालखीला प्रारंभ झाला.