योग क्रीडा प्रकारात उज्ज्वल झेप घेणारी रत्नागिरीची कन्या!
शिवछत्रपती पुरस्कार पटकावणारी पहिली योगा खेळाडू पूर्वा किनरे : देश-विदेशात योगा अभ्यास
प्रवीण जाधव/रत्नागिरी
योग या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक करण्याचे काम रत्नागिरीची कन्या पूर्वा किनरे करत आह़े मागील अनेक वर्षांच्या मेहनतीमधून तिने विविध पुरस्कारांना गवसणी घातली आह़े विशेष म्हणजे नुकताच तिला राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आल़े,योगासन या क्रीडा प्रकारासाठी पहिलाच पुरस्कार मिळविण्याचा मान पूर्वा किनरे हिच्या माध्यमातून रत्नागिरी जिह्याला मिळाला आह़े
रत्नागिरी जिह्यातील पालीजवळच्या कशेळी या खेडेगावात राहणाऱ्या पूर्वाने योगासन हा क्रीडा प्रकार निवडल़ा रत्नागिरी येथील क्रीडा कार्यालयात असलेल्या योग क्रीडा केंद्रामध्ये मार्गदर्शक रवीभूषण कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ती 12 वर्षांपासून प्रशिक्षण घेत आहे. अविरत मेहनत आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर तिने योगासनामध्ये यशाची मोठी उंची गाठली. तिची योगासनातील तपश्चर्या शिवछत्रपती पुरस्काराच्या माध्यमातून फळाला आली आहे. पूर्वाची योगासनातील सर्वोत्तम कामगिरी पाहून लहान बहीण प्राप्तीलाही प्रेरणा मिळाली. प्राथमिक शिक्षक असलेल्या आणि खो-खोचे पंच असलेल्या वडिलांनी या दोन्ही मुलींना मोठे पाठबळ दिले. त्यामुळे त्यांना जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवता आला. पनवेल येथील महाविद्यालयात इंजिनिअरिंगचे उच्च शिक्षण घेत असलेल्या पूर्वा हिने अभ्यासाबरोबरच योगासनातील आपली साधना कायम ठेवली.
शिवछत्रपती पुरस्कारासाठी योगाचाही समावेश
राष्ट्रीय स्पर्धेच्या माध्यमातून योगासन या पारंपरिक खेळ प्रकाराला मोठ्या प्रमाणात चालना मिळत आहे. त्यामुळे निश्चितपणे युवा खेळाडूंना या खेळ प्रकारासाठी प्रेरणा मिळेल. योगासनातील आमची बारा वर्षाची मेहनत पदकाच्या माध्यमातून आता यशस्वी ठरली आहे. युवा योगपटूंसाठी आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी सर्वोत्तम व्यासपीठ ठरत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या राष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनातून देशांमध्ये योगासनाचा वेगाने प्रसार व प्रचार होईल. या क्रीडा प्रकारात शासनाने शिवछत्रपती पुरस्कार द्यावा, म्हणजे या खेळाला आणखी चालना मिळेल, अशी अनेक वर्षांची मागणी होती. पूर्वा किनारेला जाहीर झालेल्या या पुरस्कारानेही मागणी पूर्ण झाली आहे.
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा: प्रशिक्षक कुमठेकर
योगपटू पूर्वा हिच्या सर्वोत्तम कामगिरीमुळे महाराष्ट्राला आजवर योगासनामध्ये मोठे यश संपादन करता आले आहे. शिवछत्रपती पुरस्कारावर नाव कोरून पूर्वाने रत्नागिरीच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवला आहे. तिची राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील कामगिरी निश्चितपणे अभिमानास्पद आहे. आतापर्यंत केलेल्या मेहनतीचे फळ या शिवछत्रपती पुरस्काराच्या माध्यमातून मिळाले, अशा शब्दात प्रशिक्षक रवीभूषण कुमठेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
योगाला पहिला शिवछत्रपती पुरस्कार
रत्नागिरी येथे सुमारे बारा वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या राज्यातील पहिल्या शासकीय योग केंद्राची पूर्वा केंद्रे ही पहिली विद्यार्थिनी होती. तिला राज्याचे पहिले योगा क्रीडा मार्गदर्शक रवीभूषण कुमठेकर यांचे सातत्याने 12 वर्षे मार्गदर्शन लाभले. त्यामुळेच तिने शिवछत्रपती पुरस्कारापर्यंत झेप घेतली आहे. योगासन या क्रीडा प्रकाराला राज्यात पहिल्यांदाच शिवछत्रपती पुरस्कार मिळाल्याने सर्व योगप्रेमीत आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे. पूर्वा किनरे व त्याचे प्रशिक्षक रवीभूषण कुमठेकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे