For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सोन्याची टिक्की चोरली; मात्र परतही मिळवली!

06:51 AM Feb 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
सोन्याची टिक्की चोरली  मात्र परतही मिळवली
Advertisement

यमनापूरच्या दोन महिलांचे प्रसंगावधान

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

‘आम्ही यल्लम्माचे भक्त आहोत. डोंगरावर जाण्यासाठी वर्गणी गोळा करीत आहोत’ असे सांगत घरोघरी फिरणाऱ्या दोन महिलांनी यमनापूर येथील एका वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची टिक्की पळविल्याची घटना शनिवारी दुपारी यमनापूर येथे घडली आहे. त्याच गावातील दोन महिलांनी पाठलाग करून ती टिक्की परत वृद्धेला मिळवून दिली आहे.

Advertisement

माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांना या घटनेची माहिती मिळताच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन त्या फुटेजवरून टिक्की चोरणाऱ्या महिलांचा शोध घेण्यात येत आहे. वृद्धेचे दागिने घेऊन पळून जाताना धाडसाने त्यांना पकडलेल्या शांता अमृत गस्ती व सुवर्णा लगमाप्पा गस्ती यांच्या धाडसाचे पोलीस निरीक्षकांनी कौतुक केले आहे.

उपलब्ध माहितीनुसार शनिवार दि. 10 फेब्रुवारी रोजी दोन अनोळखी महिला यमनापूर परिसरात घरोघरी फिरत होत्या. ‘आम्ही यल्लम्मादेवीच्या सेवक आहोत. काकतीहून आलो आहोत. डोंगरावर जाण्यासाठी पैसे द्या’ असे सांगत या महिला घरोघरी वर्गणी गोळा करीत होत्या. भंडारा लावून वर्गणी देणाऱ्यांना आशीर्वादही देत होत्या.

याचवेळी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास लक्ष्मीबाई सिद्धाप्पा गस्ती (वय 85) ही वृद्धा आजारपणामुळे आपल्या घरी झोपली होती. लक्ष्मीबाईच्या घरात पोहोचलेल्या दोन महिलांनी तिच्या अंगावरील सोन्याची टिक्की पाहून ‘तुम्ही यल्लम्मादेवीची चांगली सेवा करा. सेवा केली तरच तुमचे चांगले होणार आहे’ असे सांगत त्या वृद्धेचे हातपाय दाबायला सुरू केले.

अज्ञात महिलांनी सुरू केलेल्या सेवेमुळे आजारी वृद्धेलाही बरे वाटले. हातपाय दाबून झाल्यानंतर या दोन्ही महिला लक्ष्मीबाई यांच्या घरातून बाहेर पडल्या. थोड्या वेळात आपल्या गळ्यातील टिक्की गायब झाल्याचे वृद्धेच्या लक्षात आले. तिने एकच आरडाओरड सुरू केली. त्यावेळी शांता व सुवर्णा या दोन महिला वृद्धेच्या मदतीला धावून आल्या.

यल्लम्मादेवीची सेवेकरी असल्याचे सांगून दोन महिलांनी आपल्या गळ्यातील टिक्की पळविल्याचे लक्ष्मीबाई यांनी सांगताच शांता व सुवर्णा यांनी परिसरात त्यांचा शोध घेतला. त्या दोन्ही महिला मिळाल्या. त्यांच्याकडे वृद्धेच्या गळ्यातील टिक्कीविषयी चौकशी करण्यात आली. त्यावेळी ‘आम्ही देवीचे सेवेकरी आहोत. आम्ही चोर नाही’ असे सांगत आपल्या हातात असलेली पिशवी रिकामी करून दाखवली.

त्यावेळी शांता यांनी त्या दोन्ही महिलांची झडती घेताना एकीच्या ब्लाऊजच्या आत टिक्की सापडली. आता चोरी करणाऱ्या महिला सापडल्या आहेत. त्यांनी चोरलेली टिक्कीही सापडली आहे. या दोघींना पोलिसांच्या ताब्यात देऊ, असे सांगत महिलांनी माळमारुती पोलीस स्थानकाशी संपर्क साधताच महिलांच्या हातावर तुरी देऊन त्या दोन्ही महिलांनी ऑटोरिक्षातून तेथून पळ काढला.

 पोलिसांकडून कौतुक

देवीच्या नावाने वृद्ध महिलेची काळजी घेण्याचे भासवून तिच्या अंगावरील टिक्की पळविणाऱ्या दोन महिलांची छबी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. माळमारुती पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले असून त्या दोन्ही महिलांचा शोध घेत आहेत. प्रसंगावधान राखून त्या महिलांची झडती घेऊन वृद्धेची टिक्की परत मिळवून देणाऱ्या शांता व सुवर्णा यांचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांनी कौतुक केले आहे.

Advertisement

.