जंगलात आयुष्य घालविणारी युवती
मृत प्र्राण्यांद्वारे भरते स्वत:चे पोट
जगात कुणाला आलिशान जीवन हवे असते तर काही लोक स्वत:चे आयुष्य कमीतकमी साधनांद्वारे जगू पाहत असतात. याचमुळे काही लोक बक्कळ पैसा असूनही साधारण आयुष्य जगताना दिसून येतात. अशीच एक महिला स्वत:कडे सर्वकाही असून जंगलात जाऊन राहत आहे. ही महिला पोट भरण्यासाठी मृत प्राण्यांचा वापर करते. या महिलेने स्वत:चे कुठलेच घर निर्माण केलेले नाही. ती पूर्णवेळ खुल्या आकाशाखाली फिरत राहते. मला हेच जीवन अधिक आवडत असल्याचे या महिलेचे सांगणे आहे.
या महिलेचे नाव मँडर्स बार्नेट असून तिचे वय 32 वर्षे आहे. मँडर्स मागील 4 वर्षांपासून अशाप्रकारे जगत आहे. आधुनिक आयुष्याचा आता उबग आला असून माझे मन निसर्गातच रमते. जुलै 2019 मध्ये मी स्वत:च्या घरातून घोड्यावर बसून बाहेर पडले आणि 6 वर्षे अशाचप्रकारे जगू इच्छिते असे मँडर्सचे सांगणे आहे. इदाहो येथील रहिवासी असलेल्या मँडर्सची भेट एकेदिवशी एका अशा व्यक्तीबरोबर झाली, जो कित्येक वर्षांपासून घोड्यावरुन प्रवास करत होता. त्याच्या जीवनपद्धतीमुळे प्रभावित होत मँडर्सने स्वत:ची वाइल्डलाइफ टेक्निशियनची नोकरी सोडत जंगलाची वाट धरली आहे. मँडर्स बार्नेटने आतापर्यंत इडाहोपासून ओरेगनपर्यंत 500 मैलापर्यंतचा प्रवास केला. मँडर्स खाण्यासाठी वाटेत मरून पडलेल्या प्राण्यांच्या मांसाचा वापर करते आणि अन्न शिजविण्यासाठी चुलीचा वापर करते. स्नान आणि कपडे धुण्यासाठी नैसर्गिक जलस्रोतांचा वापर करते. फोन सोलर बॅटरीद्वारे चार्ज करत असते.