जनतेच्या मनातले सरकार स्थापन होईल
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साताऱ्यातील पत्रकार परिषदेतून ग्वाही : भाजपची गटनेता निवड लांबणीवर
प्रतिनिधी/सातारा/मुंबई
सरकारने लाडकी बहिण, लाडका भाऊ, लाडका ज्येष्ठ नागरिक आणि लाडका शेतकरी या सगळ्यांसाठी योजना आणल्या. आम्ही ज्या योजना आणल्या त्या पूर्ण करणार, आमचे उत्तरदायित्व जनतेबाबत आहे. त्यामुळे जनतेच्या मनातील सरकारचं स्थापन होणार याबाबत मला खात्री आहे, असे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले. दुसऱ्या बाजूला शिवसेनेसोबतची सत्ता वाटपाची बोलणी पूर्ण होत नसल्याने भाजपची गटनेता निवडही पुन्हा लांबणीवर पडली आहे.भाजप राज्यात नंबर एकचा पक्ष होऊनही त्यांची सत्तास्थापनेबाबत कोंडी झाली आहे. यामुळे भाजप आमदारांची गटनेता निवडीची बैठक आज 2 डिसेंबर रोजी होणार होती. मात्र, ही बैठक आता उद्या 3 डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती आहे.
महायुती प्रचंड मताधिक्यानी जिंकलो आणि जनतेच्या मनातले सरकार आता स्थापन होईल. लोकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. गेली अडीच वर्ष आम्ही जे काम केले. मी नेहमी भाषणात सांगायाचो. अडीच वर्ष केलेल्या कामाची पोहच पावती जनता देईल. त्याप्रमाणे प्रकल्प थांबवले होते ते आम्ही वेगाने पुढे नेले. विकास आणि कल्याणकारी योजना यांची सांगड आम्ही घातली. आज कल्याणकारी योजना आपण पाहिल्या तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आणि इतर योजना आहेत. मुलीचे शिक्षण असेल वयश्री योजना असेल शेतकऱ्यांच्या योजना असतील, आतापर्यंतच्या इतिहासात कधीही न झालेल्या योजनांचा निर्णय महायुतीने अवघ्या सव्वा दोन वर्षात घेतला आहे. हा इतिहास आहे. आमचा अजेंडा विकासाचा होता. म्हणून सर्वसामान्यांचे सरकार स्थापन होणार, गोरगरिबांचे सरकार स्थापन होणार असे त्यांनी ठामपणे पत्रकारांना सांगितले.
दरम्यान, आता विरोधकांना प्रश्नच उरले नाहीत म्हणून ते ईव्हीएमबद्दल बोलतात, ईव्हीएमवर आक्षेप घेत आहेत. विरोधकांनी लोकसभेवेळी आक्षेप घेतला नाही ईव्हीएमवर, लोकसभेच्या पोटनिवडणुकीत त्यांचेच सदस्य निवडून आले आहेत. झारखंडमध्ये त्यांचे सरकार सत्तेवर आले आहे, तरीही महाराष्ट्रातला पराभव त्यांना वर्मी लागल्याने ईव्हीएमवर आगपाखड करु लागले आहेत, अशा शब्दात त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.
सत्तास्थापन करताना गावाला यायचे नाही का? : मुख्यमंत्री
गावी यायचे नाही असा काही नियम आहे का?, मी नेहमी गावी येतो. गावी आले की मला आनंद भेटतो. मला लोक भेटतात. माझी शेती आहे, शेतीकडे मी जातो. एक वेगळा आनंद मला मिळतो. मी गरीब शेतकरी परिवारातून आलेलो आहे. त्यामुळे मला गरिबीची जाणीव आहे. सर्वसामान्यांच्या परिवाराची मला जाणीव आहे.
श्रीकांत शिंदेच्या बाबत अफवा आहेत
एका पत्रकाराने आवर्जून विचारणा केली की, श्रीकांत शिंदे हे उपमुख्यमंत्री होणार म्हणून नाव चर्चेत येत आहे, त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, त्या सर्व अफवा आहेत. भाजपा, राष्ट्रवादी आणि आमच्यामध्ये कुठलाही समन्वयाचा अभाव नाही. मी बुधवारी पत्रकार परिषद घेवून आमची भूमिका मांडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमितभाई, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष जे. पी. न•ा हे मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतील. त्यांच्या निर्णयाचा आमचा पाठींबा आहे. माझा निर्णय मी घेतला आहे. ज्या जनतेच्या अपेक्षा होत्या. त्यानुसार मी सीएम म्हणून नव्हे तर कॉमनमॅन म्हणून काम केले, असेही त्यांनी निक्षून सांगितले.
भाजप गटनेता निवडीची उद्या बैठक
भाजप आमदारांचा जीव टांगणीला : शपथविधी ठरला पण मुख्यमंत्री ठरेना
राज्याच्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने सत्तेवर आलेल्या महायुतीमध्ये सत्ता स्थापनेसाठी बराच खलबते सुरू असल्याचे दिसून आले. महायुती सरकारचा नवा मुख्यमंत्री, खाते वाटपावरून तिढा अद्याप संपलेला नाही. राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन एक आठवडा उलटला. मात्र, अद्यापही सरकार स्थापन झाले नाही. भाजपकडून मुख्यमंत्री शपथविधीची तारीख आणि ठिकाण ठरले असले तरी भाजप विधीमंडळ गटनेता निवडीची बैठक आज 2 डिसेंबर रोजी होती मात्र ती पुन्हा लांबणीवर जात उद्या 3 डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे भाजप आमदारांचा जीव टांगणीला लागल्याची स्थिती आहे.
भाजपकडून रोज एका नावाची चर्चा
भाजपच्या आमदारांची गटनेते पदासाठी निवड होत नसल्याने, भाजपकडून धक्कातंत्राची शक्यता असल्याची चर्चा घडत आहे. कधी विनोद तावडे ,पंकजा मुंडे यांच्यानंतर शनिवारी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे नाव चर्चेत होते. तर रविवारी डोंबिवली येथील भाजपचे आमदार माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नावाची मुख्यमंत्री पदासाठी चर्चा सुरू होती. चव्हाण यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतल्याची चर्चा होत असताना, चव्हाण यांनी मात्र कोणतीही भेट झाली नसून ,सर्व चर्चा निरर्थक असल्याचे सांगितले.
महायुतीतच जुपली
एकीकडे महायुतीने अद्याप सत्तास्थापनेचा दावा केलेला नाही. त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अद्याप ठरलेला नाही. त्यामुळे महायुतीवर विरोधक टीका करत असतानाच महायुतीचे नेते देखील एकमेकांवर टीका करताना दिसू लागले आहेत. महायुतीमधील काही नेत्यांनी एकमेकांवर टीकेची झोड उठवल्याचं पाहायला मिळत आहे. महायुतीत अजित पवार नसते तर आमच्या 90 ते 100 जागा निवडून आल्या असत्या”, असा दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी केला आहे.
दोन दिवसांनी शिंदे मुंबईत
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक सातारा येथील गावी गेल्यानंतर रविवारी ते दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर मुंबईत आले. गेली दोन दिवस चाललेल्या सत्तावाटपाचा तिढा आणि मुख्यमंत्री तसेच इतर खात्यांबाबतचा तिढा सोमवारी महायुतीची बैठक होऊन सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.