Satara News : साताऱ्यात 'छत्रपती कृषी 2025'मध्ये रंगला भव्य डॉग & कॅट शो
जर्मन शेफर्ड प्रकारातील विजेते श्वानांनी उपस्थितांचे मन जिंकले
सातारा : येथील जिल्हा परिषद मैदानावर स्मार्ट एक्सपो, सांगली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती कृषी २०२५ या प्रदर्शनामध्ये भारतीय आणि परदेशी जातीच्या विविध श्वानांनी उपस्थित सातारकरांचे लक्ष वेधून घेतले. डॉग शोमध्ये भारतीय जातीच्या मुधोळ हाऊंड जातीच्या अमोल मोरे यांच्या श्वानाने प्रथम, तर ग्रे हाऊंड प्रकारामध्ये सुयश किर्दत, निरंजन साळुंखे आणि अजित तावरे यांच्या श्वानांनी पारितोषके मिळवली.
कारवान हाऊंड जातीच्या प्रकारामध्ये महेश जाधव, सोहम महामुलकर आणि आनंदा शिंदे यांच्या श्वानांनी अनुक्रमे पारितोषिक मिळवली. पश्मी जातीच्या श्वान प्रकारात अनिकेत सोनावणे यांचा श्वान विशेष लक्ष वेधून घेणारा ठरला. वीपीटी प्रकारात बाबू शेळके यांच्या श्वानाने पारितोषिक मिळवले. लार्ज ब्रीड प्रकारामध्ये ग्रेट डेन जातीच्या अक्षय साळुंखे आणि विजय गायकवाड यांच्या श्वानांनी प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविला.
तर डोगो अजिंटिनो प्रकारात वैभव चव्हाण, सत्यम शेलार आणि प्रकाश चव्हाण यांच्या श्वानांनी पारितोषके मिळवली. मध्यम उंचीच्या प्रकारात डॉबरमॅन गटात धैर्यशील खेडेकर, अनिकेत भोसले आणि अभय पिसाळ यांच्या श्वानांनी पारितोषिके प्राप्त केली. तर रॉटविलर प्रकारात संतोष पिसाळ, अजिंक्य भोकरे आणि रवींद्र पाटील यांचे श्वान विजेते ठरले. गोल्डन रॉ टविलर प्रकारात आशुतोष महामुलकर, अजय अहिरे आणि रोहन गोरे यांच्या श्वानांनी पारितोषिके प्राप्त केली.
लॅब्रॉडॉर प्रकारामध्ये अजय अहिरे, महेश जाधव आणि स्वप्निल काळेकर यांच्या श्वानांनी पारितोषके मिळवली. जर्मन शेफर्ड प्रकारात ओमकार भगत, निखिल कापसे आणि अश्विनी कदम यांच्या श्वानांनी पारितोषिके मिळविली.
छत्रपती महोत्सवातील कॅट शो स्पर्धेमध्ये पर्शियन पंच फेस प्रकारात शाहीन मुलाणी, तमझील आतार व सिद्धार्थ गडकरी यांच्या मांजरांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवले. तर पर्शियन डॉल फेस प्रकारामध्ये नारायण पामणाणी, सोफिया पट्टणकोटे, आयेशा सय्यद यांनी पारितोषिक मिळवली. आज या छत्रपती कृषी महोत्सवाचा सांगता सोहळा होणार असून रात्री नऊ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे.