Sangli News : जत तालुक्यातील डफळापूरमध्ये चिमुरडीचा पाण्यात बुडून मृत्यू
रेणुकाच्या मृत्यूने डफळापूर परिसरात शोककळा
जत : जत तालुक्यातील डफळापूर येथे गुरुवारी सकाळी शेतात आजीसोबत आलेली रेणुका शिवदास ढोबळे (वय ४ वर्षे) ही चिमुरडी गवताच्या ढिगाऱ्याजवळ खेळताना अचानक बेपत्ता झाली होती. दोन दिवस चाललेल्या शोध मोहिमेनंतर शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास बंधाऱ्यात तिचा मृतदेह आढळला. या दुर्दैवी घटनेने डफळापूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे
गुरुवारी पावणे बारा वाजता रेणुकाची आजी गवत काढायला गेली होती. यावेळी रेणुका गवताच्या ढिगावर खेळत होती. रेणुका अचानक दिसेनाशी झाली. आजीने व गावकऱ्यांनी तत्काळ शोध घेतला मात्र ती हाताशी लागली नाही. घटनेची माहिती उशिरा पोलिसांना देण्यात आली. शुक्रवारी रात्री उशिरा रेणुकाच्या आजोबा आप्पा भाऊ ढोबळे (वय ७५) यांनी जत पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता १२७ (२) प्रमाणे अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी विविध शक्यतांचा तपास सुरू केला.
सांगली येथील जीव रक्षक दल, कोल्हापूर येथील श्वानपथक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, गुन्हे प्रकटीकरण शाखा तसेच आयुष हेल्पलाइन टीमच्या सहकार्यान मोठी शोध मोहीम राबविण्यात आली. शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बंधाऱ्यात शोध घेत असताना रेणुकाचा मृतदेहपाण्यात आढळला. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अच्युतराव माने, विक्रम घोदे, नाथा खोत, सुभाष काळेल यांसह मोठा पोलीस ताफा दाखल झाला होता. शोध मोहिमेत आयुष हेल्पलाइनचे प्रमुख अविनाश पवार, नरेश पाटील, सुरज शेख, कार्तिक डोस्मनी, गणेश जाधव, आदिल शेख आणि स्थानिक नागरिकांनीही मदत केली.
पोलिसांचा कसून तपास
बेपत्ता झाल्यानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. कोल्हापूर श्वान पथकासह जीव रक्षक दल पाचारण करण्यात आले. दोन विक्स सलग शोध मोहीम राबविण्यात आली होती.
अहवालावर तपास अवलंबून
रात्री उशिरा ग्रामीण रुग्णालय जत येथे मृतदेहाचे शवविच्छेदन सुरू होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्राथमिक अहवालात नेमकं काय असणार आहे यावर तपास अवलंबून आहे. संशयस्पद चर्चा देखील घटनास्थळी सुरू होते. पोलीस कसून तपास करत आहेत.